थोडे अद्भुत थोडे गूढ - ८
भारतातील बहुतेक सर्व राज्यांवर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या या देशात निसर्गाचे अनेक अविष्कार पाहण्यास मिळतात. अनेक उत्तुंग पर्वतराजी, शेकडो मैलांचा सागरकिनारा, रखरखीत वाळवंट, सदाहरीत जंगले आणि अतिवृष्टीचे प्रदेश अशी निसर्गाची अनेक रुपं इथे अनुभवण्यास मिळतात.
भारतीय उपखंडाचा मुकुटमणी म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील प्राचीन काळात झालेल्या घर्षणामुळे हिमालयाची निर्मीती झाली. घडीचा पर्वत म्हणून प्रसिद्ध असलेला हिमालय हा जगभरातील अनेक सर्वोच्च पर्वतशिखरांचं माहेरघर आहे. ७२०० मीटरपेक्षा अधिक उंचीची सुमारे शंभरावर पर्वतशिखरं हिमालयात आहेत. आशिया खंडाबाहेरील सर्वात उंच शिखर हे अँडीज पर्वतातील ६९६१ मीटर उंचीचं आहे!
हिमालयाचा वरदहस्त उत्तर भारतातील काश्मिरपासून ते सिक्कीमपर्यंतच्या अनेक राज्यांना लाभला आहे. अशा राज्यांपैकीच एक म्हणजे उत्तराखंड!
उत्तराखंड राज्याचे मुख्यतः दोन विभाग पडतात. गढवाल आणि कुमाऊं! हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेली बद्रीनाथ-केदारनाथ ही तीर्थक्षेत्रे या प्रदेशात आहेत. गंगा नदीचा उगम असलेलं गोमुख, प्रसिद्ध हिमशिखर नीलकंठ, नैनीताल-अलमोडा आणि मसूरी यांसारखी प्रसिद्ध हिलस्टेशन्स देखील याच राज्यात आहेत. कुमाऊंचा प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट याने शिकार केलेले अनेक नरभक्षक वाघ आणि चित्ते याच प्रदेशात धुमाकूळ घालत होते! भारतातील पहिलं व्याघ्र अभयारण्य असलेलं कॉर्बेट नॅशनल पार्क हेदेखील याच प्रदेशात आहे.
कुमाऊंच्या पश्चिम भागात हिमालयाच्या तीन पर्वतशिखरांचा एक समुह आहे. एकाशेजारी एक उभ्या असलेल्या या शिखरांकडे पाहील्यावर शिवशंकराच्या हातातील ज्या शस्त्राचा भास होतो त्याचंच नाव या शिखरांना मिळालेलं आहे....
त्रिशूळ!
त्रिशूळ पर्वताच्या उत्तर-पूर्वेकडे सुमारे ९ मैलांवर भारतातील दुसर्या क्रमांकाचं शिखर आहे...
नंदा देवी!
कुमाऊंतील परंपरागत लोककथांनुसार नंदादेवी ही हिमालयाची कन्या! नंदादेवीचं वस्तीस्थान म्हणून या पर्वताला तिचं नाव देण्यात आलं आहे. नंदा आणि सुनंदा या जुळ्या भगिनी आहेत असाही एक मतप्रवाह प्रचलित आहे. कुमाऊं प्रदेशातील जनमानसांत नंदादेवीचं स्थान अढळ आहे.
त्रिशूळ पर्वताच्या पायथ्याशी, ग्लेशीयरपासून तयार झालेलं एक लहानसं सरोवर आहे...
रूपकुंड!
कुमाऊंच्या चमोली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे ५०३० मीटर उंचीवर असलेलं रुपकुंड सरोवर अत्यंत निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. सरोवराच्या चारही बाजूंना ग्लेशीयर पसरलेलं आहे! अनेक बर्फाच्छादीत पर्वतशिखरं या सरोवरावर लक्षं ठेवून असल्यासारखी आजूबाजूला उभी ठाकलेली आहेत. जेमतेम दोन मीटर खोलीचं रुपकुंड थंडीच्या काळात पूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत असतं! चारही बाजूंनी उतार असलेल्या एका खोलगट बशीसारख्या भागात हे सरोवर आहे. रुपकुंड पासूनची सर्वात जवळची मानवी वसाहत ही २२ मैलांवर आहे!
