संग्रह ३
१
माहेराला जाते, आडव्या हाताने गेला तास
बया वाढते दुधभात जेवण्यास
२
पेराया जाते कुरी , आडवा आला मांग
ताईत बंधुजीचं उद्या फिटत्याल पांग
३
सोमवारी बाई कोन पापीन पानी न्हाली
पूजा सांबाची ढासळली
४
देवाच्या देउळांत किती उशीर उभी राहूं
गुरवाच्या मुला आधी कौल माझा लावू
५
भावाची बहीन पाच पुत्राची माता
घ्यावा शकुन गांवी जातां
६
गाडिच्या बैलाची सुपाएवढी पाठ रूंद
बंधुजी, दैवाचा बैल मधी बांध
७
कावळा कुरकुरे परसूंदारीच्या मेढीवरी
बंधुजी पाव्हना सारंग्या घोडीवर
८
कावळा कुरकुरे लिंबाच्या शेंडयावर
बंधु पाव्हना घोडयावर
९
कावळा कुरकुरे घराच्या जईवरी
बहिनीला भेटाया, बंधु नटतो बयाघरी
१०
पेरणीला जातां आडवी झाली कुरी
बंधू पिकेल तुमची शेरी
११
दिस मावळला नको दिव्याला दिवा लावू
वाणीतिणीचा माझा भाऊ
१२
गुजर भावजई तुला नटण्याचा कसला चाळा
ताईत बंधुजीला दृष्टीचा जाळ आला
१३
अवसे पुनवेला नका घालूसा माझी वेणी
माझ्या पाठचा चिन्तामणी
१४
माझ्या पाठीवरनं नका नेऊंसा रानशेणी
ताईत माझा बंधु, नाग गुंफला माझ्या वेणी
१५
माझ्या पाठीवरनं नका नेऊंसा इंगळ
ताईत बंधुजी, माझ्या पाठचा तांदूळ
१६
माझ्या पाठीवरनं नका नेऊंसा आगिन
माझ्य पाठची नागिन
१७
भावाच्या बहिणीला सांगुन पाठवा
आज अवसेच पाडवा, न्हाया बैसली उठवा
१८
जुन्या जुंधळ्यानं भरलं माझं कोन
जेण्या सुनंचा पायगुन
१९
मेहुन्या राजसाच्या चौकटीला सोनं
बहीन राधाचा पायगुन
२०
भरली तीनसांज दिवा शिगेला हले डुले
ताईत बंधुजीच्या घरी लक्षुमी गुज बोले
२१
भरली तीनसांज दिवा लावावा सूनबाळ
लक्षुमीची झाली वेळ
२२
भरली तीनसांज साजबाई फुलली
दारी लक्षुमी बोलली
२३
भरली तीनसांज लक्षुमीमाय आली घरा
दिव्याची जल्दी करा, मोतीपवळ्यानं ओटी भरा
२४
नवस बोलले चतुरसिंगीच्या लाडीला
सापाचं कासरं वाघ जुंपल गाडीला