भूमिका
ब्रह्मांडरचना व भूगोल हा पुराणांचा एक महत्त्वाचा विषय आहे. ब्रह्मांडात १४ भुवने असून त्यांपैकी पृथ्वीच्या वर सहा व खाली सात भुवने आहेत, अशी कल्पना होती. खालच्या भुवनांना पाताळ म्हणतात. त्याखेरिज स्वर्ग, नरक, ब्रह्मलोक, पितृलोक इत्यादींची वर्णनेही आढळतात. भारतीयांनी अती प्राचीन काळी केलेल्या भौगोलिक परिक्रमणाच्या सूचक कथा पुराणांत आढळतात, असे एक मत आहे. पुराणांतील तीर्थक्षेत्रांची वर्णनेही भौगोलिक ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
पौराणिक भूगोल यथार्थ आहे; फक्त त्याचा पूर्ण अर्थ अजून लागलेला नाही, असे बलदेव उपाध्याय मानतात. पुराणांनी केलेल्या कुशद्वीपातील नीलनदीच्या वर्णनावरून कॅप्टन स्पीक यांनी ईजिप्तमधील नाईल नदीच्या उगम शोधून काढला, या ऐतिहासिक घटनेमुळे पुराणांतील वर्णनांचे महत्त्व वाढले आहे. तरीदेखील पुराणांतील भूगोलवर्णने बऱ्याच प्रमाणात पुराणकथात्मक वाटतात.