Android app on Google Play

 

थोडे अद्भुत थोडे गूढ

 

रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे.

उरल!

उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं!

उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात. अनेक रशियन गिर्यारोहक हिमालयातील शिखरांवर मोहीमेची पूर्वतयारी म्हणून उरल पर्वतात सराव करत असतात. थंडीच्या प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्कीईंगसाठीही अनेक जण या पर्वतावर येत असतात.

ये़त्केरीनबर्ग हे स्वर्डलोव्स्क ओब्लास्ट प्रांतातील हे प्रमुख शहर. पूर्वी स्वर्डलोव्स्क या नावानेच हे शहर ओळखलं जात असे. या शहरापासूनच काही अंतरावर उरल पर्वतराजीचाच भाग असलेला ऑटोर्टेन पर्वत पसरलेला आहे. बर्फाच्छादीत उतारांमुळे हा भाग स्कीईंग करणार्‍यांसाठी मोठंच आकर्षण ठरलेला आहे.

१९५९ मध्ये स्वर्डलोव्स्क इथल्या उरल युनिव्हर्सिटीतील दहा जणांच्या एका तुकडीने ऑटोर्टेन पर्वतावर स्कीईंगची मोहीम आखली. या मोहीमेत एकूण दहा जणांचा समावेश होता. मोहीमेचा प्रमुख इगोर ड्यॅट्लॉव्ह हा एक स्कीईंग इन्स्ट्रक्टर होता. ही स्कीईंगची मोहीम त्यानेच आखलेली होती. निकोलाय थिबक्स-ब्रिंगनोल्स आणि रस्टेम स्लोबोडीन हे त्याचे सहकारी होते. युरी क्रिव्होनीस्चेंको, युरी दोरोशेन्को, अलेक्झांडर कोल्व्हॅटोव्ह, सेम्यॉन झोलोत्रिऑव, युरी युदीन यांचाही मोहीमेत समावेश होता. हे सर्व उरल उनिव्हर्सीटीतील विद्द्यार्थी होते. यांच्याव्यतिरीक्त झेनेडा कोल्मोग्रोवा आणि ल्युड्मिला डुबिनिया या दोघी विद्द्यार्थिनीही या मोहीमेत सहभागी झाल्या होत्या. हे सर्वजण अनुभवी गिर्यारोहक आणि स्कीईंग करणारे होते. उरल पर्वतातील अधिक कठीण मोहीमेची पूर्वतयारी म्हणून ड्यॅटलॉव्हने ही मोहीम आखली होती!


थिबक्स-ब्रिंगनोल्स, डुबिनिया, झोलोत्रिऑव आणि कोल्मोग्रोवा

स्वर्डलोव्स्क इथून सर्व तयारीनीशी दहाजणांनी रेल्वेने इव्हडेल गाठलं. इथून एका ट्रकमध्ये सर्व सामान चढवून ते विझाई या पायथ्याच्या शेवटच्या गावात पोहोचले. विझाई इथून २७ जानेवारीला त्यांनी डोंगराच्या दिशेने पायपीट सुरू केली. परंतु दुसर्‍याच दिवशी त्यांच्यापैकी युरी युदीन याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली! आपल्या सहकार्‍यांना शुभेच्छा देऊन युदीन परत फिरला.


परत फिरण्यापूर्वी डुबिनियाचा आलिंगन देताना युदीन

पुढे काय होणार होतं याची थोडी तरी कल्पना युदीनला होती का?

मोहीमेवर निघण्यापूर्वी विझाई इथे परतल्यावर आपल्या स्कीईंग संस्थेला तार करण्याचं ड्यॅटलॉव्हने ठरवलं होतं. त्याच्या अनुमानानुसार साधारण १२ फेब्रुवारीपर्यंत ते विझाईला परतले असते. अर्थात पर्वतावरील लहरी हवामानाचा विचार करता ही तारीख चार-पाच दिवसांनी पुढे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. युदीन परत फिरण्यापूर्वी ड्यॅट्लॉव्हने ही शक्यता त्याच्यापाशी बोलून दाखवली होती.

