संग्रह ६
१०१
काशी काशी म्हणून जन चालले गावात
माझी माऊली गांवात
१०२
काशी काशी करती, रामेसराचा डोंगर
माझी मायबाई तीर्थाचं आगर
१०३
औक्ष चिन्तीते बया माझ्या मालनीला
येल गेल्याती पलानीला
१०४
बया म्हनू बया, माझ्या तोंडाला रसाई
नया जलम असाई !
१०५
साखरेपरीस बत्तासा लई गोड
मातेच्यापरीस मला पितयाचं वेड
१०६
माऊलईपरायास माझा पिता उपकारी
दुनव्या दावियेली सारी
१०७
जीवाला जडभारी कुनाला घालूं वझं
पिता दौलतीचं ढाण्या वाघाचं हाय बीज
१०८
समूरल्या सोप्या, समई जळते तुपाची
सयांनु किती सांगू, वस वाढते बापाची
१०९
दिस मावळला झाडाझुडांत झाला गप
आपुल्या लेकीसाठी सांजेचा आला बाप
११०
शितळ साऊली चिचबाई तुझी गार
पिता दौलती, अंबा माझा डौलदार
१११
भरला बाजार, भरूनी झाला गोळा
पिता दौलतीचा न्हाई कुठं तोंडवळा
११२
भरला बाजार भरल्या चारी वाटा
कुन्या पेठेला माझा पिता
११३
पिता दौलतीनं कीर्त केलीया थोडी भाऊ
वाटेवर त्याची इहिर पानी पितुंया सारा गावु
११४
पिता दौलतीनं कीर्त केल्याती एकदोन
शेती, आंबयाचं बन
११५
रांजनाचं पानी साउलीनं नेते
पिता दौलतीच्या पारखीला दुवा देते
११६
माझी जातगोत काय पुसशी वेड्या आवा
पिता दौलती, सार्या जव्हारीला ठावा
११७
वाटचा वाटसरू माझी पुशीतो डहाळीमोळी
किती सांगु माझ्या पित्याची उच्चकुळी
११८
आईबाप असतांना, दुधातुपाची केली कढी ।
भावाच्या राज्यामंदी, ताक घ्याया सत्ता थोडी
११९
आईबापाच्या राज्यांत, काढलीं कुलुपं माडीची ।
भाऊभावजईच्या राज्यांत, सत्ता न्हाई काडीची
१२०
आईबापाच्या राज्यामंदी माझ्या वटीला खारका ।
माघारी झाला उंबरा परका ॥
१२१
आईबापाच्या राज्यामंदी तांब्या तुपाचा केला रिता
भावजईच्या राज्यामंदी पानी घ्याया न्हाई सत्ता
१२२
आईबापाच्या माघारी, माह्यारी गेलं वेडं
बंधुनं दिलं पायाचं भाडं
१२३
आईबापाच्या माघारी माह्यारी जाते वेडी
कवटाळीते खांब मेढी
१२४
आईबापाच्या माघारी भाऊभावजया कुनाच्या ?
झळ मारती उन्हाच्या
१२५
आईबाप असत्यात तोवरी येनंजानं
बया बोले उद्यां होतील भाऊ शानं