बर्फाळलेलं रुपकुंड सरोवर
१९४२ सालची गोष्ट...
नंदादेवी अभयारण्याचे पार्क रेंजर असलेले माधवल पार्काच्या दौर्यावर निघाले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रुपकुंड सरोवराच्या परिसरातील बर्फाचं आवरण वितळलं होतं. उन्हाळ्यातील जेमतेम महिनाभरच रुपकुंडच्या आसपासचं बर्फ वितळंत असतं. मजल-दरमजल करीत माधवल रुपकुंडजवळ पोहोचले. समोर दिसलेलं दृष्यं पाहून ते हादरुनच गेले....
रुपकुंडच्या किनार्यावर मानवी सांगाड्यांचा खच पडलेला होता!
हा विलक्षण प्रकार पाहून माधवल चांगलेच हादरले होते. स्वतःला सावरुन त्यांनी या सांगाड्यांचं उगमस्थान काय असावं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. केवळ काठावरच नव्हे तर जेमतेम दोन मीटर खोल असलेल्या आणि स्वच्छ पाण्याने भरलेल्या सरोवराच्या तळाशीही अनेक सांगाडे पडल्याचं माधवल यांना आढळून आलं. परंतु हे सांगाडे नेमके आले कुठून?
माधवल यांच्याकडून या विचित्र प्रकाराची माहीती मिळाल्यावर ब्रिटीश अधिकारी चांगलेच बुचकळ्यात पडले. तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या सूचनेवरुन सैनिकांच्या एका तुकडीने त्यापैकी काही सांगाडे नैनीताल इथे वाहून आणले.
त्यावेळी दुसरं महायुद्ध जोरात होतं. ७ डिसेंबर १९४१ ला पर्ल हार्बरवर अनपेक्षीत हल्ला चढवून जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतलेली होती. ब्रिटीश साम्राज्याचा प्रदेश म्हणून जपान हिंदुस्थानवरही हल्ला करणार अशी त्याकाळात जोरदार अफवा होती. रुपकुंडच्या परिसरात आढळून आलेले हे सांगाडे हे भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या परंतु अज्ञात कारणाने आणि थंडीच्या कडा़क्याला बळी पडलेल्या जपानी सैनिकांचे असावे असा इंग्रज अधिकार्यांचा तर्क होता.
अर्थात दुसरं महायुद्ध सुरु असताना जपानी सैनिक इतक्या जवळ पोहोचल्याचं जाहीर झालं तर होणार्या परिणामांचा विचार करुन ब्रिटीश अधिकार्यांचं हे अनुमान दाबून टाकण्यात आलं! अर्थात अवघ्या काही महिन्यात आणि तेही बर्फाच्छादीत प्रदेशात केवळ हाडंच शिल्लक राहणं अशक्यंच होतं.
काही संशोधकांच्या मते हे सांगाडे किमान शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे होते. काश्मिरचा सेनानी जनरल जोरावर सिंग आणि त्याची सेना १८४१ मध्ये तिबेटच्या मोहीमेवर गेलेली असताना गायब झाली होती. हे सांगाडे जनरल जोरावर सिंगाच्या त्या मोहीमेतील सैनिकांचे असावेत असं प्रतिपादन करण्यात आलं. परंतु जनरल जोरावर सिंग आणि त्यांच्या लष्कराचा ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या नितीमुळे तिबेटमध्ये पराभव झाल्याचं नंतर निदर्शनास आलं.
भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० च्या दशकात यापैकी काही हाडांचं कार्बन डेटींग पद्धतीने वय काढण्याचा प्रयत्नं करण्यात आला. अर्थात हे तंत्रज्ञात त्यावेळी इतकं प्रगत नसल्याने नेमका काळ सांगणं शक्यं नसलं तरी हे सांगाडे सुमारे १२ व्य ते १५ व्या शतकांच्या दरम्यानच्या कालवधीतील असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं.