२८ जानेवारीला सर्वजण ऑटोर्टेन पर्वताजवळ पोहोचले. ३१ जानेवारीला ते पर्वतावरील एका सखल पठारी जागेत पोहोचले. इथे पोहोचल्यावर त्यांनी पर्वतावरील कठीण चढाईच्या तयारीला सुरवात केली. पुढील वाट एका खिंडीतून जात होती. आपल्याजवळी जास्तीची सर्व सामग्री आणि परतीच्या वाटेवर लागणारे अन्नपदार्थ त्यांनी एका सुरक्षीत ठि़काणी लपवून ठेवले.

१ फ्रेब्रुवारीला खिंडीतील चढाई सुरु झाली. दिवसभराची चढाई करुन खिंड ओलांडून पलीकडे मुक्काम करायची त्यांची योजना होती, पण....

उरलमधील लहरी हवामान त्यांनी गृहीत धरलं नव्हतं!

हवामान झपाट्याने बिघडलं होतं. त्यातच वार्‍याचा जोर वाढू लागला. बर्फवृष्टीही सुरु झाली. एकूण दृष्यमानता खूपच कमी झाली...

याचा परिणाम व्हायचा तोच झाला!

खिंड ओलांडून जाणारी वाट दृष्टीस पडेनाशी झाल्याने ड्यॅट्लॉव्ह रस्ता भरकटून पश्चिमेच्या दिशेने गेला. त्याच्यापाठोपाठ सर्वजणच त्या मार्गाला लागले! काही वेळातच त्यांना 'खोलत सख्याल' पर्वताची बर्फाच्छादीत चढण लागली. या धारेवर काही वेळ चढाई केल्यावर आपण साफ वाट चुकल्याचं ड्यॅटलॉव्हच्या ध्यानात आलं. एव्हाना अंधारुन आलं असल्याने रात्री तिथेच मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी सूर्यप्रकाशात वाट शोधण्याचा त्याने निर्णय घेतला. पर्वताच्या बर्फाच्छादीत उतारावरच रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांनी तंबू ठोकला.


ड्यॅट्लॉव्ह आणि सहकारी तंबू उभारताना

१२ फेब्रुवारी उलटून गेल्यावरही ड्येटलॉव्हची तार आली नाही तरी कोणी फारशी काळजी केली नाही. परत येण्याच तीन-चार दिवस उशीर होण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरलेली होती. परंतु २० फेब्रुवारीपर्यंत कोणतीही खबर न मिळाल्यावर मात्रं सर्वांचे नातेवाईक काळचीत पडले होते. अखेर ज्या संस्थेतर्फे हे सर्वजण मोहीमेवर गेले होते, त्यांनी शोधमोहीमेची तयारी सुरु केली.

ड्यॅट्लॉव्ह आणि इतर आठजण होते तरी कुठे?

जेमतेम चार-पाच दिवसांतर शोधमोहीमेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. घाईघाईने आखलेल्या शोधमोहीमेवर आलेले सर्वजण तुलनेने खूपच अननुभवी होते. त्यांच्याजवळ चांगल्या सामग्रीचीही वानवा होती. अखेर रशियन लष्कराने शोधमोहीम आपल्या हाती घेतली. लष्कराच्या विमानांनी आणि हेलीकॉप्टर्सनी ऑटोर्टेन पर्वतावर शोध घेण्यास सुरवात केली.

२५ फेब्रुवारीला हेलीकॉप्टरच्या पायलटला खोलत सख्याल पर्वताच्या उतारावर काही अवशेष आढळले!

२६ फेब्रुवारीला शोधमोहीमेतील एक तुकडी पर्वताच्या त्या उतारावर पोहोचली. उरल युनिव्हर्सिटीचा विद्द्यार्थी असलेल्या मिखाईल शरवीन याचा त्यात समावेश होता.

