कृष्ण-कर्ण संवाद - भाग २
कृष्ण उपप्लव्याहून शिष्टाईसाठी निघाला त्यादिवशी ‘रेवती’ नक्षत्र होते असा उल्लेख आहे. मार्गात एकच रात्र कृष्णाने मुक्काम केला व दुसर्या दिवशी तो हस्तिनापुराला पोचला असे म्हटलेले आहे. त्या दिवशी दुर्योधनाचे आतिथ्य नाकारून तो विदुराकडे मुक्कामाला राहिला. तिसरे दिवशी कौरवदरबारात शिष्टाई झाली. संध्याकाळपर्यंत ती अयशस्वी ठरून कृष्ण विदुराकडे परत येऊन कुंतीला भेटला व मग पांडवांकडे परत निघाला. या दिवशी ‘भरणी’ नक्षत्र असणार कारण रोज एक नक्षत्रातून चंद्र पुढे जातो. हा कार्तिक मास होता हे गृहीत धरल्यास अमावास्येला चंद्र ‘ज्येष्ठा’नक्षत्रापर्यंत पोचणार होता. (पौर्णिमेला-शिष्टाईच्यादुसर्या दिवशी-तो कृत्तिका नक्षत्रात पोचणार होता कारण हा कार्तिकमास). ‘भरणी’ पासून ‘ज्येष्ठा’पंधरा नक्षत्रे पुढे आहे! तेव्हां शिष्टाईच्या या दिवसापासून आठच दिवसानी अमावास्या येणे शक्यच नाही! तेव्हां जर कृष्णाने ‘आठ दिवसांनी अमावास्या आहे त्या दिवशी युद्ध सुरू करूं’ असे कर्णाला म्हटले असेल तर हा संवाद झाला त्या दिवशी ‘मघा’ किंवा ‘पूर्वा’ नक्षत्र असले पाहिजे होते जे शिष्टाईच्या दिवशीच्या भरणी नक्षत्रानंतर ७-८ दिवसांनी येणार होतें! तोंवर कृष्ण हस्तिनापुरात होता कोठे? तो केव्हाच परत गेला होता! कृष्ण शिष्टाईच्याच दिवशी परत गेला असला पाहिजे असे दुसर्या संदर्भावरूनहि निश्चित ठरते. पांडवांकडे तो परतल्यावर मग शिष्टाईबद्दल सर्व चर्चा झाली, युद्ध अटळ आहे हे स्पष्ट झाले, मग पांडवपक्षाच्या सर्व वीरांची बैठक झाली, चर्चेअंती धृष्टद्युम्नाला सेनापति नेमले गेले, पांडव वीर व सैन्य कुरुक्षेत्रावर पोचले, रुक्मीने येऊन सहाय्य देऊ केले ते पांडवानी उडवून लावले व तो निघून गेला वगैरे घटना घडल्या. मग बलराम शिबिरात आला व युद्ध होणारच हे कळल्यावर,‘मला हे युद्ध पहावयाचे नाही म्हणून मी तीर्थयात्रेला जातो’असे कृष्णाला व पांडवाना म्हणून लगेच शिबिर सोडून गेला. येथे नक्षत्राचा उल्लेख नाही. तो नंतर भीम-दुर्योधन गदायुद्ध १८व्या दिवशी झाले तेव्हां उपस्थित झाला. त्याने तेव्हां मात्र म्हटले कीं ‘मी पुष्य नक्षत्रावर निघालो होतो तो आज श्रवण नक्षत्रावर (४२ दिवसानी) परत येतो आहे.’अर्थ इतकाच कीं पुष्य नक्षत्राच्या बलराम-पांडव भेटीच्या व आधीच्या पांडवशिबिरातील वर वर्णन केलेल्या सर्व घटनांच्या दिवशीहि कृष्ण पांडवांच्या शिबिरात होता. ‘भरणी’ नक्षत्राच्या शिष्टाईच्या दिवसापासून या सर्व घटनांमध्ये ४-५ दिवस गेले होते. मग कृष्ण कर्णाला भेटला असेलच तर यानंतर दुसर्या वा तिसर्या दिवशी, मघा वा पूर्वा नक्षत्राच्या दिवशीं, गुप्तपणे भेटला काय?