Get it on Google Play
Download on the App Store

शिंदे घराणे

शिंदे घराणे मराठेशाहीतील एक पराक्रमी घराणे होते.ते  भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक राजघराणे होत. कण्हेरखेड जि.सातारा येथील पाटीलकी या घराण्याकडे होती. शिवाय शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती.

त्रपती शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली. दत्ताजी यांचा मुलगा जनकोजी हे बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या पदरी होता; मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्यांचा मुलगा राणोजी होय. राणोजी यांपासूनच शिंदे घराणे पुढे आले.

 बाळाजी विश्वनाथ यांच्या पदरी पायदळात राणोजी होते (१७१६). पहिल्या बाजीराव पेशव्याने त्यास बारगीर केले (१७२२). निजामाबरोबर झालेल्या १७२४ च्या साखरखेड येथील लढाईत राणोजी यांनी भाग घेतला. ते १७२५ मध्ये शिलेदार झाले. कर्नाटकच्या मोहिमेतही ते होते. चिमाजी आप्पा यांनी  १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकून या तीन सरदारांत त्याची वाटणी केली.

राणोजी अत्यंत शूर व निष्ठावंत असल्यामुळे त्यान दीड कोटी वसुलापैकी ६५·५ लाखांचा मुलूख वाटणीस आला. शिंद्यांनी माळव्यात जम बसविला. राणोजी यांनी निजामाविरुद्धच्या भोपाळ वेढयात (१७३७) तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत (१७३७३९) भाग घेतला होता. वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरी त्यांनी केली. राणोजी सुजालपूरजवळ १७४५ मध्ये निवर्तले.

राणोजी यांना जयाप्पा, दत्ताजी व जोतिबा हे तीन औरस पुत्र व तुकोजी आणि महादजी हे दोन अनौरस पुत्र होते. त्यांपैकी तुकोजी हे राणोजीपूर्वी मरण पावले आणि ओर्छाच्या राजाने जोतिबा यांस दगा करून १७४३ मध्ये मारले. त्यामुळे राणोजीनंतर जयाप्पा यांच्याकडे घराण्याची सूत्रे आली.

पुढे शिंदे-होळकरांनी मिळून दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या दुआबात जाऊन रोहिल्यांची खोड मोडली. तेव्हा सफदरजंगच्या सल्ल्यावरून बादशहाने मोगल सत्तेचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांवर सोपविले आणि त्या बदल्यात काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले.

याच कामगिरीवर राजस्थानात असताना, जयाप्पा शिंदे राजपुतांविरुद्ध नागोर येथे लढत असताना विश्वासघाताने त्यांची  हत्त्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे  धाकटे भाऊ दत्ताजी व मुलगा जनकोजी हे शिंदे घराण्याचा कारभार पाहू लागले.

दत्ताजी शूर होते. अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर (१७५७) पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांपैकी नजीबखानास त्याने कैद केले; पण मल्हारराव होळकरांच्या मदतीने नजीबखान सुटला.

दत्ताजीने नंतर लाहोरचा बंदोबस्त केला व साबाजी शिंद्याकडे तेथील व्यवस्था सोपविली. पेशव्यांची आज्ञा असूनही होळकरांनी दत्ताजीला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही. अखेर दत्ताजी नजीबखान रोहिल्याच्या कचाट्यात सापडले. त्यातून ते सुटले ; पण १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळ बुराडीच्या घाटात अब्दालीशी लढताना त्यांना वीरमरण आले.

त्यांना  अपत्य नव्हते. जयाप्पा यांचा मुलगा जनकोजी पानिपतच्या लढाईत मरण पावले (१७६१). यावेळी त्यांची  पत्नी काशीबाई पानिपतच्या स्वारीत हजर होत्या. जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी यांनी मर्दुमकी गाजविली; पण महादजी (१७२७९४) यांनी शिंदे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले.


महादजी यांनी पुरंदऱ्या समवेत पुण्यावर चालून येत असलेल्या सलाबतजंग व बुसी यांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचा पराभव करण्यात पुढाकार घेतला (२७ नोव्हेंबर १७५१). यानंतर महादजी यांनी अनेक लढाया केल्या. त्यांपैकी तळेगाव-उंबरी, औरंगाबाद, साखरखेड या मुःख्य होत. त्याची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे युरोपीय धर्तीवर प्रशिक्षण दिलेल्या फौजेच्या जोरावर दिल्लीच्या पादशाहीवर व उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र मराठ्यांचा वचक त्याने बसविला. पुणे येथे वानवडी मध्ये अल्पशा आजाराने महादजी मरण पावले (१२ फेब्रुवारी १७९४).

त्यांना देखील अपत्य नसल्याने त्यांच्या भावाचा नातू दौलतराव (१७९५१८२७) गादीवर आले ; मात्र महादजीच्या विधवांचे व त्यांचे पटले नाही आणि संघर्ष निर्माण होऊन त्यात दौलतराव यांचा पराभव झाला.

पुढे नर्मदातीरी यशवंतराव होळकरांबरोबर लढाई होऊन तीतही दौलतराव पराभूत झाले.; तरीसुद्धा पुढे यशवंतरावाच्या मदतीने त्यांनी भोपाळ येथे इंग्रजांशी अयशस्वी लढा दिला (१८१४). पुढे सर्व आघाड्यांवर अपयश आल्यावर त्यांनी इंग्रजांचा आश्रय घेतला आणि तैनाती फौज ठेवण्याचे मान्य केले.

इंग्रजांबरोबरच्या तहांत (१८०३, १८०५ व १८१७-१८) चंबळ ही उत्तर सीमा ठरवून शिंद्यांच्या सत्तेचा संकोच झाला. राजपूत संस्थानांवरील हक्क संपुष्टात आले व राजधानी उज्जैनहून ग्वाल्हेरला गेली. ऐशारामात जीवन व्यतीत करून दौलतराव ग्वाल्हेर येथे निवर्तले (१८२७).

 दौलतराव यांना अपत्य नव्हते. दुसरा जनकोजी (१८२७४३) या दत्तक पुत्राच्या कारकिर्दीत दौलतराव यांची  पत्नी बायजाबई ह्यांचे राज्यकारभारावर प्रभुत्व होते. त्या कर्तृत्ववान व हुशार होत्या; पण जनकोजीने त्यांची  दखल घेतली नाही आणि दौलतराव यांच्या मामांना दिवाणगिरी देऊन सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपविली.

त्यावेळी इंग्रजांनी पन्निआर-महाराजपूर येथील लढायांत (१८४४) ग्वाल्हेरकर शिंद्यांचा पूर्ण पराभव करून अठरा लाखांचा प्रदेश खर्चासाठी बळकावला व तैनाती फौज वाढविली. परिणामतः इंग्रजांच्या रेसिडेंटची मगरमिठी शिंदे संस्थानावर पक्की झाली. त्यानंतरचे इतर वारस केवळ नामधारी होते.

मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे. या घराण्यातील कर्तृत्ववान पुरुषांमुळे, विशेषतः राणोजी-महादजी यांच्यामुळे पानिपतचे अपयश धुऊन निघाले आणि उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पेशव्यांनी या घराण्यास दौलतीचे आधारस्तंभ म्हणून गौरविले होते.