शरवीनच्या तुकडीला पर्वताच्या उतारावर असलेला तंबू आढळून आला. तंबूचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं दिसत होतं. तंबूचं कापड कोणीतरी फाडल्याचं शरवीनच्या ध्यानात आलं. तंबूमध्ये सर्वांचं सामान आणि बूट आढळून आले! तंबूतून बाहेर पडलेले किमान आठ जणांच्या पायांचे ठसे आढळून आले!


उध्वस्तं झालेला तंबू

आश्चर्याची गोष्टं म्हनजे हे ठसे बुटांचे नव्हते!
बर्फात नुसते मोजे घालून धावत गेल्याचे किंवा एकच बूट घालून धावत गेल्याचे ... काही तर चक्कं अनवाणी पायांनी धावत गेल्याचे ठसे आढळून आले!
दोन माणसांचे पावलांचे ठसे उतारावर असलेल्या जंगलाच्या दिशेने गेलेले आढळले, परंतु सुमारे १५०० फुटांवर ते ठसे बर्फाच्या आवरणाखाली गाडले गेले होते.

ठशांच्या अनुरोधाने माग काढत शरवीन पुढे जात असताना त्याला एका पाईन वृक्षाखाली विझलेली शेकोटी आढळून आली.

शेकोटी शेजारी दिसलेलं दृष्यं पाहून शरवीन जागच्या जागीच खिळून उभा राहीला.....

युरी दोरोशेन्को आणि युरी क्रिव्होनीस्चेंको यांचे गोठलेले मृतदेह तिथे पडलेले होते!

दोघांच्याही देहावर अंडरपँट वगळता एकही वस्त्रं नव्हतं!
पायात बूट आणि मोजेही नव्हते!

पाईनच्या अनेक फांद्या सुमारे १५ फूट उंचीपर्यंत अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होत्या!
दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांनी जिवाच्या आकांताने झाडावर चढण्याचा प्रयत्नं केलेला दिसून येत होता!


पाईन वृक्ष

दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांच्यापासून सुमारे ९०० फुटांवर, तुलनेने तंबूजवळ मोहीमेचा प्रमुख इगोर ड्यॅट्लॉव्ह याचा मृतदेह आढळून आला! ड्यॅट्लॉव्ह उताणा पडलेला होता. त्याने एका हाताने लहानसं झुडूप घट्ट धरलेलं होतं. दुसरा हात डोक्यावर होत असलेल्या आघातापासून वाचवण्यासाठीच्या पवित्र्यात होता.

तंबूपासून काही अंतरावर रस्टेम स्लोबोडीनचा बर्फात अर्धवट गाडला गेलेला मृतदेह आढळला. स्लोबोडीन पालथा पडला होता. त्याच्या डोक्यावर सुमारे सात इंच लांबीची जखम आढळून आली! कवटीचं हाड फ्रॅक्चर झालेलं होतं!

झेनेडा कोल्मोग्रोवाचा मृतदेह इतरांपासून काहीसा दूर अंतरावर आढळून आला होता. तिच्या देहाजवळ बर्फात रक्ताचे डाग होते, परंतु ते तिच्याच रक्ताचे असावेत असं खात्रीपूर्वक सांगता येत नव्हतं. कोणत्याही संघर्षाची खूण मात्रं आढळून आली नाही.

शरवीनच्या तुकडीला तंबूत कॅमेर्‍याचे अनेक रोल आढळून आले. मोहीमेच्या प्रगतीची व्यवस्थित नोंद केलेली डायरी आणि इतर अनेक वह्या तंबूत आढळल्या. डायरीतील नोंदींवरुन १ फेब्रुवारीला वाट चुकल्यावर त्यांनी तंबू उभारल्याचं स्पष्टं झालं. वाट चुकल्यामुळे मोहीमेला उशीर होणार असल्याची ड्यॅट्लॉव्हने आपल्या डायरीत नोंद करुन ठेवलेली त्यांना आढळली.

