Get it on Google Play
Download on the App Store

जानेवारी २८ - नाम

काही न करणे, आपण काही करीत आहो किंवा आपल्याला काही करावयाचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरुंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने, मनाने, एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे. पण ते मिळविण्याकरता साधन करणे, म्हणजे प्रयत्न करणे, जरुर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहू. पहिले, आपल्या इच्छेविरुध्द गोष्ट होणे; दुसरे, आपल्या मागच्या बर्‍यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार; सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुध्द गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला, आपली इच्छा नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुध्दी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्न करुन यश आले नाही म्हणजे दु:ख होते, स्वास्थ्य बिघडते; मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दु:ख? प्रयत्न करुन जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे, आणि जे होईल, ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे, आपण कर्ते नाही, असे मानणे, याला अखंड भगवन्नामस्मरण पाहिजे. सारांश, जे जे काही झाले, ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करील. म्हणून, झाल्याची म्हणजे कालची आठवण करु नये, होणार्‍याची म्हणजे उद्याची काळजी करु नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये, नामस्मरणात राहावे. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे.

आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुध्दीचा स्वभाव आहे तो आपण सगळीकडे लावतो. सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही, असे आपण म्हणतो; सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही, आणि आपण काही करीत नाही ! देहबुध्दी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुध्दीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही.