किल्ल्याची रचना
राजा हेरोड याने ख्रिस्तपूर्व ३७ ते ३१ या कालावधीत हा किल्ला बांधला. राजा ज्यू जनतेत प्रिय नसल्यामुळे त्याने स्वतःला सुरक्षित राहता यावे म्हणून खूप मजबूत बांधला व सर्व सुखसोयी केल्या होत्या. साधारण किल्यांना असलेले तट हे जाडे पण एकेरी भिंतीचे असतात. या किल्ल्याचे तट जाड दुहेरी –आतील व बाहेरील-भिंतींचे, मध्ये आडव्या भिंती बांधून अनेक लहानमोठ्या खोल्या बनवलेले, असे आहेत. भिंतीची एकूण लांबी १४०० मीटर आहे. जागजागीं बुरूज आहेत. आतील व बाहेरील भिंतींमध्ये ४ मीटर रुंद खोल्या असून वर जाड छप्परहि आहे. या खोल्यांमधून राहण्यासाठी, धान्य वा इतर सामुग्री साठवण्यासाठी सोयी केलेल्या अजूनहि पहावयास मिळतात. पाणी साठवण्यासाठी सोयी आहेतच पण पाणी मिळवण्यासाठी अतिशय कल्पक योजना केलेल्या आहेत. सर्व बाजूंच्या दुहेरी भिंतींच्या आत असलेल्या पठारावर पडणारे थोड्याफार पावसाचे पाणी तर अडवले जातेच व जमिनीखाली खोदलेल्या गुहांमध्ये साठवले जाते पण तेवढ्याने भागणार नाही म्हणून पश्चिमेकडल्या इस्रायलच्या मुख्य भूभागावर कधीनाकधी तुरळक पडणार्या पावसाचे पाणीहि कौशल्याने अडवून, तुटलेल्या कड्याच्या काठाने उतरते पाट बांधून काढून ते पाणी किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या कड्यावर मोठाल्या गुहा खोदून त्यात आपोआप वाहून येईल अशी अतिशय कल्पक योजना केलेली आहे त्यामुळे किल्ल्यावरच्या वस्तीला पाण्याचा तुटवडा कधीच भासला नाही. उलट किल्ल्यावर बाष्फस्नानासाठी देखील छान सोयी केलेल्या आहेत. किल्ल्याच्या उत्तर टोकाला हेरोडचा मोठा राजवाडा होता व तेथून अवघड वाटेने थोडे खाली उतरून जाऊन छोट्या पठारावर हवामहाल, कारंजीं अशी राजेशाही सोयही केलेली होती.
किल्ल्यावर येण्यासाठी पूर्व बाजूने एकच वळणावळणाची पाउलवाट आहे तिला सर्पवाट म्हणत. ती किल्ल्यावर जेथे पोचते तेथे अर्थातच तटामध्ये एक मजबूत दरवाजा आहे. इतर कोठूनहि किल्यावर चढता येत नाही. पश्चिम बाजूला आणखी एक दरवाजा आहे. मात्र तेथपर्यंत पोचणारा रस्ताच नाही. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला एक मजबूत बुरुज आहे.
किल्ल्यावर येण्यासाठी पूर्व बाजूने एकच वळणावळणाची पाउलवाट आहे तिला सर्पवाट म्हणत. ती किल्ल्यावर जेथे पोचते तेथे अर्थातच तटामध्ये एक मजबूत दरवाजा आहे. इतर कोठूनहि किल्यावर चढता येत नाही. पश्चिम बाजूला आणखी एक दरवाजा आहे. मात्र तेथपर्यंत पोचणारा रस्ताच नाही. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला एक मजबूत बुरुज आहे.