Get it on Google Play
Download on the App Store

भाग ४

गुरु रक्तसंभव बोलता बोलता थांबले. त्यांनी हाताने आपले तोंड फासले त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. "गुरुदेव... " शुकाच्या तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर आले. पण गुरुची चिंता कार्याची नाही हे विद्याने त्याला शिकवले होते. गुरुदेव पडून त्याची हाडे मोडलेली शुकाने बघितली होती, महिनोन महिने ना काही शरीर अस्थीपंजर होताना त्याने पहिले होते. पण त्या सर्वातून गुरुदेव सही सलामत बाहेर आले होते. पण त्या प्रत्येक क्लेशामागे काही तरी कारण असते. कुठेतरी त्यांचा आत्म्याचा एक तुकडा विरघळून गेल्या प्रमाणे जातो असे विद्याने सांगितले होते. तिच्या मते गुरुदेव कधी कधी खरोखर मरायचा प्रयत्न करतात पण काही कारणाने ते आपला विचार बदलतात.

त्यांनी कमंडलूतून हाताने पाणी काढले आणि शुकाला वराह मुद्रेत संकल्प करण्याची आज्ञा दिली. कधी ना ऐकलेली नावे गुरूंनी घेतली. कदाचित नदीची नावे असावीत वा ग्रहांची काही सांगता येत नव्हते. गुरुदेव कुणाला तरी आवाहन करीत आहेत असा सुरु होता. बराच वेळ गुरुदेव अगम्य भाषेंत बोलत होते. काही वळणे त्यांचा सूर बदलला. आता कुणाशी तरी संवाद साधत आहेत असा त्यांचा सूर होता.

"भद्र शुक, तुझ्या इच्छे प्रमाणे "प्रकटीकरण" विद्या मी तुला दान करत आहे. शेकडो वर्षांत ह्या विद्येच्या वापराने पृथ्वी अमंगल झाली नव्हती पण ती आता होत आहे. प्रत्येक अस्तित्वाला सुरवात आणि अंत दोन्ही असते. दोन्ही गोष्टीत मह्त्वाचया आहेत. अनादी अनंत असे काही नाही. पण प्रकटीकरण विद्या हिचे अस्तित्व कुणी साधकाने फार जुन्या काळी शोधून काढले. हि विद्या अमंगल आहे, अस्तित्वाचा समतोल बिघडवणारी आहे. किमान सहा बंध विमुक्त केल्याशिवाय ह्या विद्येचा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकत नाही. किमान ३ बंद तोडल्याशिवाय वापराच करता येत नाही. तू वापर करू शकतोस पण योग्य प्रकारे नाही. पण काळाच्या पृष्ठभागावर हि ओळ अंकित केली गेली आहे कि रक्तसंभव तुला हि विद्या दान करेल . इतका अधिकार तो साधनेने प्राप्त केला आहेस. तुझ्या हृदयातील अग्नी मी पाहू शकतो. पाहिजे तर नष्ट सुद्धा करू शकतो पण मी करणार नाही. काळाच्या प्रवाहात बदल करणे मी सोडून दिलेय."

शुकाच्या हृदयांत धडकी भरली. गुरु रक्तसंभव त्रिकाल ज्ञानी होते असे विद्या सांगत होते. गुरुदेवांना भूत,भविष्य,वर्तमान,विचार,प्रवृत्ती सर्व काही समजत आणि त्यात कुहराळी बदल ते घडवून आणू शकतात.  हे ऐकून प्रकटीकरण विद्या आपल्याला कशा साठी हवी आहे हे त्यांना समजले तर हि भीती त्याला नेहमी वाटायची पण गुरुदेवांना त्याचा काही फरक पडत नाही असे विद्या सागंत आहे. ज्या प्रमाणे सूर्याला पृथ्वीवर काय चालले आहे ह्याचे सोयर सुतक नसते त्याच प्रमाणे ठाऊक असले तरी गुरुदेवन काहीही फरक पडत नाही.

पण आज पहिल्यांदा प्रकटीकरण विद्येच्या उपयोगा बद्दल गुरुदेव बोलत होते. शुकाच्या ध्येयाची ज्योत हृदयांत धडधडत होती पण गुरुदेवांची प्रखर दृष्टीच्या एका क्षेपात त्याला जणू काही साऱ्या गोष्टीचे विस्मरण झाले पण एकाच क्षण.

गुरुदेवांनी पुन्हा आपल्या हाताची मुद्रा केली. शुकाने मुद्रा तात्काळ ओळखली आणि गुरुदेव सोबत तो हि ओरडला "संकोच विमुक्त". त्याच क्षणी त्याला आपल्या शरीराचा विसर पडल्या सारखे झाले. तो एका तटस्थ नजरेने आता स्वतःच्या शरीराकडे पाहू शकत होता. "काळ विमुक्त" पुढील बंध सुद्धा त्याने तोडला. अचानक आजूबाजूची परिस्थिती बदलल्या सारखी अवस्था झाली. तो वृक्ष,  स्म्शान भूमी, सह्याद्रीचे जंगल सर्व काही नष्ट झाले होते.  चोहो बाजूला फक्त वैराण जमीन होती. पाणी नसल्याने जमीन दुभंगून गेली होती. गुरु रक्तसंभव अचानक कृश झाले होते. त्यांचे शरीर जणू वाऱ्यावर उडून जाईल असे वाटत होते किना त्या भयानक गर्मीत वितळून जाईल असे वाटत होते. "भय विमुक्त" त्याक्षणी शुकाला एक चैतन्याची भावना मनात आली वैरण जमीन आणि हिरवीगार वनराई ह्यातील फरक त्याला आता जाणवत नव्हता. पण शुकाचे शरीर हलके वाटत होते. आपल्या शरीरावर त्याचा ताबा राहिला नव्हता.

