संग्रह ४
२६
आई म्हनु आई, तोंडाला येते गोड
बया मनुकाचं झाड
२७
लांब लांब केस त्या केसाचं नवल काई ?
कोकनची शिकंकाई, सव लावली बयाबाई
२८
लांब लांब बहालं, त्याचा झाला गुता
माय ती माउली, शिकंकाईचा घेते खुता
२९
मोठं मोठं केस सडक सोडिलं न्हायाला
मातेच्या सायासाचं सया येत्यात पाह्याला
३०
लांब लांब केस, शिरी बुचडा माईना
बया गवळन, जोपा करितां र्हाईना
३१
लांब लांब केस, मातामाईच्या आवडीचं
पानी पित्याच्या कावडीचं
३२
जीवाला माझ्या जड सांग जासूदा जातांजातां
माझ्या बयाबाईनं, तांब्या ठेवला अलगतां
३३
जीवाला माझ्या जड, आयाबायांनी भरला वाडा
आली कोयाळ वाट सोडा
३४
जीवाला माझ्या जड आयाबायांनी भरला सोपा
आली नागीन, टाकी झेपा
३५
जीवाला माझ्या जड म्यां उंबरी दिलं ऊसं
माझी बयाबाई, तुला कळालं न्हाई कसं
३६
जीवाला माझ्या जड कोन कुनाच्या जावाभावा ?
माझ्या बयाबाईला आना जावा
३७
अंगनांत उभी राहिले चिंतागती
मला बयाची सय येती
३८
दिस केला कामामंदी राती झोप न्हाई आली
बयाबाईची सय अंतराला झाली
३९
सुखाला भरतार दुःखाला बयाबाई
बंधु वैद्याच्या गावा जाई
४०
समद्या गोतामंदी बया खुरद्याची किल्ली
आमच्या जल्मा जावी, देवापाशी बोली केली
४१
शेल्याच्या पदरांत बांधते पंचखाज
माझ्या बयाला वेड माझं
४२
भरल्या बाजारी काय करावं किरान्याला ?
माता असावी परान्याला
४३
नदीपलीकडे पंचरंगी झाड
बया, तसली चोळी धाड !
४४
चोळ्यावरी चोळ्या, बासनी आला पूर
बया म्हनिते, हिरवा निघाला मोतीचूर
४५
चोळ्यावरी चोळ्या, माझ्या बासनी मावंना
गुजर बयाबाई चोळी धाडतां राहीना
४६
जरीच्या म्हनूं चोळ्या, मी काढिते आडवारी
बयाच्या जीवावरी, मी भोगिते तालेवारी
४७
फाटली माझी चोळी डावी बगल गेली वाया
चोळी घेणार माझी बया
४८
फाटली माझी चोळी, न्हाई मी ठिगळ द्यायाची
बयाच्या गावाला मी जायाची
४९
फाटली माझी चोळी काय फाटल्या माझ्या बाह्या
चोळी घेईल माझी बया
५०
फाटली माझी चोळी फाटली फाट जाऊ
बया घेनारी सुखी राहू