अलेक्झांडर कोल्व्हॅटोव्ह, निकोलाय थिबक्स-ब्रिंगनोल्स, सेम्यॉन झोलोत्रिऑव आणि ल्युड्मिला डुबिनिया यांचा काहीही पत्ता लागला नव्हता. त्यांचा शोध घेण्याचं काम पुढचे दोन महिने सुरु होतं! परंतु चौघांपैकी एकाचंही नख दृष्टीस पडलं नाही!

वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच बर्फ वितळण्यास सुरवात झाली!

४ मे १९५९ ला ज्या पाईन वृक्षापाशी दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांचे मृतदेह आढळले होते त्यापासून सुमारे २२५ फूट अंतरावर एका लहानशा ओढ्यात बर्फात गाडले गेलेले कोल्व्हॅटोव्ह, थिबक्स-ब्रिंगनोल्स, झोलोत्रिऑव आणि डुबिनिया यांचे मृतदेह आढळून आले!

बार फूट बर्फाच्या थराखाली गाडले गेलेले मृतदेह बर्फ वितळल्यावर आता दृष्टीस पडले होते!

थिबक्स-ब्रिंगनोल्सच्या मस्तकावरही स्लोबोडीनप्रमाणेच जोरदार आघात झाल्याची खूण आढळून आली! झोलोत्रिऑव आणि डुबिनिया या दोघांच्या छातीवर कसल्यातरी वस्तूचा आघात झाल्याचं आढळून आलं होतं. दोघांच्याही अनेक बरगड्या मोडल्या होत्या!

डुबिनियाचं डोकं मागे झुकलेलं होतं. तिचे डोळे विस्फारलेले होते. तिने किंकाळी फोडली असावी, किमान तसा प्रयत्न केला असावा ही कल्पना येत होती.

तिची जीभ तोंडातून मुळापासून उपटली गेली होती!

कोल्व्हॅटोव्ह, थिबक्स-ब्रिंगनोल्स, झोलोत्रिऑव आणि डुबिनिया यांनी अंगात व्यवस्थित व पूर्ण कपडे घातलेले होते!

हे प्राणघातक आघात नेमके कशामुळे झाले होते?

एक अत्यंत धक्कादायक गोष्ट आढळून आली होती.

सर्वच्या सर्व - नऊ मृतदेहांची कातडी नारींगी (ऑरेंज) रंगाची झालेली होती!
केसांना असलेला काळा रंग बदलून तो राखाडी झाला होता!

... आणि सर्वांच्या कपड्यांमधून किती तरी मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्जन (रेडिएशन) होत असल्याचं आढळून आलं होतं!

सोव्हीएत रशियाच्या अधिकार्‍यांनी तपासाला सुरवात केली. सर्वप्रथम प्रश्न होता तो हा म्हणजे ड्यॅटलॉव्हने जेमतेम मैल-दीड मैलांवर असलेल्या तुलनेने सुरक्षीत जंगलात आश्रय घेण्याऐवजी पर्वताच्या उतारावर असलेल्या बर्फाळ जागी का मुक्काम केला असावा?

युरी युदीनच्या मते खिंडीवर चढाई करताना ड्यॅट्लॉव्हच्या तुकडीने बरीच उंची गाठली होती. जंगलात मुक्काम करण्यासाठी त्यांना खाली उतरुन यावं लागलं असतं. ड्यॅट्लॉव्हची याला तयारी नव्हती. त्याचबरोबर ड्यॅट्लॉव्हला सर्वांना बर्फावर मुक्काम करण्याचा अनुभव द्यायची इच्छा असावी असं युदीनचं मत होतं.

