Get it on Google Play
Download on the App Store

रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना

बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता. सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत:-

राहूनी गुप्त मागे करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान् चितारी ।

किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि हृदय येई उचंबळून ॥

या वेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला, 'श्याम! सारी मंडळी आली; प्रार्थनेला चल. सर्वजण वाट पहात आहेत.'

'हो. मी आपला पाहातच राहिलो.' असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला. प्रार्थना झाली व गोष्टीस सुरूवात झाली.

मित्रांनो! प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या सा-या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत; परंतु संस्कृतीचे संवर्धन करणा-या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे.

आमच्या घरी एक अशी पध्दत होती की, रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा. जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत. वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत. मोरोपंत, वामनपंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत. तशीच इतर स्तोत्रे, भूपाळया श्लोक वगैरे शिकवीत. पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत. आमच्या अंथरूणावर बसत आणि आम्हाला भूपाळया श्लोक वगैरे शिकवू लागत. आम्ही अंथरूणातच गोधडया पांघरून बसत असू. माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकिट नव्हते. गोधडी, पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरूण व अंथरूण असावयाचे. गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळया वडील शिकवीत. 'कानी कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नभा' हे चरण आजही मला मधुर वाटतात. वक्रतुंड महाकाय, शांताकारं, वसुदेवसुतं देवं, कृष्णाय वासुदेवाय, वगैरे संस्कृत श्लोक, तसेच गंगे गोदे यमुने, कृष्णानुजा सुभद्रा, कुंकुममंडित जनके, देवी म्हणे अनार्या, ये रथावरि झणी यदुराया, असा येता देखे, मारावे मजला, अंग वक्र अधरी धरि पावा, वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत. हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत. रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावयाचे. 'सौमित्र म्हणजे कोण?' असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. 'लक्ष्मणाची आई कोण?' आम्ही सांगावे 'सौमित्रा'. मग सौमित्र म्हणजे कोण?' आम्ही सांगावे अंदाजाने 'लक्ष्मण' भले शाबास! अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पध्दतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता.

वडिल पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. 'दिव्या दिव्या दीपोत्कार। कानी कुंडल मोतीहार। दिवा देखून नमस्कार।' किंवा 'तिळाचे तेल कापसाची वात। दिवा तेवे मध्यानरात। दिवा तेवे देवापाशी । माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी ॥' वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषितर्पणच होत असे.

गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळयांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे. अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला, कोणी टीका केली तर मला वाईट वाटे; परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाटयाने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे.

त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार घरोबा. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुस-याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे; परंतु कोणी तरी गेलेच पाहिजे होते. हजेरी लागलीच पाहिजे. नाही तर तो उर्मटपणा, माजोरेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखविले, असे झाले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली.

दुपारी स्नान सांगणे आले व थोडया वेळाने मी जेवावयास गेलो. कणेरांगोळया घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळयाचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठया हंडयांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही, याची चवकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व 'हरहर महादेव' होऊन मंडळी जेवावयास बसली.

मी मुकाटयाने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरूवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, 'बंडया! श्लोक म्हटलास का? म्हण आधी.' श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. 'श्याम! श्लोक म्हण ना रे! तुला तर किती तरी चांगले येतात. तो 'चैतन्य सुमनं' नाही तर 'डिडिम डिम्मिन् डिम्मिन्-' म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. 'बायक्या आहेस अगदी!' शेजारचे गोविंदभट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला, त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई.

जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्यांने सुपारी, विडा खाऊ नये, अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, 'काय रे होते जेवावयाला? भाज्या कसल्या केल्या होत्या?' मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, 'श्लोक म्हटलास की नाही?'

आता काय उत्तर देणार? एका खोटयास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले, 'श्लोक म्हटला.'

आईने पुन्हा विचारले, 'कोणता म्हटलास?

तो म्हटलेला लोकांना आवडला का?'

पुन्हा मी खोटे सांगितले की, 'नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे' हा श्लोक म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का?

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।

माथां सेंदुर पाझरे वरि बरे दूर्वांकुरांचे तुरे ॥

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे ॥

गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥

मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोडया करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकांस मार बसवावयाचा, हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंडया, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, 'यशोदाकाकू! तुमच्या श्यामने आज श्लोक नाही म्हटला. सारे त्याला म्हण म्हण असे सांगत होते; परंतु याने म्हटलाच नाही.'

'श्यामनेच मला शिकविलेला 'भरूनि गगन-ताटी शुध्द नक्षत्ररत्ने' तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली.' असे वासू म्हणाला.

गोविंदा म्हणाला, 'असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी' हा मी म्हटला व नरसूअण्णांनी मला शाबासकी दिली.'

आई मला म्हणाली, 'श्याम ? मला फसविलेस! खोटे बोललास ! श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस?'

वासू म्हणाला, 'श्याम ! केव्हा रे म्हटलास?

बन्या म्हणाला, 'अरे त्याने मनात म्हटला असेल; तो आपल्याला कसा ऐकू येईल?'

बंडया म्हणाला, 'पण देवाने तर ऐकला असेल!' मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाटयावर आणणारी वर्तमानपत्रेच ती!

मला आई म्हणाली, 'श्याम ! तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक! देवाच्या पाया पड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही.' मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, 'जा, देवाच्या पाया पड. नाही तर घरी येऊ देत, त्यांना सांगेन; मग मार बसेल; बोलणी खावी लागतील.' मी जागचा हललो नाही. मला वाटले, आई वडिलांस सांगणार नाही. ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, 'नाही ना ऐकत? बरं! मी आता बोलत नाही.'

वडील रात्रीसच परगावाहून आले होते. रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भूपाळया सांगितल्या, आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, 'श्याम! काल कोणता श्लोक म्हटलास?'

आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुध्दा मोठा होता. आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली, 'श्यामने काल श्लोक म्हटला नाही; मला मात्र खोटेच येऊन सांगितले की, म्हटला. परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होत्ये की, देवाच्या पाय पड व पुन्हा खोटे बोलणार नाही, असे म्हण; परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच.'

वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, 'होय का रे? ऊठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा रहा. श्लोक म्हटलास का काल?'

वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, 'नाही म्हटला.' 'मग खोटं का सांगितलेस? शंभरदा तुला सांगितले आहे की, खोटे बोलू नये म्हणून.' वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, 'आता नाही पुन्हा खोटे बोलणार.'

'आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते? माजलास होय तू?' वडील आता उठून मारणार, असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले. माझे कढत कढत अश्रू तिच्या पायांवर पडले. 'आई! मी चुकलो, मला क्षमा कर.' असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले; परंतु स्वत:च्या भावना आवरून ती म्हणाली, 'देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुध्दी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग.'

मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो.

वडिलांचा राग मावळला होता. 'ये इकडे,'असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, 'जा आता, शाळा आहे ना?'

मी म्हटले, 'आज रविवार, आज सुट्टी आहे.'

वडील म्हणाले, 'मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू.' मी होय म्हटले.

वडिलांचा स्वभाव मोठा हुषार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते. खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला, आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी; तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढब व ऐदी गोळयाला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे :-

करूनि माता अनुराग राग । विकासवी बाळ-मना-विभाग

फुले तरू सेवुनि उष्ण शीत । जगी असे हीच विकास-रीत ॥


श्यामची आई

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रारंभ रात्र पहिली सावित्री-व्रत रात्र दुसरी अक्काचे लग्न रात्र तिसरी मुकी फुले रात्र चवथी पुण्यात्मा यशवंत रात्र सहावी थोर अश्रू रात्र सातवी पत्रावळ रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना रात्र नववी मोरी गाय रात्र दहावी पर्णकुटी रात्र अकरावी भूतदया रात्र बारावी श्यामचे पोहणे रात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण रात्र अठरावी अळणी भाजी रात्र एकोणिसावी पुनर्जन्म रात्र एकविसावी दूर्वांची आजी रात्र बाविसावी आनंदाची दिवाळी रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर रात्र चोविसावी सोमवती अवस रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने रात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ रात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक रात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही! रात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे रात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध रात्र पाचवी मथुरी