Get it on Google Play
Download on the App Store

जानेवारी ४ - नाम

नाम कसे घेऊ हे विचारणे, म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा खाऊ म्हणून जसे विचारणार नाही, तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहात नाहीत. बी शेतात पडते तेव्हा, ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्यातरी एका बाजूला, खाली किंवा वरही असू शकेल; पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसे, नाम कसेही घेतले तरी घेणार्‍याची ते योग्य दिशेने प्रगती करुन त्याला योग्य मार्गावर आणून सोडील, म्हणून, कसेही करुन नाम घ्यावे.

नाम घेताना कोणती बैठक असावी, किंवा कोणते आसन घालावे? हा प्रश्न म्हणजे, श्वासोच्छवास करताना कोणत्या तर्‍हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे. समजा, एखाद्याला दमा झाला आहे, तर तो काय करतो? तो अशा तर्‍हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की, जेणेकरुन श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल; म्हणजे श्वासोच्छवास सुलभ रीतीने कसा चालेल, हे त्याचे ध्येय असते, आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते. श्वासोच्छवास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते, तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे; आणि त्याला मदत होईल, व्यत्यय येणार नाही, अशा तर्‍हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. समजा, आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली, तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल; म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून, त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतिधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही. हेच तर नामाचे माहात्म्य आहे. मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे, आणि ते म्हणजे त्याचे नाम होय. पण देहबुध्दी अशी और आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काही तरी उपाधि जोडतो, आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो; असे न करावे. इतर उपाधी सुखदु:ख उत्पन्न करतील, पण नाम निरुपाधिक आनंद देईल.