संग्रह ५
१०१
दृष्ट झाली म्हनूं, डोळ्यां पडूं मीठमाती
मावळभाचीयांची जोडी अंगुळीला गेली हुती
१०२
माझा बाळराज चंद्र कोमेला करुं काई
दृष्ट झाली म्हनू , मीठ मोहर्या चुलीबाई
१०३
दृष्ट झाली म्हनू, मीठ मोहर्या मिर्च्या नऊ
नवतीला दृष्ट झाली, कुन्या नारीचं नाव घेऊ
१०४
जळुजळु दृष्ट घोडयावरच्या घोडेस्वारा
माझ्या ग बाळाचं केस कुरळं, बांधा गोरा
१०५
दृष्ट झाली म्हनु धोंडा फुटला बारवेचा
माझा बाळराज घड कोमेला नारळीचा
१०६
हातांत टाळवीणा दिंडी निघाली कुन्या गावा
माझ्या बाळराजाला हुते दृष्ट , काळं लावा
१०७
दृष्ट मी काढीते मीठ मोहर्या घोळून
माझा बाळराज आला तालीम खेळून
१०८
बाळाला दृष्ट होते, माझ्या तालिमतालीयाला
तीन वाटंची घेते माती जाते लिंबाच्या पालीयाला
१०९
सावळ्या सुरतीवरी मिसरूड पालापाला
गनीस बाळराय शेवगा भराला माझा आला
११०
सावळ्या सुरतीवरी अबीर ल्याला नीट
राघुबाच्या माझ्या भुंवईच्या कोरा दाट
१११
हाताचा केला पाळना, नखानेत्राच्या केल्या ज्योति
बाळराज सांग ! तवा अस्तुरी कुठं होती ?
११२
सोळा वरूषाचा पुत्र, मग झाला ढाण्या वाघ
त्याला बयाचा येतो राग
११३
नवतीच्या नारी तुझी नवती जालीम
तुझ्या पानियाच्या वाटे माझ्या राघुची तालीम
११४
हौस वाटयेती सतनारायणाची खाऊ पोळी
पूजेला बसेल सून गुजर चाफेकळी
११५
अंगनात उभी , कोन आखूड पदराची
रानी तान्हीया गुजराची
११६
तीस पुतळ्याची माळ सून गौर लेती
कंगनी हिर्याला ढाळ देती
११७
आडपडद्यानं सासू बघती सुरत
राघुबाची माझ्या कृस्नदेवाची मूरत
११८
पाया पडू आली धाकल्याची बिगीबिगी
थोरल्याची मागं उभी
११९
सोळा वरुषाचा पुत्र माता म्हनिते माझामाझा
आपुल्या कामिनीचा झाला राजा
१२०
नवतीच्या नारी माझ्या दारांतून ऊठ
येई नवतीचं जायफ्ळ व्हईल नवतीची लूट
१२१
एकुलता एक त्याला हवाला हरीचा
तान्हा माझा राघु मोड बुडल्या घरीचा
१२२
लक्ष्मी आई आली जराशी दम धर
माझ्या बाळायाचं दाविते देवघर
१२३
सावळी सुरत सासू बघते चोरून
माझ्या बाळराज चंद्र काढिला कोरून
१२४
महिन्याच्या संकष्टीला बाळा सुकलं तुझं ओठ
चंद्र मोहरीला ऊठ
१२५
भरली कृस्नाबाई पानी लागे दुही थडया
बाळ पव्हनार, टाकी उडया