Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - ऑक्टोबर २७

सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे, आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे, आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे, अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी. अशी भावना ठेवायला कुठे बिघडते? त्यात अवघड ते काय आहे? प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा; पण तो परमात्माच सर्व करीत असून, त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली? आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे ! तो काही दुसर्‍या कुठून मिळवायचा नाही. आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की, मीपण, म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो, आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे. हेच ‘ स्वानंदात स्मरण ’ होय.
आपले कर्तेपण अपुरे आहे. ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे. म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता, ती परमात्म्याला झाली पाहिजे ! आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश; आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच ‘ भगवंत करतो ’ ही भावना होय. आपले होते कसे ते पहा: कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते; कर्म करीत असताना ‘ काय होतंय कुणाला ठाऊक? ’ म्हणून काळजी लागते; आणि कर्म झाल्यावर शेवटी, ‘ अरे, हेच का फळ मिळाले? ’ म्हणून काळजी लागते; याप्रमाणे, काळजी करणार्‍या मनुष्याला सुख-समाधान केव्हाच मिळत नाही. काळजी ही वाळवीसारखी आहे; काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे, काळजी आपली निष्ठा कमी करीत असते; त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. भारतीय युद्धात, भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे ! अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती देऊ या. अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते. तसे आपण भगवंताचे यंत्र बनू या. यंत्राला चालविणारी शक्ती आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ती म्हणजे भगवंत आहे. आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहू या.

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर २ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ४ भगवंत - ऑक्टोबर ५ भगवंत - ऑक्टोबर ६ भगवंत - ऑक्टोबर ७ भगवंत - ऑक्टोबर ८ भगवंत - ऑक्टोबर ९ भगवंत - ऑक्टोबर १० भगवंत - ऑक्टोबर ११ भगवंत - ऑक्टोबर १२ भगवंत - ऑक्टोबर १३ भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १५ भगवंत - ऑक्टोबर १६ भगवंत - ऑक्टोबर १७ भगवंत - ऑक्टोबर १८ भगवंत - ऑक्टोबर १९ भगवंत - ऑक्टोबर २० भगवंत - ऑक्टोबर २१ भगवंत - ऑक्टोबर २२ भगवंत - ऑक्टोबर २३ भगवंत - ऑक्टोबर २४ भगवंत - ऑक्टोबर २५ भगवंत - ऑक्टोबर २६ भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २८ भगवंत - ऑक्टोबर २९ भगवंत - ऑक्टोबर ३० भगवंत - ऑक्टोबर ३१