हनली
Hunley ही काही फार मोठी बोट नव्हती आणि खरे तर ती पूर्णपणे पाण्याखालून चालवता येत नव्हती. ती एकूण तीन वेळा बुडाली व तीन वेळा पुन्हा पुन्हा पाण्याबाहेर काढली गेली. तिन्ही वेळा तिच्यातील सर्व नौसैनिक बुडून मेले. पण एक लढाऊ जहाज बुडवण्याचे श्रेय तिच्या नावावर आहे. फक्त ४० फूट लांबीची ही बोट मोबाइल-अलाबामा येथे १८६३ सालीं बांधली गेली. तिचा आकार आत एक मनुष्य वाकून चालू शकेल एवढाच होता व ७ माणसे आत मावत होतीं. रेल्वे वॅगनवर चढवून १२ ऑगस्ट १८६३ला ती चार्लस्ट्न, साउथ कॅरोलिना येथे पोचली. २९ ऑगस्टला चाचण्या चालू असताना ती प्रथम बुडाली व ५ नौसैनिक मेले. पण पाण्याबाहेर काढून पुन्हा चाचण्या व ट्रेनिंग चालू राहिले. १५ ऑक्टोबर रोजी ती पुन्हा एकदा बुडाली. ८ माणसे मेली त्यात स्वतः संशोधक Hunley पण मेला. तो काही खरे तर कॉन्फेडरेट सैन्यामध्ये नव्हता पण बोटीत होता. बोट पुन्हा बाहेर काढली गेली. १७ फेब्रुवारी १८६४ ला या पाणबुडीने युनियन नेव्ही च्या ११२४ टन वजनाच्या USS Housatonic या जहाजावर अगदी जवळ जाऊन हल्ला केला. चार्ल्सटन बंदराची युनियन नेव्हीने नाकेबंदी केली होती व हे जहाज आउटर हार्बरमध्ये त्याच कामावर होते. पाणबुडीच्या टॉरपेडोने बरोबर नेम साधला व हे जहाज बुडाले पण पाणबुडी २० फूट इतकी जवळ गेलेली होती व जवळपास पाण्यावरच होती. स्फोटामुळे तीहि जागीच बुडाली व आतील सर्व ८ जण मेले. ही पाणबुडी कोठे आहे हे शोधले गेले व २००० साली ती तिसर्या वेळेला पाण्याबाहेर काढली गेली! त्यानंतर साफसफाई व काही दुरुस्ती करून चार्लस्ट्न येथे ती आता पहावयास मिळते.या लहानशा पाणबुडीला अर्थातच इंजिन नव्हते. आतील आठ माणसानी हाताने एक शाफ्ट फिरवून तिचा प्रॉपेलर फिरवून तिला चालवावे लागे. पुढच्या टोकाजवळ पाण्याबाहेर पोचेल अशी एक चिमणी होती व त्यातून पेरिस्कोप वापरून पुढे पाहता येत होते. एक टॉर्पेडो एवढेच एक शस्त्र उपलब्ध होते. पण इतक्या प्राथमिक स्वरूपाच्या या पहिल्या पाणबुडीला एक लढाऊ जहाज बुडवण्यात यश आले.