Get it on Google Play
Download on the App Store

रामटेकचा वीर विघ्नेश



शंकर आणि गणपती यांचा संबंध दाखविणारा रामटेकचा वीरविघ्नेश वैशिष्ट्यपूर्ण आहे. नागपूरपासून जवळच असलेले रामटेक हे राममंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथेच गडाच्या पायथ्याशी आणि प्रदक्षिणेच्या मार्गात गणपतीचे मंदिर आहे. हा गणपती वीरविघ्नेश नावाने ओळखला जातो. मंदिरातील मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि तंत्रशास्त्राच्या दृष्टीने महत्वाची आहे.
चार हातांची गणेश मूर्ती आपण नेहमीच बघतो पण या मूर्तीला अठरा हात आहेत. अठरा हात असलेली ही भारतातील एकमेव मूर्ती असावी. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे शंकराच्या आणि गणपतीच्या मूर्तीतील वैशिष्ट्ये एकत्रितपणे या मूर्तीमध्ये दिसतात. या मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग आहे. तसेच गळ्यात आणि कमरेलासुद्धा नाग धारण केले आहेत. मूर्तीने अनेक शस्त्रे धारण केली आहेत. त्रिशुळ, परशु, अंकुश, पाश, तलवार, खटवांग, मोदक, कमळ आणि एका हातात मोरपंखाची लेखणी घेतलेली ही मूर्ती बघणार्‍यांचे मन मोहित करते.