द्रुपद व द्रोण
द्रुपद व द्रोण हे बालपणीचे सहाध्यायी. द्रुपद राजा झाल्यावर द्रोण त्याला भेटायला गेला व जुन्या मैत्रीची आठवण दिली तेव्हा द्रुपदाने त्याला झिडकारले व तुझई माझी मैत्री आता शक्य नाही असे म्हणून त्याचा अपमान केला. तो भरून काढण्याची द्रोणाची तीव्र इच्छा होती. स्वत: द्रुपदाशी युद्ध करून त्याचा पराभव करण्यापेक्षां उत्तम शिष्य मिळवून त्यांचेकडून द्रुपदाला धडा शिकवणे त्याला जास्त श्रेयस्कर वाटले. शिष्यांच्या शोधात भटकत असतां भीष्माचे आमंत्रण स्वीकारून द्रोण कुरुदरबाराच्या आश्रयाला राहिला व कौरव, पांडव व इतरहि राजकुमारांना त्याने शिकविले. अर्जुनाकडून त्याच्या विशेष अपेक्षा होत्या. शिक्षण संपल्यावर गुरुदक्षीणा म्हणून द्रुपदाचा पराभव करा अशी शिष्यांकडे मागणी केली. प्रथम कौरव एकटेच लढले व हरले. नंतर पांडव युद्धात उतरले व अर्जुनाने अपेक्षेप्रमाणे द्रुपदाचा पराभव केला. अनेक पांचालवीरांचे काही चालले नाही. यांत द्रुपद, पुत्र सत्यजित व भाऊ होते. द्रुपदाच्या इतर पुत्रांचा, शिखंडीचाहि उल्लेख नाही. कुरु-पांचालांचे वैर नव्हते. हे युद्ध द्रोणामुळे झाले. द्रोणाने आपल्या अपमानाची भरपाई म्हणून अर्धे राज्य मागून घेतले व द्रुपदाला सोडले. प्रत्यक्षात द्रोण काही राज्य करावयास गेला नाही तेव्हा अपमानाची भरपाई व द्रुपदाशी बरोबरी एवढाच त्याचा अर्थ होता.
या युद्धानंतर द्रुपदाने हाय खाल्ली. स्वबळावर द्रोणाला व त्याच्या शिष्यांना धडा शिकवणे शक्य नाही हे जाणून तो फार उद्विग्न झाला. आपल्या पराभवाचा बदला घेऊ शकेल अशा पुत्राच्या प्राप्तीसाठी त्याने यज्ञ केला. यज्ञ्याचे फळ म्हणून त्याला पुत्र धृष्टद्युम्न व कन्या द्रौपदी मिळालीं. या यज्ञ्याची कथा तपासली पाहिजे. अर्जुनाकडून झालेल्या पराभवानंतर किती काळाने हा यज्ञ झाला ते सांगितलेले नाही. द्रुपदाने पराभवाचा बदला घेईल अशा शूर पुत्राचीच इच्छा धरली होती. यज्ञाचा हविर्भाग द्रुपदपत्नीला देण्याची वेळ आली तेव्हां तुला पुत्र व कन्या दोन्ही मिळणार आहेत आसे मुनि म्हणाले. रजस्वला असल्यामुळे राणीने हविर्भागाचा स्वीकार केला नाही. तिच्यासाठी न थांबता हवि यज्ञातच अर्पण केला व मग अग्नीतून धृष्टद्युम्न व द्रौपदी बाहेर पडलीं. यज्ञ पुरा होण्याच्या वेळी पट्टराणी तयार नव्हती हे जरा चमत्कारिकच वाटते. यज्ञाचे फलित म्हणून खुद्द तिला अपत्य न होतां कुमारवयाची अपत्ये निर्माण कां झालीं याचें हें एक लंगडे समर्थन वाटते!