मासाडा किल्ल्याची निर्मिती
आपणापैकी बहुतेकाना वाचून माहीत असते कीं येशू ख्रिस्ताच्या काळी, सध्या ज्याला इस्रायल म्हणतात त्या ज्यू धर्मीय लोकांच्या मूळ देशात रोमनांची अधिसत्ता होती. ज्यूंचा राजा हा रोमन सम्राटाचा मांडलिक होता. रोमन हे काही ज्यू धर्मीय नव्हते. त्यांच्या धर्मकल्पना वेगळ्याच होत्या. ज्यू लोक त्याना PAGAN किंवा पाखंडी म्हणत. त्या काळी ज्यू धर्माचे स्वरूप विकृत झाले होते व अनेक अनिष्ट प्रथा आचरणात आल्या होत्या. ख्रिस्त हा मुळात ज्यू धर्मीयच, पण एक प्रकारे ज्यू धर्माचा धर्मसुधारक होता. त्यामुळे त्याला ‘पाखंडी’ ठरवून ज्यूंच्या पुढार्यानी त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा द्यावी अशी मागणी रोमन सम्राटाचा प्रतिनिधी पिलात याचेकडे केली. तो राजद्रोही आहे असाहि त्याच्यावर आरोप केला. त्याने ती नाखुशीनेच मान्य केली व अमलात आणली. हेरोड हे ज्यूंच्या तेव्हांच्या रोमनांचा मांडलिक असलेल्या राजाचे नाव होते. त्याने ख्रिस्ताला सुळावर चढवण्याच्या मागणीचा निर्णय स्वतः न घेतां, पिलातवर ढकलला होता. तो ज्यूंमधेहि फारसा लोकप्रिय नव्हताच. मसाडा या किल्ल्याची निर्मिति हे या हेरोड राजाचे कर्तृत्व मानले जाते.
इस्रायलमध्ये डेड-सी अथवा मृत समुद्र हा एक निसर्गचमत्कार आहे हेहि सर्वज्ञात आहे. मृत समुद्र हे एक अतिशय खार्या पाण्याचे मोठे सरोवर आहे. हा भूप्रदेश पृथीवरील सर्वात खाली असलेला आहे. हा जगभरच्या समुद्रसपाटीच्या पेक्षा ४०० मीटर खालीं आहे. जॉर्डन ही इस्रायलमधील नदी या मृतसमुद्राला येऊन मिळते. येवढा खोल असलेल्या या भूभागातून पाणी कुठेहि बाहेर वाहून जाऊन समुद्राला मिळू शकत नाही. या भागात पाऊसहि फार नाही त्यामुळे या समुद्राला नवीन पाण्याची भर थोडीच मिळते. उन्हाळा कडक असल्यामुळे बाष्पीभवन फार होते. परिणामी मृतसमुद्राचे पाणी अतिशय खारट आहे व त्याची घनताहि खूप जास्त आहे. त्यामध्ये मनुष्य बुडूं शकत नाही! हे वर्णनहि आपणास फारसे नवीन नाही. जॉर्डन नदीचे खोरे हे बहुतांशाने समुद्रसपाटीच्या खाली आहे त्यामुळे काठावरचा भूप्रदेश समुद्रसपाटीवरच वा त्याहून फारसा उंच नसूनही तेथून या समुद्राकडे खूप उंच, तुटलेले कडे आहेत. अशाच एका तुटलेल्या कड्यांनी वेढलेल्या भूभागावर ‘मसाडा’ हा हेरोडने बांधलेला प्राचीन किल्ला आहे. प्रत्यक्षात किल्ल्यावरची जमीन जवळपास समुद्रसपाटीवर आहे इतर किल्ल्यांप्रमाणे डोंगरावर नाही. मात्र या किल्ल्याच्या पूर्वेकडील तटांवरून सरळ ४०० मीटर खाली मृतसमुद्राचे दक्षिण टोक येते. पश्चिम व इतर बाजूंना १०० मीटरचे तुटलेले कडे आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्यायेण्याचे मार्ग अगदी थोडे व अवघड आहेत. किल्ल्याचे वरचे पठार साधारण Rhombus आकाराचे असून उत्तर-दक्षिण ६०० मीटर x पूर्व-पश्चिम ३०० मीटर एवढे त्याचे क्षेत्र आहे.