धृष्टद्युम्न व द्रौपदी यांचा जन्म
सर्व पात्रे मानवी आहेत अशी भूमिका घेतली तर धृष्टद्युम्न व द्रौपदी यांचा जन्म यज्ञातून झाला ही कल्पना सोडून द्यावी लागते. या कथेतील सर्व अद्भुत भाग दूर सारला तर हीं दोघे प्रत्यक्षात द्रुपदाचींच (कदाचित अनार्य स्त्री पासून झालेलीं !) अपत्यें असावीं पण अद्याप त्यांचा राजकुळात समावेश नसावा व यज्ञ करून द्रुपदाने तो ब्राह्मणांच्या व नागरिकांच्या साक्षीने व संमतीने सन्मानपूर्वक करून घेतला, असे या कथेचे मूळ स्वरूप मला वाटते. दोन्ही मुलांचा कृष्णवर्ण हेच सुचवतो. द्रुपदाला हा यज्ञ करण्यासाठी प्रथम कोणी ब्राह्मण मिळत नव्हता. याज व उपयाज अशी एक ब्राह्मणांची जोडी होती. द्रुपदाने प्रथम उपयाजाला विचारले. त्याने नकार दिला पण सुचवले की तू याजाला विचार, तो योग्यायोग्य फारसे पाहत नाही. तो तुझा यज्ञ करील! असे दिसते की यज्ञाला ब्राह्मण अनुकूल नव्हते व याजाने तो बहुधा द्रव्यलोभाने करून दिला! यज्ञ करण्याचा हेतु वर तर्क केल्याप्रमाणे असेल तर हे सयुक्तिक वाटते! पूर्वी दशरथाने पुत्रांसाठी यज्ञ केला त्याला कोणी गौण मानले नव्हते. मात्र एकदा याजाने यज्ञ करून दिल्यानंतर, दोन्ही अपत्ये द्रुपदाच्या घरात व समाजातहि सन्मानाने स्वीकारली गेली तेव्हा द्रुपदाचा हेतु सफळ झाला असे म्हणावे लागते. यज्ञामुळे स्वत:ला अपत्य झाले नाही याचा विषाद न मानता राणीने याजाला विनवले की यांनी मलाच आई म्हणावे. यावरून असे वाटते कीं त्यांची खरी आई हयात नसावी. यांनी स्वत:च्या खऱ्या आईला विसरावे अशीहि इच्छा तिने व्यक्त केली. जणू तिने त्यांना दत्तक घेतले! धृष्टद्युम्न यानतर द्रोणापाशी धनुर्विद्या शिकला असे मानले जाते. ते खरे वाटत नाही. कौरव-पांडवांचे शिक्षण पुरे झाले होते. द्रोणाचा बदल्याचा हेतुही पुरा झाला होता. त्याची अकादमी केव्हाच बंद झाली होती!
धृतराष्ट्राने युधिष्ठिराला यौवराज्याभिषेक केला. नंतर बऱ्याच काळाने पांडव वारणावतास गेले व एक वर्ष तेथे राहून मग वाड्याला लागलेल्या आगीतून बचावून वनात पळून गेले. तो पर्यंत द्रुपदाचा हा यज्ञ झाला नव्हता. कारण द्रौपदीची ही जन्मकथा पांडवांना वनात तिच्या स्वयंवराची वार्ता कानी येईतोवर माहीतच नव्हती. द्रुपदाच्या पराभवानंतर बऱ्याच काळाने हा यज्ञ झाला या तर्काला यावरून पुष्टि मिळते. तेव्हा इतक्या वर्षांनंतर द्रोणाने पुन्हा सुरवात करून धृष्टद्युम्नाला शिकवले असणे संभवत नाही. पांडवांनी लाक्षागृह सोडल्यानंतर काही काळाने द्रुपदाचा यज्ञ झाला व त्यावेळी द्रौपदी कुमारी होती तेव्हा पांडव व द्रौपदी यांच्या वयात बराच फरक होता असेहि दिसते!
द्रौपदीच्या स्वयंवराची व रूपगुणांची बातमी पांडवांच्या कानी आली तेव्हा ते एकप्रकारे अज्ञातवासातच होते. ते वारणावताच्या आगीत जळून मेले अशीच हस्तिनापुरात समजूत होती. भीष्माने त्यांचे और्ध्वदैहिकहि केले होते! आपण प्रगट व्हावे की नाही हा त्यांच्यापुढे प्रष्नच होता. मग आपण स्वयंवराला कसे जावे हा प्रष्न होता. त्यांचे मनोगत जाणून कुंतीने धोका पत्करून पांचालदेशाकडे जाण्याचे ठरवले. पांडवांना पांचालनगरात व्यास भेटले व द्रौपदी तुमची पांचांची पत्नी होईल असे त्यानी पांडवांना सांगितले असे अ.१६९ मध्ये म्हटले आहे. हे मागाहून घुसडलेले स्पष्ट दिसते. कारण पुढील अध्यायात वनात पांडवाची चित्ररथाशी गाठ पडली व अर्जुनाने त्याचा अस्त्रबळाने पराभव केला व पांडव पुन्हा पांचालदेशाला निघाले असे वर्णन आहे. अध्याय १८५ मध्ये पुन्हा व्यास भेटले. मात्र येथे द्रौपदी तुम्हा पाचांची पत्नी होईल असे त्यानी म्हटलेले नाही. द्रुपदाने द्रौपदीचे स्वयंवर योजले होते व पण असा लावला होता की अर्जुनासारख्या अद्वितीय धनुर्धरालाच तो जिंकता येईल. यामागे त्याचा काय हेतु होता?
द्रौपदीच्या स्वयंवराची कथा पुढील भागात विस्ताराने पाहूं.