रात्र सहावी थोर अश्रू
लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली.
'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते.
एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ; तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो.
'आई! अंग पूस माझे; पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पूस.' मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी.
आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ.'
मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस.'
'तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते?' आई म्हणाली.
'तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा.' मी घट्ट धरून म्हटले.
हट्टी आहेस हो श्याम अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक! हं ठेवा पाय.' आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही?
मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.'
गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सा-यांचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे.
'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।'
अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!'