...आणि शाळेची ती अवस्था पाहून डोळे पाणावले.
परवा मुंबईला येताना एसटी पकडण्यासाठी जिथे एसटी थांबते तिथे आलो... एसटी यायला थोडा वेळ होता म्हणून जवळच असलेल्या माझ्या प्राथमिक शाळेच्या दिशेने गेलो... शाळेच्या दिशेने जाताना शाळेतल्या दिवसातील अनेक गमती-जमती, मजा-मस्ती या साऱ्यांची आठवण झाली... शाळेच्या वऱ्हांड्यात पाऊल ठेवला... मन भरून आलं.. याच वऱ्हांड्यात एकेकाळी दंग मस्ती केली होती... दुपारच्या जेवणाला याच वऱ्हांड्या पंगती लावल्या होत्या... मनातल्या मनात मीच मला विचारलं “ओळखत असेल का वऱ्हांडा मला?”... मग माझ्याच मनाने उत्तर दिले “का नाही ? नक्की ओळखत असेल... भले तू या शाळेला विसरला असशील कदाचित. मात्र हि शाळा अजूनही तुम्हा विद्यार्थ्यांची आठवण काढते.”... शाळेच्या खिडकीचे दरवाजे हळूच उघडले.. खिडकीतून शाळेत डोकावून पहिले तेव्हा दिसलेले चित्र खरच मन हेलावून टाकणारे होते... तीन पायावर उभा असलेला टेबल..त्याला वाळवी लागली होती..त्या टेबलाची कधीही साथ न सोडणारी लाकडी खुर्ची तीलाही वाळवी लागलेली... मागे फळा...त्या फळ्याच्या एका कोपऱ्यात शाळेची पटसंख्या, हजर विद्यार्थी आणि गैरहजर विद्यार्थी यांची आकडेवारी..तीही पुसटशी..बहुतेक एका वर्षापूर्वी लिहिलेली हि आकडेवारी असावी.... फळ्याच्यावर पहिली ते चौथी पर्यंतच्या इयत्तांना जे काही महत्वाचे आहे त्यांचे तक्ते मात्र ते ही धूळ खात वेडेवाकडे लटकलेले... फळ्याच्या एका बाजूला ओल्या खडूने जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची नावे...मात्र ती नावेही आता पुसटशी दिसत होती... फळ्याच्या समोरच्या भिंतीवर एक काचा तुटलेला सरस्वतीचा फोटो...ज्या सरस्वतीचे शाळेत असताना दर शनिवारी नारळ फोडून पूजा केली जायची... शाळेच्या मध्यभागी टांगलेल्या पंख्याला गंज लागलेली... वऱ्हांड्यात टांगलेली घंटाही तिथे नव्हती....शाळेची घंटा वाजविण्याचा मान नेहमी विद्यार्थी प्रतिनिधीला असायचा... माझ्या सुदैवाने तो मान मला चौथीला असताना मिळाला होता.... ”रा.जि.प. शाळा बारशेत” या नावाचा लावलेला फलक तर गायबच होता... अशी एकंदरीत शाळेची दयनीय अवस्था पाहून खूप वाईट वाटले... शाळेत जे गुरुजी शिकवायचे त्यांचीसुद्धा दुसरीकडे कुठेतरी बदली झाली आहे असे कळले...... आयुष्यातील अनमोल ठेवा असणाऱ्यां माझ्या शाळेची झालेली दुरवस्था पाहून मन अगदी हेलावले....
गावातील बहुतांशी कुटुंब मुंबईला स्थायिक झाली आहेत आणि त्यामुळे त्यांची मुलेही मुंबईतील हाय-फाय अशा इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला गेली...त्यामुळे शाळा बंद करण्यापलीकडे कोणताच पर्याय नव्हता... अगदी एक-दोन विद्यार्थी गेल्या वर्षापर्यंत होती मात्र ती हि माध्यमिक शिक्षणासाठी दुसरीकडे गेली..आता मात्र गावातील माझी प्राथमिक शाळा येणाऱ्या-जाणाऱ्या एसटीकडे डोळे लावून पाहत असते...गप्प..शांत..तुटल्या-फाटल्या अवस्थेत पडून असते शाळा... गावावरून शिकून आल्यावर या मुंबईत नोकरी मिळण्यासाठी वणवण करावी लागते म्हणूनच गावातील अनेकजण आप-आपल्या पोराबाळांना मुंबईला शिकवतात..त्यातल्या सर्वांनाच परवडते अशातला भाग नाही.... मात्र आपल्या पोरांच्या आयुष्याचा विचार करून ते आणतात मुंबईला आणि रात्रीचा दिवस करून मेहनत करतात आणि शिकावतात...माझ्या गावासोबत आजूबाजूच्या अनेक गावांची हीच परिस्थिती..... काही मोजके लोकं फक्त मुंबईत चांगले स्थायिक आहेत... बाकी सगळे सकाळी सहापासून रात्री बारा पर्यंत अंगमेहनत करून जगतात... अशी अनेक करणे आहेत शाळा ओसाड पडायला....
आता माझ्या या शाळेच्या दुरवस्थेला कारणीभूत कोण ? गावातील लोकं ? ज्यांनी आप-आपल्या मुलाबाळांना मुंबईला शिकायला आणले कि सरकार ? ज्याने उत्तम दर्जाचे शिक्षण दिले नाही म्हणून येथील लोकांना मुंबईतील शाळा ‘बेष्ट’ वाटली...... जाऊदे ना... कोणी का असेल याला जबाबदार.... पण शेवटी शाळा बंद झाली ती झालीच... आता पुन्हा सुरु होणे कठीणच वाटू लागले आहे...आणि जर सुरु झाली तरी कोण असणार आहे तिथे शिकायला ?
पाणावलेल्या डोळ्यावरून हाथ फिरवला आणि एसटी स्टॅंडच्या दिशेने परत फिरलो... थोड्याच वेळात एसटी आली. एसटीमधून जोपर्यंत शाळा दिसत होती तोपर्यंत वळून वळून शाळेकडे पहिले.... शाळेची पाहिलेली दुरवस्था अजूनही डोळ्यासमोरून जाता जात नाही....