कृष्ण – कर्ण संवाद- भाग १
कौरव-पांडव युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात जाऊन पांडवांची बाजू मांडून आटोकाट प्रयत्न केले. दुर्योधनाने अज्ञातवास पुरा केल्याचा पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व राज्य पाहिजे तर आणखी बारा वर्षे वनवास करा असा जबाब दिला. शिष्टाई असफल झाल्यानंतर परत जाताना कृष्णाने कर्णाला आपल्याबरोबर आपल्या रथावर घेऊन वाटेत त्याला ‘तूं कुंतीपुत्र आहेस म्हणून दुर्योधनाची बाजू सोडून दे व पांडवपक्षात ये’ असे आवाहन केले. मात्र ते कर्णाने नाकारले. अखेर त्याचा निरोप घेताना कृष्णाने ‘ आठ दिवसानी अमावास्या आहे, त्या दिवशी कुरुक्षेत्रावर भेटूं व युद्ध सुरू करूं’असा कौरवांसाठी निरोप दिला व मग कृष्ण पांडवांकडे परतला असा कथाभाग महाभारतात आहे. तो सर्वसाधारणपणे खरा मानला जातो व मलाहि तसे पूर्वी वाटत होते. मला एकच प्रश्न पडला होता कीं कर्णाचे जन्मरहस्य कृष्णाला कसे माहीत असणार? त्यावर मलाच सुचलेले उत्तर असे होते कीं शिष्टाई विफल झाल्यावर संध्याकाळी, परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला होता तेव्हां खुद्द कुंतीनेच हे रहस्य कृष्णाला सांगून ‘अवश्य तर हे तूं कर्णाला सांग पण कर्ण व पांडव या भावांचा युद्धप्रसंग टाळ’असे त्याला म्हटले असेल! (कर्णाने कृष्णाला दाद दिली नाही असे कळल्यावर मग तिने अखेरचा प्रयत्न म्हणून स्वतःच कर्णाची भेट घेतली व ‘तूं माझा पुत्र आहेस तेव्हां कौरवांची बाजू सोड’असे विनवले, तेहि कर्णाने मानले नाहीच.) या कृष्ण-कर्ण भेटीनंतर आठ दिवसानी कार्तिक अमावास्या होती व त्या दिवशी युद्ध सुरू झाले असे मानले जाते पण हा कालानुक्रम व घटनाक्रम खरा आहे काय? कित्येक उल्लेख याचेशी विसंगत आहेत.