Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ७

२६

मोठंमोठं डोळ, नाजूक पापण्या

जशा लिंबाच्या कापण्या

२७

मोठंमोठं डोळं लिंबाच्य ग फोडी

नार वाणियाची, तुझ्यापायी झाली वेडी

२८

मोठंमोठं डोळं भुवया बारीक

सुरमा ल्यायाची तारीफ

२९

उन्हाळ्याची झळ लागते चटक्याची

राजसानं केली सावली दुपटयाची

३०

सावळी सुरत अशी पाहिली न्हाई कुठं

माझ्या राजसाचं ओठ बारीक डोळं मोठं

३१

सावळी सुरत अशी पाहिली न्हाई कधी

सावळ्या भरतारानं जरीपोशाक केला उदी

३२

तुझ्य सुरतीचं, अंगनी लाव झाड

मला लागुनी गेलं याड

३३

सावळी सुरत मोती हजाराला दोन

तुझ्या सुरतीपायी नार झालीया बैरागीण

३४

सावळी सुरत उन्हान बिघडली

सुरुच्या झाडाखाली आरशी लालानं उघडली

३५

हौशा पान खातो, देते मी कातगोळ्या

दात मोगरीच्या कळ्या

३६

पान खातो सखा चुना लावतो देठाला

त्याच्या लालाई ओठाला

३७

उन्हाळ्याचं ऊन कुठं निघाला ऐनेमहाल

माझ्या हौशाचं, गोरं पावलं टाचा लाल

३८

गुलाबी पटाक्यची बांधणी बेताची

राजसाच्या गोर्‍या नाजूक हाताची

३९

कोशा पटयेका, डाव्या डोळ्याच्या आखावरी

चाले सखा ज्वानीच्या झोकावरी

४०

बादली पटका, गुंडीतो बाकावरी

दृष्ट व्हईल नाक्यावरी

४१

चांगलंपन तुझं, माझ्या जीवाला करवत

नको जाऊ गलीन मिरवत

४२

बारीक एवढा साद, नका गाऊंसा माडीवरी

नार बाजिंदी माडीवरी

४३

बारीक एवढा साद, नका गाऊंसा मोटेवर

नार बाजिंदी वाटेवर

४४

चांगलपनासाठी, नार घालीत येरझार्‍या

माझा शुकीर पानझर्‍या

४५

तांबडया मंदीलाच, तेज पडलं माझ्या दारी

डोळं दीपलं तुझं नारी

४६

नार भाळीयेली, पाठीवरच्या शमल्याला

माझ्य कातीव इमल्याला

४७

चांगलंपन तुझं,नार लागली तुझ्या मागं

तिला दुरला पल्ला सांग

४८

नवतीची नार नसावी शेजाराला

भुलावणी घातली माझ्या गुजराला

४९

चांगलपन तुझं, कुन्या देवची करणी

तुझ्या रुपापायी नार लागली झुरणी

५०

अंचल चंचल नार, नसावी वाडियांत

माझ्या शिररंगाला कैफ चारीते विडीयांत