Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४

७६

माझ्या दारावरनं लेजीम गेली नऊ

रणहलग्या बिगी बिगी जेऊ

७७

कुस्तीच्या फडावर दंड वाजे तडातडा

लिंबु नारळ आधी फोडा

७८

अंगांत अंगरखं कुडतं छातींत उसवलं

कुठं मानिक दृष्टावलं

७९

कुस्तीच्या फडावरी दंड वाजतो तोफखाना

कुस्ती गाजवून गेला कुन्या माउलीचा तान्हा

८०

कुस्तीच्या फडावरी शिंग वाजीव गुरवा

माझ्या बाळाला सुरतीसारखा पेहरावा

८१

गावीच्या पारावर कशाची लटपट

माझ्या राघुबाचं कुनी धरीना मनगट

८२

कुस्तीच्य फडावर शिंग वाजे दमायानं

माझ्या राघुबाला दिली हुशारी मामानं

८३

माझ्या दारावरनं दुधाची गेली केळी

राघुबानं माझ्या पैलवानानं न्याहारी केली

८४

माझ्या दारावरनं पैलवानाची जोडी गेली

बाळरायानं माझ्या निरशा दुधाची न्याहरी केली

८५

दुधाचा तांब्या, तुझ्या तालमीच्या खुणा

गोटी उचल पैलवाना

८६

आकडी दूध बाळाचा हाच मेवा

कुस्ती नेमली परगांवा

८७

खारीक खोबरं, बाळाची माझ्या न्याहारी

कुस्ती नेमिली खेडयावरी

८८

अंगातं अंगरखं जुंधळी त्याचा वाण

माझा बाळराज आकडी दुधाचा पैलवान

८९

अंगुळीला पानी हंडा ठेवीते परसूदारी

पैलवानाची रुंदी भारी

९०

अंगुळीचं पनी तापून झालं रवा

गनी बळराज, इहीर बारवे गेला कवां

९१

अंगुळीला जातो हाती धोतराचा पिळा

संगं मैतरांचा मेळा

९२

अंगुळीला जातो, हाती धोतराची घडी

संगं मैतरांची जोडी,

९३

माझ्या दारावरनं कोन गेला छडीवाला

माझ्या बंधुजीचा जोडीवाला

९४

माझ्या अंगनांत, काठेवाडी दोन घोडी

लाडक्या लोकांची आली जोडी

९५

अंगुळीला जातो, हाती घडी धोतराची

बाळरायाला माझ्या दृष्ट हुईल पाखराची

९६

अंगांत अंगरखं, छातीला पिवळी माती

गोरेपणाला दृष्ट होती.

९७

बाळ दृष्ट झाली, अंगनी अंग धुतां

परवरी गंध लेतां.

९८

दृष्ट झाली म्हणु कचेरी जाताजातां

मामासंगट भाचा होता.

९९

दृष्ट मी काढीते, मीठमोहर्‍या पिवळा धना

दृष्ट झाली बाळा पानं पत्त्याची खेळतांना.

१००

गानापरीस साथ देनारा मागेमागे

माझ्या राघुबाला सयांची दृष्ट लागे.