जनरल जोरावरसिंग आणि त्याच्या लष्कराचे हे अवशेष नव्हते हे आपसूकच सिद्ध झालं. १२ - १५ व्या शतकादरम्यानच्या काळात हिंदुस्थानवर अनेक परकीय आक्रमणे झाली होती. अनेक इतिहास संशोधकांच्या मते महंमद तुघलकाने गढवालवर केलेला हल्ला अपयशी ठरला होता. खूप नुकसान सोसून त्याला ही मोहीम अर्धवट सोडून द्यावी लागली होती. रुपकुंडच्या परिसरातील सांगाडे हे तुघलकाच्या फौजेतील सैनिकांचे असावे असं मत मांडण्यात आलं. त्याच्या जोडीला हा चंगेजखानाच्या हल्ल्याचा फसलेला प्रयत्नं असावा असाही एक मतप्रवाह होता.
कुमांऊ प्रदेशातील प्रचलीत लोककथेनुसार कनौजचा राजा जशधवल हा आपल्या गर्भवती पत्नी बालंपा आणि इतर लवाजम्यासह नंदादेवीच्या दर्शनास निघाला होता. कनौजच्या राजपुत्राचा येऊ घातलेला जन्मसोहळा साजरा करण्यापूर्वी नंदादेवीचं दर्शन घेण्याची राजा-राणीची मनिषा होती. नंदादेवीच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलासीपणा अथवा रंगेलपणा करु नये असा संकेत होता. परंतु राजा-राणीच्या ताफ्यात अनेक नर्तिकांचा समावेश होता. दर मुक्कामावर नृत्य-गायनाचे कार्यक्रम होत होते. आपल्या पवित्रं मुलखात हा नियमभंग झाल्याजने नंदादेवी कोपली आणि तिने या संपूर्ण जथ्यावर मोठ्या दगडांचा वर्षाव करुन त्यांचा नायनाट केला!
या सांगाड्यांविषयीचा आणखीन एक तर्क होता तो म्हणजे एखाद्या विशिष्ट जमातीतील लोकांनी रुपकुंडच्या परिसरात सामुहीक आत्महत्या केली होती! हे सांगाडे हे त्या जमातीतील लोकांचे अवशेष होते! अर्थात या तर्काला कोणताही आधार मात्रं नव्हता. हा तिबेटी व्यापार्यांचा जथा असावा असाही एक तर्क होता.
रुपकुंड सरोवराच्या परिसरात मृत्यू आलेले हे लोक नक्की होते कोण?
नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांना मृत्यू आला होता?
२००४ मध्ये नॅशनल जॉग्रॉफीकने या रहस्याचा छडा लावण्यासाठी एक शास्त्रीय मोहीम हाती घेतली. जर्मन मानववंशशास्त्रज्ञ विल्यम सॅक्स, पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे मानववंशशास्त्रज्ञ प्रमोद जोगळेकर आणि सुभाष वाळींबे, गढवाल युनिव्हर्सिटीचे फॉरेन्सिक शास्त्रज्ञ राकेश भट्ट आणि बिश्त अशा अनेक संशोधकांचा या मोहीमेत समावेश होता. त्यांच्या जोडीला मिडीटेकचे चंद्रमौली बासू हे देखील होते. या संशोधन मोहीमेचं संपूर्ण चित्रीकरण करण्याची जबाबदारी बासू यांच्यावर होती.
या सर्व शास्त्रज्ञांनी रुपकुंड सरोवराला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि मानवी सांगाड्यांची काळजीपूर्वक पाहणी केली. रुपकुंडच्या तळाशीही अनेक मानवी अवशेष आढळून आले होते. यापैकी शक्यं तितक्या मानवी अवशेषांचे नमुने गोळा करण्यात आले. या सर्व नमुन्यांच निरीक्षण केल्यावर हा सामुहीक आत्महत्येचा प्रकार नव्हता हे सकृतदर्शनीच स्पष्टं होत होतं. काही सांगाड्यांवर अद्यापही मांसखंडाचे अवशेष, कातडी आणि कवटीवरील केस टिकून होते!