तंबूत सापडलेले फोटो डेव्हलप केल्यावर ड्यॅट्लॉव्ह आणि इतरांनी १ फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुमारे ५ च्या सुमाराला तंबू उभारला होता असं स्पष्टं झालं. तंबू उभारत असतानाचे फोटो कॅमेर्‍यात आढळले होते. फोटोवरुन सर्वजण तंदुरुस्तं असल्याची कल्पना येत होती. संध्याकाळी सातच्या सुमाराला जेवण आटपून त्यांनी रात्रीच्या विश्रांतीची तयारी सुरु केली होती.

सर्व प्रेतांचं पोस्टमॉर्टेम केल्यावर डॉक्टरांनी सर्वांच्या मृत्यूची वेळ रात्री ९.३० ते ११.३० च्या दरम्यानची असावी असा अंदाज व्यक्तं केला. मृत्यूचं कारण अती थंड हवामानात होणारा हायपोथर्मिया (शरिराचं तापमान अचानक कमी होणे) असावं असं डॉक्टरांनी स्पष्टं केलं!

...पण मग मृतदेहांवर आढळून आलेल्या जखमांचं काय?

तंबूचं कापड आतल्या दिशेने फाडण्यात आल्याचं आढळून आलं होतं!

१ फेब्रुवारीच्या रात्री सर्वजण तंबूचं कापड फाडून सर्वजण बाहेर पडले होते. पण असं नेमकं कोणतं कारण झालं असावं, की ड्यॅट्लॉव्ह आणि त्याच्या सहकार्‍यांसारखे अनुभवी गिर्यारोहक अशा अतिथंड वातावरणात अर्धस्त्रावस्थेत तंबू सोडून का पळत सुटले होते? थंडीत गोठून मरण्यापेक्षाही कोणत्या भयानक गोष्टीची त्यांना दहशत बसली होती?

तंबूतून पळत सुटल्यानंतरही पाईन वृक्षाच्या जवळ सर्वजण एकत्रं आलेले होते. ज्या पाईन झाडावर चढण्याचा दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांनी प्रयत्नं केला होता, त्याच्याजवळ शेकोटी पेटवण्याइतका त्यांना वेळ मिळाला होता. दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांचा झाडावर चढण्याचा प्रयत्नं म्हणजे आलेल्या संकटात आपल्या तंबूचं नेमकं काय झालं असावं याचा अंदाज घेण्याचा प्रयत्नं असावा.

रात्री कधीतरी दोरोशेन्को आणि क्रिव्होनीस्चेंको यांचा हायपोथर्मियाने आणि अतिथंडीत मृत्यू झाला असावा. त्यानंतर स्लोबोडीन, कोल्मोग्रोवा आणि ड्यॅट्लॉव्ह यांनी तंबूकडे परत जाण्याचा प्रयत्न केला असावा. मात्रं अतिथकव्याने आणि हायपोथर्मियाने तंबूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते वाटेत कोसळले.

कोल्व्हॅटोव्ह, थिबक्स-ब्रिंगनोल्स, झोलोत्रिऑव आणि डुबिनिया यांच्या मृतदेहावर व्यवस्थित व पूर्ण कपडे घातलेले होते. इतर सर्वजण अर्धवस्त्रावस्थेत असताना हे कसं शक्यं झालं होतं?

तंबूतून बाहेर पडल्यावर सर्वांनी कपडे आपसात वाटून घेण्याचा प्रयत्न केला असावा असा एक अंदाज होता. परंतु आपले सहकारी मृत झालेले पाहून त्यांच्या देहावरुन स्वतःला वाचविण्यासाठी या चौघांनी कपडे घेतले असावेत ही शक्यता देखील नाकारता येत नव्हती. डुबिनियाने क्रिव्होनीस्चेंकोची लोकरी पँट पायाभोवती गुंडाळली होती. डुबिनियाचा फर कोट आणि टोपी झोलोत्रिऑवने घातलेली होती. हा बहुतेक रात्रीच्या अंधारात घाईघाईने कपडे बदलण्याचा परिणाम असावा.

