Get it on Google Play
Download on the App Store

राजन आजोबा: माणसं जोडणारा अवलिया


काही माणसांच्या रक्तात प्रेमाचं केमिकल मिक्स झालेलं असावं बहुतेक. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेमळ असतात ही माणसं. अशी माणसं आपल्या वाटेत कायमच भेटत असतात. यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकीच असते. पण अशी माणसं या जगात आहेत हे नक्की. 'माणसं जोडणं' या पलिकडे यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असं काही नसतं. पावलो-पावली निर्दयी माणसांचा ढीग पाहिल्यावर अशा माणसांकडे पाहून मला प्रचंड अप्रूप वाटतं.

'राजन आजोबा' असं टायटल देऊन हे काय भलतंच सांगत सुटलाय, असा प्रश्न मला तुमच्याच चेहऱ्यावर दिसतोय. सांगतो... त्यांच्याबद्दलच सांगतो. ही सुरुवात त्यांच्यासाठीच होती. कारण मी आज ज्या राजन आजोबांबद्दल सांगणार आहे, ते वर उल्लेख केल्याप्रमाणे 'हाताच्या बोटांवर मोजता येतील', अशांपैकी एक आहेत. जगावेगळा माणूस.

राजन आजोबा. वय वर्षे सत्तरी पार. आजोबा वगैरे बोलून त्यांचा अपमान केल्यासारखंच होईल. कारण हे चिरतरुण व्यक्तिमत्व आहे. पण पहिल्यापासून आजोबा बोलण्याची सवय असल्याने आजोबाच म्हणतो.

तेव्हा मी नुकताच पार्ल्यातील हनुमान रोडवरील इमारतींमध्ये पेपरलाईन टाकायला सुरुवात केली होती. माझ्या लाईनमध्ये हनुमान रोडवरील काही इमारती आणि मग माजी महापौर रमेश प्रभूंच्या बंगल्याच्या गल्लीतील काही इमारती होत्या. इथेच आतमध्ये हनुमान रामानंद नावाची पार्ल्यातील प्रसिद्ध सोसायटी आहे. या सोसायटीच्या बाजूला स्मृती नावाची चार मजली इमारत आहे. इथे पहिल्या माळ्यावर राजन आजोबा राहतात.

खरंतर आम्हा पेपर टाकणाऱ्या मुलांचा आणि एखाद्या कस्टमरचा फार फार तर अर्धा मिनिटाचा संबंध. तोही दार उघडा असला तर... अन्यथा पेपर दारात अडकवून किंवा दारातच टाकून पुढचा पेपर टाकण्याच्या घाईत असणारे आम्ही कशाला कुणाशी बोलायला जातोय. पण या राजन आजोबांनी माझ्या घाईत पेपर टाकण्याच्या सवयीला मोडित काढलं आणि त्यांच्या घरात थांबा घेण्यास भाग पाडलं.

ज्या कुणासाठी हा माणूस दार उघडतो, मग तो पेपरवाला असो वा कचरेवाला किंवा दुधवाला... हा प्रत्येकाला काहीना काहीतरी खायला दिल्याशिवाय परत पाठवत नाही. अगदीच काही नसेल, तर चमचभर साखर हातावर ठेवतो आणि पाठवतो. असा हा अवलिया राजन आजोबा.

राजन आजोबांच्या घरात पेपर टाकून एव्हाना एक महिना झाला होता.. पण त्यांची आणि माझी गाठभेट कधी झाली नाही. होणार तरी कशी... मला लवकर कॉलेजला जायचं असायचं आणि त्यामुळे पटापट साडेसहाच्या आत पेपर टाकण्याची धडपड असायची. त्यामुळे मी ज्या वेळेला जायचो, तेव्हा त्यांचं दार बंद असायचं. पण एक दिवशी त्यांनी पकडलंच.

त्याचं झालं असं की, ते रोज लोकसत्ता पेपर घेत. आणि शनिवार-रविवार लोकसत्तासोबत मटा-इंडियन एक्स्प्रेस. मी आठवडाभर त्यांना बरोबर उलट पेपर टाकत होतो. रोज मटा आणि शनिवार-रविवार लोकसत्ता-इंडियन एक्स्प्रेस. अखेर एकेदिवशी राजन आजोबा सकाळी सहा वाजल्यापासूनच दार उघडून बसले. कस्टमर दारात उभा असला की आम्ही समजून जायचो, काल पेपर चुकवलाय आणि आता ओरडा मिळणार. तर राजन आजोबा दारात उभेच होते. या माणसाला त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं. मला थांबवून चांगलाच ओरडा दिला. 'कळत नाही का रे.. आठवडाभर पेपर चुकीचा टाकतोयेस. आज येईल बरोबर-उद्या येईल बरोबर.. असं विचार करत मीही आलो नाही तुझ्या मालकाकडं.' असं वगैरे खूप बोलले. त्यांच्या पुढची इमारत असलेल्या अरिहंत बिल्डिंगमध्ये माझी लाईन संपत असे. मला बोलले, "हा एक पेपर कुणाचाय?"
"बाजूच्या इमारतीतला." मी उत्तर दिलं.
"जा टाकून ये. पण पळू नकोस. परत इथेच ये."

