नारायण पवार
अनेकदा जनतेत काम करणाऱ्यांना जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतच नाही. कधी-कधी म्हणण्यापेक्षा अनेक वेळा असंच म्हणूया. कधी संधी मिळालीच तर तीही अगदी नगण्यच असते, असे एकंदरीत चित्र आपल्या आजूबाजूला दिसून येतं. अशांपैकीच एक म्हणजे आमच्या गावचे माजी सरपंच नारायण तानाजी पवार.
गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन मुंबईतला व्यवसाय सोडून गावी परतलेले नारायण पवार म्हणजे एक अवलियाच. मुळात ‘शिक्षण हे श्रीमंतांनी घ्यायचं असतं’ अशी आमच्या खेडेगावत एकेकाळी शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी होती त्या काळी नारायण अण्णांनी मॅट्रिक पूर्ण केली. शिक्षणात हुशार असलेला हा मुलगा गावातील व पंचक्रोशीत नाव उज्वल करु लागला. गावातील अनेक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन सक्रियता दाखवू लागला. आणि बघता बघता पंचक्रोशीत या तरुण-तडफदार तरुणाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. मात्र, गावातील इतरांसारखी स्वत:चीही परिस्थिती बिकट. घरातील सहा-सात डोकी त्यांच्याकडे आशेने पाहणारी होती. त्यामुळे गाव सोडून मुंबईत काम करुन पैसा कमवून पोट सांभाळण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आणि ते मुंबईत आले. मात्र, जनतेची कामं करण्यात जो मानसिक आनंद त्यांना मिळत होता मुंबईत काम करण्यात नव्हता. आणि एव्हाना नारायण अण्णांची दोन्ही मुलेही आपापल्या आयुष्यात स्थिरावली होती. त्यामुळे जनतेची सेवा करण्याचं जे स्वप्नं त्यांनी पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची हीच वेळ होती. व ते थेट गावी निघून आले आणि गावीच स्थायिक झाले.
नारायण तानाजी पवार |
शिवरायांच्या जाज्वल्य आणि प्रेरणादायी इतिहासाचा वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातलं रोहा तालुक्यातलं एक खेडं म्हणजे बारशेत. याच गावी नारायण अण्णा लहानाचे मोठे झाले. बारशेत गावासोबतच आजूबाजूच्या चाळीस-पन्नास गावांमध्ये अण्णांना आदराचं स्थान आहे. अनेक गावांमध्ये नारायण अण्णांच्या शब्दाला मान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षासोबत ते काम करत असले तरी वेळप्रसंगी पक्षाचा झेंडा खांद्यावरुन खाली उतरवायलाही ते मागे-पुढे पाहणार नाहीत असे त्यांचं व्यक्तीमत्व. आपल्याकडी अशिक्षित लोकांना कोर्ट-कचेऱ्यांमध्ये फसवले जाते त्यामुळे त्यांची कामं झाली पाहिजेत, असे त्यांचं म्हणणं असतं. तहसील कार्यालयातील कामं असो वा पोलिस ठाण्यातील किंवा ग्रामपंचायतींची. शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास केला असल्याने त्या योजना लोकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवायच्या याकडे त्यांचं नेहमी लक्ष असतं.
गावचं घर माझ्या घराशेजारी असल्याने त्यांच्या घरातील लोकांचा राबता नेहमी पाहावयास मिळतो. नारायण अण्णा घरात आहेत आणि त्यांना कोणी भेटायला आलं नाहीत असे झालेलं माझ्या तरी
पाहण्यात नाहीत.
खांद्यावर राष्ट्रवादीचा
झेंडा मात्र कामं अगदी एखाद्या कामगार नेत्यासारखी. प्रभावशाळी वक्तृत्व, बोलताना समोरच्याचं मन
जिंकून, मुद्देसूद बोलून आपलं म्हणून पटवून देण्याची त्यांची शैली. आमच्या
बारशेतसारख्या डोंगर-कपारीत वसलेल्या गावाचे सुपुत्र नारायण अण्णा आता पंचायत
समितीच्या निवडणुकीत उभे राहिलेत. खरंतर घराणेशाहीच्या आणि ओळखीपालखीच्या राजकारणात
नारायण अण्णांसारख्या माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे माझ्यासारख्या
तरुणाला दखल घेण्यासारखी बाब वाटते. सरपंचपदापासूनचा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असाच आहे.
पंचायत समिती सदस्य हे
पद काही मोठे नसेलही मात्र आमच्या खे़डेगावाला नेतृत्वाची संधी मिळेत हे खूप मोठे
आहे. कदाचित यापुढे अण्णांना आणखी मोठी संधी मिळेल, या आशेने गावतील व
पंचक्रोशीतील अनेकजण पाहत आहेत. एका विशिष्ट घराण्याच्या हातात व ओळखीशिवाय तिकीट
नाही अशा घाणेरड्या राजकारणात अडकलेलं रायगड जिल्ह्याचं राजकारण आहे. मात्र
अण्णांसारख्या जनप्रतिनिधिंनी पुढे येण्याची किंवा अशा जनप्रतिनिधींना जनतेने पुढे
आणण्याची गरज आहे.
अण्णा, पंचायत समितीच्या
निवडणुकीत तुमचा विजय होवो आणि कायम दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या भागाचा विकास
होवो हीच इच्छा !