Android app on Google Play

 

किडनॅपिंगची गाडी

 

लहान असताना आपल्याला भिती घालण्यासाठी आई-वडील विविध शक्कली लढवत असत. “झोप नाहीतर बुवा येईल” (हा बुवा म्हणजे कोण आणी तो कसा दिसतो ? या प्रश्नाचे उत्तर मला अजातागायात मिळाले नाही) किंवा “जेवलास नाही तर भूत तुला घेवून जाईल”(भुताचेही तसेच आहे, हा भूत मी आजतागायत पाहिले नाही) वैगरे वैगरे अशी अनेक वाक्य आपल्याला भीती जणू घालण्यासाठी तयारच करून ठेववलेली असतात. मात्र अशाही काही गोष्टी, प्रसंग, व्यक्ती असतात ज्यांना आपण लहानपणापासून घाबरत आलेलो असतो किंवा त्यांचा दारारा आपल्या मनात कायम राहतो. म्हणजे अनेकवेळा आपण आपल्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला घाबरत असतो. मात्र अनेकदा तर काही अशां अफवा पसरतात कि आपोआपच आपल्या मानता एक प्रकारची भीती निर्माण होते आणि आपण स्वतःहूनच सावध राहत असतो.
थोड्या-बहुत फरकाने प्रत्येकाने आप-आपल्या लहानपणी अशाप्रकारचा दरारा अनुभवला असलेच. मला आठवतंय माझ्या लहानपणी “किडनॅपिंगच्या गाडी”चा दरारा. 
आमचे गाव तसे डोंगराळ परिसरात. अगदीच काही कडेकपऱ्यात वसलेला नाही पण सपाट माळरानावरही नाही. आणि शिवाय गावात दिवसातून अगदी मोजक्याच गाड्या यायच्या. हल्ली अनेकांनी स्कूटर घेतल्या आहेत म्हणून गाड्यांचा सुळसुळाट थोडा वाढला आहे पण माझ्या लहानपनापर्यंत तरी एखादी नवीन गाडी गावात आली तर अख्ख्या गावातील मुले त्या गाडीच्या अवती-भोवती गोळा व्हायची. गावात येणारे रस्ते डांबरी असले तरी त्यावर डांबर कुठे दिसायचीच नाही त्यामुळे येणारी गाडी धुरळ्यावर रंगून आलेली असायची त्यामुळे त्या गाडीच्या आजू-बाजूला जमलेले तमाम मुले त्या गाडीवर साचलेल्या धुरळ्यावर आप-आपले नाव लिहायचे. कधी कधी तर त्या गाडीत बसून गावापासून थोड्या अंतरापर्यंत लांब बसून जायचो आणि एका विशिष्ट ठिकाणी उतरून पुन्हा मागे तेवढेच अंतर पायी चालत यायचो. गाडीत बसण्याचाच आनंद एवढा आनंद असायचा कि परत येताना पाय दुखले तरी त्याचे काही विशेष काही वाईट वाटायचे नाही. कारण गाडीचे विशेष आकर्षण असणाऱ्या आम्हा गावाकडील मुलांना एखादी नवीन व कधीही न पाहिलेली गाडी आली तर मग काय विचारायचीच सोय नाही. असे आमचे गाडीबद्दल त्यावेळी आकर्षण असायचे. असो.
असाच माझ्या गावाकडील एक प्रसंग... मला आता अचूक साल आठवत नाही परंतु बहुतेक मी चौथी-पाचवीला असतानाची गोष्ट असेल म्हणजे २००२-२००३ च्या दरम्यानची. “एक किडनॅपिंगची गाडी गावाबाहेर फिरणाऱ्या मुलांना पकडून घेऊन जाते. या गाडीचा रंग सफेद असतो” अशी एक आमच्याकडे कुणीतरी अफवा पसरवली होती. ही अफवा होती कि खरच अशी सफेद रंगाची किडनॅपिंगची गाडी होती याबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती व नंतरही कधी माहिती झाली नाही. पण या ‘सफेद’ रंगाच्या गाडीचा दरारा आम्हा मुलांवर किमान दीड-दोन वर्षे तरी कायम राहिला हे नक्की. या सफेद रंगाच्या गाडीची भीती आमच्या मनात इतकी रुजली कि आम्ही आमच्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर कुठेही सफेद रंगाची गाडी दिसली तर आम्ही जिथे मिळेल जागा तिथे लपण्याचा प्रयत्न करायचो. कधी-कधी तर रस्त्याच्या बाजू ह्या झाडा-झुडपांत लपताना पायाला टुपले किंवा अंगभर करवंदीच्या काट्यांनी खरचटले तरी आम्ही या साऱ्यांची पर्वा न करता जीव मुठीत घेवून पळायचो व एखाद्या दगडामागे किंवा कोणत्यातरी झाडाच्या मागे लपायचो. असे अनेक दिवस आम्ही त्या सफेद रंगाच्या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ला घाबरत होतो. मात्र दिवसांवर दिवस गेले पण कधीही सफेद रंगाच्या गाडीने कधीही कोणा मुलाला पळवून नेले नाही त्यामुळे दिवसागणिक या ‘किडनॅपिंगच्या गाडी’ची भीती मनातून कमी होत गेली. आणि कालांतराने आम्ही विसरूनही गेलो. पण एव्हाना या गाडीची आम्हाला खूप भीती वाटते हे घरातल्यांना माहित पडले होते त्यामुळे मध्येच कधीतरी आम्हाला घाबरवण्यासाठी या सफेद गाडीचा नेहमी आधार घ्यायचे. पण कालांतराने आम्ही या भीतीपासून मुक्त झालो होतो. किंबहुना ही भीती मनापासून कायमचे निघून गेली होती.
आजही जेव्हा जेव्हा मला लहानपणीच्या या आठवणी आठवल्या कि मग पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते आणि या साऱ्या आठवणी आठवत असताना कधी अचानक गंभीर चेहरा, कधी स्मित हास्य, कधी निराश अशा नानाविध मुद्रा चेहऱ्यावर उमटतात. या मुंबईच्या गजबजलेल्या शहरात रहायला आल्यापासून तर गावाकडील साऱ्या अनमोल क्षणांचे, मजेशीर प्रसंगांचे महत्व अधिकच जाणवू लागले आहे. गावाकडील ते सारे आयुष्य आपण या मुंबईच्या गजबजाटात हरवतो आहोत असेही वाटते. पुन्हा गावाकडे जावून तेच छान निर्मल आयुष्य जगावे असे वाटते.