मी अरिंहत इमारतीत पेपर टाकायलो गेलो. माझ्या मनात एकच प्रश्न हा माणूस मनसोक्त ओरडला आणि परत का बोलावलं आहे. झालं की ओरडून. उद्यापासून टाकेन बरोबर. मग आता परत का बोलवलंय? विचार केला, जाऊन तर बघू. मारत तर नाही ना. काय बोलेल ते या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं.

मी परत त्यांच्या घरी आलो. राजन आजोबा दारातच उभे होते. खडसावल्यागतच बोलले, "आत ये."
आत गेलो. प्रशस्त घर. पांढरी शुभ्र लादी. मी आपला पेपर टाकून घामाघूम झालेलो.. पाय घामाने चिघळलेले... दारातच पायपुसणीवर उभा राहिलो. आत पाऊल टाकलं तर त्या लादीवर पायाचे ठसे उमटतील. म्हणून गप्पपणे तिथे उभा होतो. पण राजन आजोबांनी माझ्या खांद्याला पकडत आत नेऊन डायनिंग टेबलची एक खुर्ची मागे खेचली आणि त्यावर बसण्याचा इशारा केला. मी बसलो. ते समोर बसले.

काय करतो, कुठे काम करतो वगैरे चौकशा केल्या. साठ्ये कॉलेजमध्ये आहे म्हटल्यावर त्यांनी त्यांचे आणि प्राचार्या रेगे मॅडमचे घरचे संबंध असल्याचे वगैरे सांगितलं. बोलण्यातून राजन आजोबा उलगडत गेले. त्यांच्याबद्दलची गेल्या पाच-सात मिनिटांत तयार झालेली प्रतिमा गळून पडली. हा माणूस रागीट नाहीय. मला पेपर चुकीचा टाकण्यावरुन खडसावलं, तीही मस्करीच होती, हे मला नंतर कळलं. असंच काहीही निमित्त काढून ते माणसं जोडत असत, हे काही दिवसांनी कळलं.

तर तेव्हा चहा घेऊन मी तिथून निघालो.. मात्र, कायमचं नातं जोडूनच.

त्यानंतर नेहमी राजन आजोबांकडे जाणं सुरु राहिलं. तोंड गोड केल्याशिवाय त्यांच्या घरातून कधी माघारी आलोय, असं आठवत नाही. एकदा तर आजी घरी नव्हत्या.. आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो.. आजोबांना काही बनवता येत नाही. तर म्हणे, "आज काय मिळणार नाही आपल्याला.. माऊली घरात नाहीय." माऊली म्हणजे आजी. राजन आजोबा पत्नीला माऊली म्हणतात. तरी ते किचनमध्ये गेले आणि पाण्याचे दोन ग्लास आणि पारले जी बिस्किटचा एक पुडा घेऊन आले. म्हणे, "पाण्यात बुडवून खाऊया. आज हीच पार्टी आपली."

प्रेम वाटत जाणं आणि माणसं जोडत जाणं, हेच या माणसाच्या आयुष्याचं ध्येयं आहे.

मी काही एकटाच असा नाही.. असे अनेकजणांशी त्यांनी नातं जोडलंय. राजन आजोबा खरा श्रीमंत माणूस आहे. आपल्या प्रत्येकालाच आपल्या वाटेत असे 'राजन आजोबा' भेटतात. थोड्या वेगळ्या रुपात, वेगळ्या पद्धतीने आपलं प्रेम वाटणारे वगैरे. पण असतात हे नक्की.

आज संध्याकाळी ऑफिसखाली चहा प्यायला गेलो होतो, तिथे पाण्यात बिस्किट बुडवून खात असलेला एकजण पाहिला.. त्यावरुन राजन आजोबा आठवले. मग म्हटलं, आज लिहितोच. तेवढाच आठवणींना उजाळा!