रामायण बालकांड - भाग २
सुरवातीच्या सर्ग १ मध्ये नारदाने वाल्मिकीला रामकथा सांगितली आहे. वाल्मिकीने नारदाला विचारले कीं सांप्रत सर्वगुणानी संपन्न असा कोण पुरुष आहे? त्यावर नारदाने राम असे म्हणून त्याचे वर्णन केले व संक्षिप्त रामकथा सांगून ’सद्ध्या राम व सीता अयोध्येत राज्य करीत आहेत’ असे म्हटले. वर्तमानकाळाचा वापर दर्शवितो कीं रामाने सीतेचा त्याग करण्याअगोदरची ही घटना आहे. राम दीर्घकाळ राज्य करील असे नारदाने म्हटले. या अतिसंक्षिप्त रामकथेत व पुढील विस्तृत रामायणामध्ये साहजिकच काही फरक दिसून येतात. राम वनात गेला तेव्हा दशरथ त्याला पोचवण्यासाठी दूरवर बरोबर गेला असे येथे म्हटले आहे! रामाने विश्वामित्राबरोबर जाणे, ताटकावध, धनुर्भंग वगैरे येथे काही नाही! वालीसुग्रीवाची राजधानी किष्किंधा हिचे वर्णन ’गुहा’ असे केले आहे.
दुसर्या सर्गामध्ये प्रख्यात असा क्रौंचवधप्रसंग व वाल्मिकिची पहिल्या ’मा निषाद प्रतिष्ठां त्वम …’ या श्लोकाची रचना वर्णिली आहे. आपण काहीतरी नवीनच केले असे वाल्मिकीला वाटले तेव्हाच खुद्द ब्रह्मदेवाने प्रगट होऊन श्लोकरचनेबद्दल वाल्मिकीचे अभिनंदन केले व तसे करण्याची मीच तुला प्रेरणा दिली, आता संपूर्ण रामकथा तूं श्लोकबद्ध कर अशी त्याला आज्ञा केली. रामायण रचनेमागची ही पार्श्वभूमि या दोन सर्गांत वर्णिली आहे.
सर्ग तीन मध्ये रामायणाची सर्व कथा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपांत वाल्मिकीने स्वत:च्या शब्दांत सांगितली आहे. येथे मात्र कथेचा शेवट प्रजेच्या समाधानासाठी रामाने सीतेचा त्याग करण्यापर्यंत नेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. रामाने त्यागिल्यानंतर सीता दीर्घकाळपर्यंत वाल्मिकीच्याच आश्रमात राहिली व लवकुशांचा जन्म व सर्व संगोपन तेथेच झाले त्यामुळे राम-सीता यांनी दीर्घकाळपर्यंत राज्य केले हा नारदाने सांगितलेला रामकथेचा शेवट खरा नाही हे वाल्मिकीला ठाऊकच होते. पहिला सर्ग व तिसरा सर्ग यांमध्ये १३-१४ वर्षांचा काळ लोटला असे दिसते. कदाचित नारदाने रामकथा सांगितली तेव्हा राम-सीता आता दीर्घकाळ राज्य करतील अशी नारदाची अपेक्षा असावी !
उत्तर-रामचरित्र हा रामायणाचा भाग मानावयाचा कीं नाही हा एक विद्वानांचा वादविषय आहे अशी माझी कल्पना आहे. रामायण वाल्मिकीने प्रथम रचले व लवकुशांना शिकविले तेव्हा सीतेच्या त्यागाचा सुरवातीचा कथाभाग त्यांत कदाचित समाविष्ट असावा. लवकुशांनी अयोध्येत जाऊन ते लोकांना व नंतर खुद्द रामाला ऐकविले. त्यानंतर राम स्वत: वाल्मिकीच्या आश्रमांत आला, सीतेची भेट झाली व वाल्मिकीने सीतेबद्दल सर्वतोपरी आश्वासन दिले तरीहि रामाने सीतेचा स्वीकार केला नाहीच व संशयही पूर्णपणे सोडला नाही. तेव्हां निराशेने सीता भूमिगत झाली व शोकाकुल राम लवकुशांना घेऊन अयोध्येला परत गेला हा अखेरचा कथाभाग तर मूळ रामायण रचनेच्या वेळी घडलेलाच नव्हता त्यामुळे तो मूळच्या रामायणांत समाविष्ट असण्याचा संभवच नाही. मात्र त्यानंतर केव्हातरी वाल्मिकीने स्वत:च वा इतर कोणाकडून तरी हा कथाभागहि रामायणात समाविष्ट केला असावा. अर्थात तो रामकथेचा अनिवार्य भागच आहे. रामाने सीतेचा केलेला कायमचा त्याग हा योग्य कीं अयोग्य, न्याय्य कीं अन्याय्य हा एक कूट्प्रष्न आहे व रामावर अतीव श्रद्धा बाळगणारांनाहि तो अवघडच आहे.
वाल्मिकीने श्लोक व अनुश्टुभ छंद पहिल्याने रचला कीं इतर पूर्वींची कांही रचना त्या छंदांत आहे हे मला माहीत नाही. मात्र वेद, उपनिषदे रामायणाच्या खूप पूर्वींचीं व त्यांत काव्यमय व गेयहि रचना – सूक्तें- आहेत अशी माझी समजूत आहे. तसे असेल तर मग रामायणाला आदिकाव्य कां म्हणतात असा मला प्रश्न आहे.
सर्ग ४ मध्ये वाल्मिकीने सर्व रामकथा सात सर्गांत रचली असे म्हटले आहे व त्यांत उत्तरकांडाचाही समावेश आहे. नंतर तें लवकुशांना शिकवले गेले व त्यांचेकडून त्याचे गायन फार परिणामकारक होते असे सर्व मुनिगणांचे मत होऊन सर्वांनी त्याना कौतुकाने त्यांना काही भेतवस्तू दिल्या. त्यांत छाटी, लंगोटी, रुद्राक्षांची माळ अशा नामी वस्तूंचा समावेश होता! लवकुश अयोध्येच्या रस्त्यांतून रामायण गात फिरत असतांना खुद्द रामानेच त्यांना दरबारांत नेऊन त्यांचे कौतुक व सन्मान केला व सर्व रामायण गाण्याची त्यांना आज्ञा केली. त्यावेळी त्यांनी गाइलेली रामकथा म्हणजे पुढील सर्व सर्गांत व उत्तरकांड सोडून इतर कांडांत आलेले रामायण होय. इथून पुढे, लवकुशांचा वा दरबाराचा उल्लेख न करतां सर्व रामकथा क्रमवार सांगितली आहे. सर्वसाधारणपणे सर्व रामकथा आपल्या सर्वांच्या भरपूर परिचयाची असल्यामुळे ती सर्व क्रमाने सांगण्याचा माझा विचार नाही. रामायण वाचताना कित्येक ठिकाणी आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात व आपले दीर्घकाळचे काही समज चुकीचे असल्याचे दिसून येते. बालकांडांतील व पुढे इतर कांडांतीलहि अशा प्रसंगांवर लिहिणार आहे.