नऊ जणांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण असावं?

रशियन तपासयंत्रणांनी हायपोथर्मिया हेच कारण असल्याचं सांगितलं असलं तरी अनेक तर्क व्यक्त करण्यात आले.

पहिला तर्क व्यक्तं करण्यात आला तो म्हणजे उरल प्रांतात राहणार्‍या मन्सी जमातीच्या लोकांनी या नऊ जणांची हत्या केली असावी! हे नऊ गिर्यारोहक मन्सी जमातीच्या हद्दीत नकळत शिरले आणि हे सहन न झाल्याने त्यांची हत्या करण्यात आली असावी. तत्कालीन सोव्हीएत रशियाच्या अधिकार्‍यांची मन्सी जमातीशी वितुष्ट नको म्हणून ही हत्या दडपली असावी असंही मत व्यक्तं करण्यात आलं. मन्सी जमातीचा प्रदेश हा तेलाने समृद्ध प्रदेश होता आणि त्यावरील आपलं नियंत्रण गमावणं रशियाला परवडणार नव्हतं!

या तर्कात एक मोठी त्रुटी होती. नऊपैकी एकाही मृतदेहावर बंदुकीच्या गोळीची एकही खूण आढळून आली नव्हती. तसेच नऊजणांच्या तंबूत असलेल्या मौल्यवान चीजवस्तूंपैकी एकालाही हात लावण्यात आलेला नव्हता. तसेच अपघातानंतर मन्सी जमातीच्या लोकांनी या सर्वांचा शोध घेण्यात महत्वाची भूमिकाही बजावली होती.

दुसरा तर्क म्हणजे परग्रहावरुन आलेल्या लोकांनी (एलियन्स) यांची हत्या केली!

ड्येट्लॉव्ह आणि इतरांनी खोलत सख्याल पर्वताच्या शिखरापासून ३२ मैलांवर मुक्काम केला होता. रात्री आकाशात अनपेक्षीतपणे अग्नीगोलक दिसून आले! हे अग्नीगोलक खूपच जवळ आल्याने सर्वांनी तंबू सोडून बाहेर पलायन केलं, परंतु तरीही ते स्वतःला वाचवू शकले नाहीत!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे उरल प्रांतातील अनेक नागरीकांनी दोन-तीन महिन्यांपासून असे अग्निगोलक आकाशात पाहील्याचे पोलीसांत रिपोर्ट नोंदवले होते. पोलीस प्रमुखांना स्वतःलाही ते दिसले होते! इतकंच नव्हे तर या प्रकाराचा तपास करणारा मुख्य तपास अधिकारी इव्हानोव्ह यानेही या अग्नीगोलकांच्या दर्शनाचा अनुभव घेतला होता!

इव्हानोव्हच्या मते या नऊजणांच्या मृत्यूमागे हे कारण असण्याची शक्यता होती! ज्या वेळी हे अग्नीगोलक अवकाशात दिसल्याचे रिपोर्ट पोलीसांनी नोंदवले होते, त्यावेळी वातावरणातील किरणोत्सर्गाचं प्रमाण कितीतरी पटींनी वाढलं असल्याचं हवामानखात्याने केलेल्या नोंदींवरुन आढळून आलं होतं. या नऊ जणांच्या कपड्यांवरही जवळपास तितक्याच प्रमाणात किरणोत्सर्ग झाल्याचं आढळून आलं होतं!

रशियन लष्कराच्या हुकुमावरुन या दिशेने करण्यात येत असलेला तपास पूर्णपणे थांबविण्याची इव्हानोव्हला सूचना देण्यात आली!

या तर्कातील एलियन्स अथवा परग्रहावरील आलेल्या अवकाशयानांच्या सहभागाचा भाग सोडला तरी एक शक्यता होती....

