Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २

२६

खुतनीच्या गादीवर रजई वेलाची

हौशा राजसाची रानी मी हौसेच्या तोलाची

२७

गाडीमाग गाडी , एक गाडी घुंगराची

धनी, ठुशी करावी शंभराची

२८

सात सर्ज्याची नथ, सर्जं सोडून बारा मोती

हौशा राजसाची रानी लेती

२९

हौस मला मोठी डाळीडोरल्यावरी सर

पानपुतळ्या चोळीवर

३०

हौस मला मोठी टीकाखाली मणी

हौस पुरवीतो माझा धनी

३१

हौस मला मोठी बाळ्याबुगडया कळसाच्या

येळा घडवा पन्नासाच्या

३२

हौस मला मोठी कंगन्या पाटल्या आटाच्या

धनी, येळा घडवा साठाच्या

३३

सराफकटयावर जोडी कापाची पाहिली

धनी, हौस मनीची र्‍हायली

३४

लेन्यामंदी लेनं, तीस पुतळ्या मधी मोहर

कंथ हौसेचा सुभेदार

३५

ठुशा टिक्काखाली सरीबाई तूं जामीन

हौशा कंथाची मी कामीन

३६

हौशा घरधनी हौस करीता र्‍हाईना

पचीस पुतळ्यांचा गोंडा, त्याच्या खिशांत माईना

३७

भरतार पुशित्यात, कां ग अस्तुरी अबोल्यानं

तुझ्या डोरल्याच सोन न्हाई जोखिले ताजव्यानं

३८

कापडाच्या गाडया, गाडया पेठेला दाटल्या

हौशा राजसानं, केल्या सोनीयाच्या पाटल्या

३९

सोन झालं सस्त रुपै आलं मोडी

हौशा कंथाला हात जोडी

४०

माळीण सादवीते देठासहीत कारलं

कंथाच्या राज्यामंदी ल्याव साजासहीत डोरलं

४१

सोन्याच्या पाटल्या हाताला दाटल्या

बत्तीस पुतळ्या कलावतूंत गाठवील्या

४२

भरल्या बाजारात भरणी आलीया कारल्यांची

भरतार हौस करी, साजासहीत डोरल्याची

४३

भरतार भोळा सोनं झोकियेतो तोळा

माझा चितांगाजोगा गळा

४४

लेन्यामंदी लेन, नथ ल्यावी सरज्याची

जाळीच्या मन्याखाली, हवा साजाच्या डोरल्याची

४५

भरतार बोले दमान घेग नारी

लेन्यालुगडयाची हौस पुरवीन सारी

४६

हौस मला मोठी पायीच्या जोडव्याची

हौशा भरतारानं चांदी खंडली बडोद्याची

४७

मला हौस मोठी रेशमी लुगडयाची

धनी, मोतियाच्या बुगडयाची

४८

गाडीमागे गाडी मधली गाडी खजिन्याची

रानी संभाळा दागिन्याची

४९

ठूशाटिकाखाली सरी घालावी कवांकवां

हौशा आणितो दागिना नवा

५०

उंची उंची चोळ्या जावा घालिती शेजाराला

हौशा, किती सांगूं ? चला बाजाराला