गुरुदेव रक्तसंभवानी आपले पुढील बंध तोडले. पण शुकाला आणखीन काही जाणवले नाही. रक्तसंभव हळू हळू चालत शुकाजवळ आले. त्यांचा दंड अजून जमिनीत गाडला गेलेला होता. गुरुदेवांच्या हातात आता एक कृष्णवर्णीय खंजीर होता. जणू काही आसुरी शक्तीने निर्माण केला असावा असा त्याचा आकार आणि रंग होता. रक्तसंभवानी सर्वप्रथम आपल्या डाव्या हातावर खोल घाव घातला. रक्ताचे थेम्ब माणका प्रमाणे जमिनीवर ओघळले. लाल रंगांचे रक्त कृष्णवर्णीय भूमीवर सिंचन करते झाले. जमीन हादरते आहे असा भास शुकाला झाला. शुक अजून हालचाल करण्याच्या परिस्थितीत नव्हता, हलके आणि चैतन्यमयी शरीर घेऊन आपण तटस्थ पणे पाहत आहोत असे त्याला वाटत होते.

पुढच्याच क्षणी गुरु रक्तसंभवानी तोच खंजीर चपळतेने शुकाच्या पोटांत घुसवला. शुकाला जराही भीती वाटली नाही पण शरीरात वेदना भरून गेली, पोटांतील रक्ताची प्रत्येक नस घावाने तुटत गेली हे त्याला जाणवले, कदाचित आतड्यांवर घाव पडले होते आणि टोक मूत्रपिंडाला भोक पडत होते. गरम रक्त नसांतून सांडून आतील मासपेशींवर पसरत होते, वेदना असह्य होत्या पण त्याच क्षणी काहीही हालचाल करण्यापासून त्याला त्याचेच शरीर त्याला रोखत होते.

तंत्रसाधनेत ह्या अनुभवांची त्याला तशी सवय सुद्धा झाली होती. वेदना बंध जो पर्यंत तोडता येत नाही तो पर्यंत वराही तांत्रिक साधनेत वेदनांपासून आपण अलिप्त राहू शकत नाही. सिद्धी जितकी महान तितक्या वेदना जास्त.  रक्त हे साधारण द्रव्य नाही. रक्ताच्या एका थेंबापासून पूर्ण नवीन प्राणी उत्पन्न करता येतो. रक्तांत माणसाच्या आत्म्याचे, इतिहासाचे आणि त्याच्या संपूर्ण अनुभवांचे प्रतिबिंब असतात. गुरु रक्तसंभवांच्या एका रक्ताच्या थेंबात सुद्धा इति शक्ती आहे कि काही लोक त्यासाठी युद्ध करण्यास पुढे मागे पाहणार नाहीत.

रक्तसंभवानी शुकाचे रक्त आपल्या हातावर घेतले. दोघांचे रक्त मिश्रित होऊन त्यांचा डावा हाथ लालभडक झाला होता. ग्लानीतुन शुकाला तो लाल रंग आणखीन बोचत होता. आपल्या हाताने रक्तसंभवानी जमिनीवर काही चिन्हे निर्माण केली. रक्ताची चिन्हे वराह तंत्रात फार शक्तिशाली असतात. आपले रक्त वापरून आपण भूत प्रेत पिशाचच आणि इतर शक्तीशी करार करू शकतो. सिद्ध पुरुषाच्या रक्तात भूलोक आणि इतर लोकात संपर्क करण्याची शक्ती असते. रक्त वापरून चिन्हे निर्माण करून आपण विविध सिद्धी प्रकाशित करू शकतो हे सामान्य ज्ञान शुकाला होते. पण अजून त्याने त्याचा विशेष प्रयोग केला नव्हता. रक्तचिन्हे वापरून हवामान आणि जंगली श्वापद पासून रक्षण करणे इतकीच विद्या त्याला अवगत होती.