पर्वताच्या माथ्यावर दिसत असलेले हे अग्नीगोलक म्हणजे सोव्हीएत रशियन लष्कराच्या गुप्त अस्त्राच्या प्रयोगाची चाचणी होती! या अस्त्राच्या चाचणीच्या दरम्यान ड्येट्लॉव्ह आणि त्याचे सहकारी नेमके वाट चुकून त्या प्रदेशात पोहोचल्याने त्यांचा बळी गेला असावा!

ड्येटलॉव्हच्या तुकडीतील आजारपणामुळे वाचलेला एकमेव सहकारी युरी युदीनच्या मते रशियन लष्कराचा यामागे हात होता! लष्कराच्या गुप्त अस्त्रांच्या चाचणी दरम्यानच आपल्या सहकार्‍यांचा जीव गेल्याचं त्याने ठामपणे प्रतिपादन केलं. अधिकृतरित्या शोधमोहीमेसाठी लष्कराला पाचारण करण्यापूर्वीच दोन आठवडे - ३ फेब्रुवारीलाच लष्करी अधिकार्‍यांनी आणि सैनिकांनी अपघातस्थळाला भेट देऊन अनेक पुरावे नष्ट केले होते! शोधमोहीमेत भाग घेतलेल्या युदीनला लष्करी अधिकार्‍यांनी दोन आठवडे आधीच शोधमोहीमेला सुरवात केल्याचे कागदपत्रं नजरेस पडले होते!

आपल्या सहकार्‍यांच्या सामानाची पाहणी करताना युदीनला लष्कराला देण्यात येणार्‍या कोटाचा तुकडा आढळून आला होता!
त्याचबरोबर स्कीईंगच्या पायफळ्यांची एक जोडी आणि एक चस्मा आढळून आला होता....

...पायफळ्यांची जोडी आणि चस्मा युदीनच्या सहकार्‍यांपैकी एकाचाही नव्हता!

लष्करी अस्त्राच्या चाचणीची शक्यता गृहीत धरली तरीही हे अस्त्रं स्फोटक अस्त्रं नसून एखादं जैविक अधवा रासायनिक अस्त्रं असण्याची शक्यता जास्तं होती. एखाद्या रासायनीक वायूमुळे घबराट उडाल्याने तंबूचा आसरा सोडून सर्वांनी बाहेरच्या बर्फात पलायनाचा आत्मघाती मार्ग पत्करला असण्याची शक्यता होती.

एका तर्काच्या मते हे अस्त्रं म्हणजे इन्फ्रासाऊंड - मानवी श्रवणक्षमतेपेक्षा कमी प्रतिच्या ध्वनिलहरी - चा वापर करणारं अस्त्रं असण्याचीही शक्यता होती! इन्फ्रासाऊंड आवाजाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अस्वस्थतेपासून भयानक भितीपर्यंत अनेक वेगवेगळ्या भावना आढळून आल्याचं अनेक प्रयोगांत निदर्शनास आलं होतं. आवाज ऐकू येत नसल्याने अनेकदा होणारे परिणाम हे अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींमुळे येत असल्याचीही अनेकांची भावना झाली असल्याचंही आढळून आलं आहे.

या सर्व तर्कानुसार एका गोष्टीचा मात्रं उलगडा होत नव्हता.. या सर्वांना वर्मी झालेल्या जखमा कशामुळे झाल्या?

आणखीन एक तर्क होता तो म्हणजे हे सर्वजण जोरदार हिमप्रपातात (अ‍ॅव्हलाँच) बळी पडले हा!

खोलत सख्याल पर्वताचा हा उतार अ‍ॅव्हलाँचसाठी बर्‍यापैकी कुप्रसिद्ध होता. अर्थात ड्यॅट्लॉव्ह आणि त्याच्या सहकार्‍यांना त्याची पूर्ण कल्पना होती. परंतु तरीही या ठि़काणीच मुक्काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. अर्थातच पर्वतावरुन येणार्‍या कोणत्याही आवाजावर त्यांचं लक्षं असणार होतं हे उघड होतं.

