Get it on Google Play
Download on the App Store

शिवसेना

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....शिवसेना........."


यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.

शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील म्हणजे शिवाजी पार्कवरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही..