भगवंत - ऑक्टोबर १८
भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे ; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली . हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत . कर्ममार्ग , हठयोग , राजयोग , वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही ; उलट क्वचित प्रसंगी वाढतोही . भक्तिमार्ग सोपा आहे . भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे . भगवंताचे होऊन राहणे , भगवताशिवाय दुसरे काहीच न दिसणे , सर्वत्र भगवतप्रचीती येणे . अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे , सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे , आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे . असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो . हे साधत नसेल तर गुरुआज्ञेत राहणे , म्हणजेच आपला मान , अभिमान , शहाणपण , हे सर्व गुंडाळून ठेवून , गुरु सांगतील तसे , सबब न सांगता वागणे . हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे . त्यांच्या सांगण्याने , सहवासाने , अभिमान हळूहळू कमी होतो .
भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते . पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून , लंगोटी लावून , ‘ भगवंता , तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन , ’ अशा निग्रहाने बसणे . हा मार्ग कठीण आहे . प्रापंचिकाला हा साधणार नाही . दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे . भगवंताचे गुणवर्णन वाचणे , त्याचेच गुण श्रवण करणे , त्याच्या दर्शनास जाणे , प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे , प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे ; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा , म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते . विषयाकरिता केलेली भगवद्भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही . भगवतसेवा निष्काम पाहिजे ; कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे . मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते , भगवंताची नाही . तेव्हा , आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले ; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो . विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत . संत , भगवंत , हे निरतिशय सुख देणारे आहेत . त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो . भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे . भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत , हे लक्षात ठेवावे .