अ‍ॅव्हलाँच आल्याची प्रत्यक्षात कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत तरीही रात्रीच्या अंधारात बर्फाच्या हालचालीचा आवाज कानावर आल्यामुळे सर्वांनी तंबूतून बाहेर धाव घेतल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पाईन वृक्षापर्यंत आल्यावर आणि सर्व परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर अ‍ॅव्हलाँचची भिती खोटी असल्याचं ध्यानात आल्यानंतर सर्वांनी लवकरात लवकर तंबूकडे परतणं जास्तं संयुक्तीक झालं असतं. पण तसं का झालं नाही?

सर्वात भन्नाट तर्क मांडण्यात आला तो म्हणजे हिममानव - 'यती'ने या सर्वांची हत्या केली!

यतीचं अस्तित्वं अद्यापही सिद्ध झालं नसलं तरी यतीनेच या सर्वांचा बळी घेतला होता असं ठाम प्रतिपादन करण्यात आलं! सर्वांच्या देहावर असणार्‍या जखमा या यतीच्या हल्ल्यातच झाल्या होत्या असा तर्क मांडण्यात आला. अंगावरच्या अर्धवस्त्रानिशी तंबूच्या बाहेर धूम ठोकण्याचं कारण यतीसारख्या अजस्त्र प्राण्याचं दर्शन हेच होतं असंही मत व्यक्तं करण्यात आलं.

याला बळकटी मिळाली एका चिठ्ठीमुळे!

शोधपथकाच्या लोकांपैकी एकाला घाईघाईत खरडलेली एक चिठ्ठी आढळून आली होती. त्यात लिहीलं होतं,

From now on we know there are snowmen

चिठीतील हस्ताक्षर झोलोत्रिऑवशी मिळतंजुळतं होतं. युदीनच्या मते मात्रं ही चिठी कोल्मोग्रोवाने लिहीली असावी.

अर्थात या तर्कात एक मोठी त्रुटी म्हणजे सर्वांच्या पावलांचे - अगदी अनवाणी पावलांचे ठसे आढळून आलेले असतानाही, यतीसारख्या मोठ्या प्राण्याच्या पावलांचे ठसे कसे आढळून आले नाहीत?

मन्सी जमातीच्या भाषेत खोलत सख्याल याचा अर्थ मृत्यूचा पर्वत (डेड माऊंटन) असा होतो! मन्सी जमातीतील पूर्वापार चालत असलेल्या समजुतीनुसार या पर्वतावर रात्रीचा मुक्काम करणार्‍यांना हमखास मृत्यू येतो!

ड्येट्लॉव्ह आणि त्याच्या सहकार्‍यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
रात्रीच्या अंधारात नेमक्या कोणत्या गोष्टीची भीती वाटल्याने नेसत्या वस्त्रानिशी-अर्धवस्त्रानिशी सर्वांनी बर्फात धूम ठोकली?
मन्सी जमातीच्या लोकांनी त्यांची हत्या केली का?
की परग्रहावरील हल्ल्याला ते बळी पडले?
रशियन लष्कराच्या गुप्त अस्त्राच्या प्रयोगामध्ये त्यांचा बळी पडला होता का?
की अ‍ॅव्हलॉन्चमध्ये त्यांचा बळी गेला होता?
सर्वांच्या देहावर आढळून आलेल्या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या होत्या?

ज्या खिंडीतून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात ड्यॅट्लॉव्ह आणि त्याच्या सहकार्‍यांचा बळी गेला होता, त्या खिंडीला पुढे ड्यॅट्लॉव्हचं नाव देण्यात आलं.

त्या सर्वांच्या मृत्यूचं गूढ मात्रं आजतागायत उकललेलं नाही!