Android app on Google Play

 

संग्रह २

 

२६

शेजी तूं आईबाई उसनी घाल सोजी

बया पाव्हनी आली माझी

२७

शेजी आईबाई घाल उसनं वेलदोडं

बंधुजीची शिंगी नाचते वाडयापुढं

२८

शेजी तूं आईबाई मला उसनी दे ग डाळ

माझ्या बहिणीचं आलं बाळ

२९

शेजी आईबाई कर गरज बोटव्याची

बंधुजीची आली दौड नटव्याची

३०

शेजी आईबाई घाल उसनं मालपोव्हं

माझ्या बंधुजील निरशा दुधाची ग सवं

३१

शेजी आईबई उसनं घाल लाडू

बंधुचं बाळ आलं, आतां कवाशी सोजी काढूं ?

३२

शेजी तूं आईबाई, मल उसनं द्यावं गहु

बंधु पाव्हनं आल्याती माझं भाऊ

३३

शेजीचं उसनं आडसरी पायली

बयाच्या उसन्याची याद कुनाला र्‍हायली

३४

शेजी आली घरी, बस म्हनुनी देते पाट

माझ्या पित्याची वहीवाट

३५

शेजीघरी गेले, शेजी गेली कोनामंदी

झाले मी शहानी मनामंदी

३६

शेजीघरी गेले, शेजी बोलली उशिरानं

सासुबाईची ताकीद नको जाऊ दुसर्‍यानं

३७

शेजीघरी गेले, शेजी बोलेनाशी झाली

तिला कोडं पडियेलं, काय मागायाला आली

३८

शेजीच्या घरा गेले, शेजी म्हणंना खाली बैस

कसा कंठावा परदेस ?

३९

जीवाला जडभारी माझं दुखत न्हाई काई

शेजीच्या बोलन्याचा मला शीण आला बाई

४०

उथळ पान्यामंदी घागर बुडयेना

शेजीच्या बोलन्याचा मला इसर पडयेना

४१

पाटानं जातं पानी उसासंगट कर्दळीला

शेजारीनबाई नगं येऊंस वर्दळीला

४२

सम्रत शेजीबाई असूदे माझ्या रामा

तिच्या रांजनाचं पानी येईल मला कामा

४३

शेजारीनबाई किती येसी तिनतिनदां

मला सुचेना कामधंदा