रुपकुंड सरोवरात आढळलेले मानवी अवशेष
या मोहीमेतून मिळालेले सांगाड्यांचे नमुने आणि त्यावरील पुढील संशोधनाअंती अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
कार्बन डेटींगच्या अत्याधुनिक संशोधनाद्वारे हे सर्वं सांगाडे सुमारे १२०० वर्षांपूर्वीचे - इसवी सन ८५० च्या सुमाराला मरण पावलेल्या व्यक्तींचे होते! प्रत्येक कवटीवर फ्रॅक्चर झाल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या! कवटीवर जोरदार आघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हा आघात कोणत्याही शस्त्राने अथवा दरड कोसळल्यामुळे झालेला नव्हता. डोक्यावरील या जखमेव्यतिरीक्त इतर कोणत्याही जखमेच्या खुणा हाडांवर आढळून आल्या नव्हत्या. क्रिकेट किंवा गोल्फच्या चेंडूच्या आकाराच्या वस्तू थेट आकाशातून डोक्यावर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता! हे सर्व मृत्यू एकाच वेळेस झालेले होते!
सुरवातीला हे सर्व मृतदेह तत्कालीन राजाच्या सैन्याच्या तुकडीचे असावेत असा अंदाज बांधण्यात आला. परंतु जास्तीत जास्तं अस्थींचं संशोधन केल्यावर त्यांच्यात स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता असं आढळून आलं. सुमारे ३०० वेगवेगळ्या व्यक्तींच्या अस्थी शास्त्रज्ञांना तिथे आढळून आल्या होत्या. तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केल्यावर या प्रदेशातून तिबेटकडे जाणारा कोणताही व्यापारी मार्ग अस्तित्वात नव्हता हे स्पष्टं झालं होतं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर हे सर्व जण यात्रेकरु असावेत या निष्कर्षावर सर्व शास्त्रज्ञांचं एकमत झालं. नंदादेवीच्या यात्रेच्या मार्गावर असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला होता.
या सांगाड्यांवरुन हे सर्वजण दोन भिन्न जमातीतील लोक असल्याचंही आढळून आलं होतं. सांगाड्यांपैकी एका गटातील सांगाडे हे उंचापुर्या आणि मजबूत बांध्याच्या लोकांचे असल्याचं आढळलं. दुसर्या गटातील सांगाडे हे तुलनेने कमी उंचीच्या लोकांचे होते. शास्त्रज्ञांच्या मते उंच सांगाडे असलेले लोक हे यात्रेकरु होते. आपलं सामान वाहून नेण्यासाठी आणि या दुर्गम प्रदेशातून मार्गदर्शन करणार्यांसाठी त्यांनी स्थानिक जमातीतील वाटाड्ये आणि मजुरांची नेमणूक केली होती. आकाराने लहान असलेले सांगाडे हे या जमातीतील लोकांचे होते. तसंच या लहान सांगाड्यांच्या कवट्यांवर वर्षानुवर्षे डोक्यावरुन वजन वाहून नेल्यामुळे विशीष्ट खुणाही उमटल्या होत्या!
सुरेश वाळींब्यांच्या संशोधनानुसार यापैकी अनेक व्यक्तींच्या मस्तकातील हाडांची ठेवण एकाच विशीष्ट प्रकारची होती. ही ठेवण पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांच्या सांगाड्यातही आढळून आली होती. यावरुन हे सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य होते असा निष्कर्ष निघाला.
या सर्व सांगाड्यांची डि. एन. ए. टेस्टही करण्यात आली होती. या टेस्टचे निष्कर्ष तर आणखीनच विस्मयकारक होते.
या सांगाड्यांपैकी अनेक व्यक्तींचे डी. एन. ए. एकमेकांशी तंतोतंत जुळत
होते! हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते या वाळींब्यांच्या संशोधनाला
त्यामुळे पुष्टीच मिळाली होती.
हे सर्व डी. एन. ए. महाराष्ट्रात आढळून येणार्या एका विशीष्ट जातीच्या लोकांचे होते!
चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण!
रुपकुंडच्या परिसरात बळी पडलेल्या यात्रेकरुत महाराष्ट्रातील कोकणस्थ ब्राम्हण परिवाराचा समावेश होता!
सरोवराच्या परिसरातून अनेक प्रकारच्या हाडांव्यतिरीक्त इतरही अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या होत्या. यात विविध प्रकारच्या लाकडी वस्तूंचा समावेश होता. तसेच एक भाल्याचा फाळ, चामड्यापासून बनवलेली पादत्राणंदेखील आढळून आली. या सर्व वस्तूदेखील १२०० वर्षांपूर्वीच्या असल्याचं कार्बन डेटींगद्वारे सिद्ध झालं.
परंतु या सर्वांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
आकाशातून नेमकी कोणती गोष्ट त्यांच्या डोक्यावर येऊन आदळली?
आणि ती देखील इतक्या मोठ्या संख्येने?
याचं उत्तर होतं मोठ्या आकाराच्या गारा किंवा बर्फाचे गोळे!
क्रिकेटच्या बॉलच्या आकाराचे!
सर्व संशोधनाचा एकत्रित विचार केल्यावर शास्त्रज्ञांनी नेमकी घटना काय घडली असावी याविषयी रुपरेषा मांडली...
नंदादेवीच्या यात्रेसाठी निघालेले सर्व यात्रेकरु आणि त्यांनी बरोबर घेतलेले वाटाड्ये आणि मजूर रुपकुंड जवळ पोहोचले होते. पुढे मजल मारण्यापूर्वी पाणी भरुन घेण्यासाठी आणि थोडासा विसावा घेण्यासाठी सर्वजण उतार उतरुन रुपकुंडच्या काठी पोहोचले. दुर्दैवाने याच वेळी आभाळ फाटलं!
मोठमोठ्या गारांचा जोरदार वर्षाव सुरु झाला. या परिसरात कोणताही आडोसा उपलब्ध नसल्याने गारांपासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्यापाशी उरला नाही. अचानक सुरु झालेल्या गारांच्या मार्यापासून बचावाची संधीच कोणाला मिळाली नसावी. सरोवर खोलगट भागात असल्याने जीव वाचवण्यासाठी पळून जाणं म्हणजे चढावरुन धावत सुटणं हा एकच मार्ग होता. परंतु काही हालचाल करण्यापूर्वीच वर्मी बसलेल्या गारांच्या आघातामुळे बहुतेकजण कोसळून मरण पावले. उतारावर मरण पावलेल्यांचे मृतदेह गडगडत येऊन सरोवरात कोसळले.
कुमाऊं लोककथेतील नंदादेवीच्या शापामुळे दगडांचा पाऊस पडणे हा बर्याच अंशी श्रद्धेचा भाग असला तरी रुपकुंडच्या परीसरात मोठमोठ्या गारा पडल्याची अनेकदा नोंद करण्यात आली आहे. अशाच गारांच्या पावसाने या यात्रेकरुंचा आणि त्यांच्या सहाय्यकांचा बळी घेतला असावा.
एक प्रश्न मात्रं बाकी राहतो तो म्हणजे यापैकी काही जण वाचले का?
गारांचा अफाट पाऊस पडण्यास सुरवात झाल्यावर कोणताही आडोसा उपलब्ध नव्हता. पण यात्रेकरुंचं सामान तिथेच होतं. या सामानाखाली कोणी आश्रय घेतल्यास ते वाचण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. स्थानिक वाटाड्ये आणि मजुरांना तर हे सहज शक्यं होतं.
कदाचित काही जण वाचले असतील.. कदाचित सर्वजण प्राणाला मुकले असतील...
हे यात्रेकरु नेमके होते तरी कोण?
कोकणस्थ ब्राम्हणांच्या कुठल्या घराण्यातील होते?
राजा जशधवलच्या घराण्यातील कोणाचा यात समावेश होता का?
आपल्या मृत्यूची नेमकी कहाणी सांगण्यास असमर्थ... एक दुर्दैवी घटनेचे बळी असलेले....