चिन्हे निर्माण झाल्यावर गुरुदेवांनी शुकाला आपल्या हाताचा पंजा चिन्हावर टेकवायला सांगितला. शुकाने आज्ञेचे पालन केले. भोकसलेल्या पोटांतून अजून वेदनांचा महापूर निघत होता. "प्रकटीकरण" असे गुरुदेव मोठ्याने ओरडले आणि शुकाने सुद्धा त्यांचा आवाजांत आपला कृश आवाज मिळविला. नक्की अपेक्षा काय ठेवायची हे शुकाला ठाऊक नव्हते. प्रकटीकरण विद्या त्याला हवी होती. ह्या विद्येने पुरातन असे अतृप्त आणि अशांत आत्मे भूतलावर आणून वश केले जाऊ शकतात हे त्याला माहिती होते. आपल्या ध्येयपुर्तीसाठी हि एकाच विद्या कामाला आली असती. मानवी आत्मे वशात करण्यासाठी अनेक तांत्रिक उपलब्ध असतात पण अतिमानवीय किंवा असुरी दैवी आत्मे बोलावू शकणारे सिध्दपुरुष भूतलावर फारच कमी होते. पुन्हा एकदा मला गुरु रक्तसंभवाकडे कोणी पाठवले हा विचार करण्याचा प्रयत्न शुकानें केला पण त्याला आठवले नाही.

"प्रकटीकरण" आवाहनानंतर काही क्षण काहीही झाले नाही. त्या नंतर हवेंत एक विचित्र वास पसरला, वातावरणात धुके पसरले आणि आणि पुढील जमिनीतून एक प्रचंड सावली बाहेर आली. शुक श्वास रोखून पाहत होता. काळी सावळी हाळी हळू वर येत होती आणि वास आणखीन उग्र होत होता आणि शुकाच्या पोटांतून कळा येत होत्या.

शुकाने जळणीपूर्वक सावलीत काही आकार शोधण्याचा प्रयत्न केला. हळू हळू सावळी हवेत विरून शुकाला प्रकट झालेला आत्मा दिसला. खरे तर जमिनीतून फक्त एक प्रचंड मोठा चेहरा बाहेर आला होता. गडद लाल आणि काळ्या रंगाच्या छबीतून एक पुरुषी चेहरा वाटत होता. चेहेऱ्याला दोन शिंगे होती. असुरा प्रमाणे नसून मोठ्या हरणाला जशी असतात तशी अत्यंत सम्यक अशी शिंगे. शिंगांचा रंग लाल होता कि त्याच्या वरून रक्त ओघळत होते शुक सांगू शकला नसता.

"गुरा, रुद्र, कर्कशीं, डीमां अशी अनेक नवे असलेला हा आत्मा आहे भद्र शुक. लाखो वर्षां पासून ह्या पृथ्वीवर आणि कुठे कुठे हा फिरला आहे आणि आता एका पाताळातून तुझ्यासाठी वर आला आहे. तुज्या रक्ताने मी त्याच्याशी करार बांधला आहे. जो पर्यंत तुज्या रक्तात जीव आहे तो पर्यंत त्याची १०० टक्के स्वामी भक्ती तुझ्या कडे असेल. हि विद्या सर्वाना जमत नाही आणि कुणालाच फळत नाही. गुरु म्हणून सांगणे कर्तव्य आहे कि ह्या रुद्राचा वापर काळजी पूर्वक कर." गुरु रक्तसंभवानी पुन्हा हाताच्या मुद्रा बदलीत शुकाला सांगितले.

"आमचा प्रवास इथे संपतो" हे शब्द शुकाच्या कानावर पडले. काचेवरील बाष्प हळुवार नाहीसे व्हावे तसे गुरुदेव त्या अंधारात गायब झाले.

शुक एक पावूल पुढे गेला. त्याच्या समोर तो प्रचंड चेहरा उभा होता. त्याची उंची इतकी होती कि नजर मिळविण्यासाठी त्याला नजर वर करावी लागली. शुकाने वर पहिले त्या रुद्राने शुकाकडे नजर वळवली. एखाद्या खोल दरीत आपण झुकून पाहावे आणि त्याची खोली पाहून पोटांत खड्डा पडावा असा भास झाला आणि त्याच वेळी आपण सोडलेला भय बंद कमकुवत झाला आहे हि जाणीव झाली. आणखीन वेळ गेला तर कदाचित आपला मृत्यू होईल ह्या विचाराने शुकाने हस्तमुद्रा करत जमिनीवर हात लावला. पुन्हा काळ्या सावलीच्या आवरणात तो चेहरा गुप्त झाला.

शुद्ध आली तेंव्हा शुक वटवृक्षाच्या खाली होता. गुरु रक्तसंभव निघून गेले होते आणि कदाचित अनेक तास निघून सूर्य मध्यावर आला होता. त्या पुराणकालीन स्मशानात काही हरणे मुक्त पणे चरत होती. शुकाने हालचाल केली आणि एका हरणाने आपल्या डोळ्यांनी शुकाकडे कटाक्ष टाकला.  त्याची शिंगे पाहून शुकाला रात्रीची घटना आठवली.

त्याचा उद्धेश सफल झाला होता. रक्तसंभव आणि विद्यांची आठवण त्याला होणार होती पण तो इंद्रा गुरु आणि ती साक्षांत सरस्वती सामान विद्या पृथ्वीच्या कुठल्या भागांत निघून गेली असेल सांगता येणे शक्य नव्हते.

शुकाने आपल्या पोटाकडे पहिले. तिथे काहीही घावाचे निशाण नव्हते. त्याच्या अंगात पूर्वी सारखीच शक्ती होती. आपलय ध्येय पूर्तीच्या फार जवळ तो आला होता.