Get it on Google Play
Download on the App Store

अभिमन्युवध - भाग १

अभिमन्यूचा वध ही भारतीय युद्धातील एक फार महत्त्वाची घटना आहे. कारण आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चिडून जाऊन अर्जुनाने जयद्रथाचा दुसऱ्या दिवशींच वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि दिवसभर जयद्रथाचे अर्जुनापासून संरक्षण करण्याचा कौरवांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते जयद्रथाला वाचवू शकले नाहीत. अर्जुनापुढे आपले कोणाचेच काही चालत नाही हे त्याना कळून चुकले. जयद्रथाच्या वधाबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे आतां त्याची पार्श्वभूमी असलेल्या अभिमन्यू वधाबद्दल लिहिणार आहे.
युद्धाचे पहिले दहा दिवस भीष्म कौरवांचा सेनापती होता. त्याने प्रथमच दुर्योधनाला सांगितले होते कीं मी एकाही पांडवाला मारणार नाही. दहा दिवसात पांडव पक्षाचा एकही प्रमुख वीर मेला नव्हता. भीष्माने पांडव सैन्याचा मात्र फार संहार केला होता. भीष्म शरपंजरी पडल्यावर त्याने दोन्ही पक्षांना युद्ध संपवा असें विनवले होते. मात्र ते शक्य नव्हते. भीष्म पडल्यावर दुर्योधनाने द्रोणाला सेनापती होण्यास विनवले. त्याने ते स्वीकारले. येथून पुढे डावपेचाचे युद्ध झाले. सुरवातीलाच द्रोणाने दुर्योधनाला विचारले कीं तुला काय हवे आहे. त्यावर दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला पकडावे. द्रोणाने आनंद व्यक्त केला कीं ‘तू युधिष्ठिराला मारुं इच्छित नाहीस.’ दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला मारून युद्ध संपणार नाही, इतर पांडव आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. युधिष्ठिराला पकडले तर मी त्याला पुन्हा द्युत खेळायला बसवीन व पुन्हा वनवासाला धाडीन.’ द्रोणाला हा विचार पसंत पडला कारण पांडवाना मारण्याचे अप्रिय काम यामुळे टळणार होते. द्यूत खेळणे योग्य कीं अयोग्य याचा विचारही त्याला पडला नाही. तेव्हा त्याने मान्य केले कीं ‘मी युधिष्ठिराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करीन मात्र अर्जुन त्याचे संरक्षण करण्यास उपस्थित असेल तर हे शक्य होणार नाही. तेव्हां त्याला काही करून दूर ठेवा.’ दुर्योधनाने हे मान्य केले. पुढील तीन-चार दिवस कौरवांचा हा मुख्य युद्धहेतू राहिला व सर्व युद्धबेत त्याप्रमाणे ठरले. ही गोष्ट अर्थातच पांडवाना समजलीच व त्यांनीही युधिष्ठिराचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले.