होळकर घराणे हे भारतातील इंदूर येथील संस्थानिक
होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता
मल्हारराव होळकर याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे
स्थान मिळवले व मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा
उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी
होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले.
होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.
मल्हारराव होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर
जमातीतील होते. ते शिवाजीच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले
सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित
करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली. होळकर .
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी
कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना
तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या
पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी
मिळवली.
भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर
मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात
आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची
मल्हाररावांची धारणा होती त्यामुळेच त्यांनी सुभेदारी
मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.
उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती,
राणोजी
शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते.
गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये
मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे
यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च
१७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून
बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त
झाले.
अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना
मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी
अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी
सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत
केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी
अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात
झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले.
मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना
देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव
स्वीकारावा लागला.
मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग
मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार,
वजीर
दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे
रक्षण करू शकतील एवढा विश्वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या
स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज
येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२)
होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी
या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला
होता.
जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि
कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे
शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी
त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी
मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ
उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न
ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव
होळकरांना मदतीसाठी पाठवले.
पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६० रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती,
परंतु
तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच
थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा
त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या
संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच
झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या
मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे.
पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी
एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर
१७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज
पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर
असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा
बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून
ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी
आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार
पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता.
अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे
त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य,
निष्ठेने
वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.
मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि
मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.
त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या
माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला
तुंगांपासून वाचवले. त्या लढाईत
अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर
यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर,
यांना
भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट"
म्हटले आहे.इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी
कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी
केली आहे.हिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे
त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. अहिल्याबाई होळकर या उचित
न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू
मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला;
महेश्वर
व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.
त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी,
उज्जैन,
नाशिक
व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या
महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ
बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात
अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक
होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक
स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची
भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही
लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.