तुमचे कुसुमाग्रज आम्हाला नकोतच.!
मराठी - मराठी करत भाषिक अस्मितांचे राजकारण करण्यासाठी वापरले जाणारे ते कुसुमाग्रज आम्हाला नकोतच. होय, अजिबात नकोत. नकोत त्यांच्या नावाचे जयकार आणि नकोत मराठी भाषा दिनाचे पंचतारांकित महोत्सवही. त्यापेक्षा नाशिकच्या जुनाट कौलारू घरातल्या प्राजक्ताच्या सावलीत विरून गेलेले विष्णू वामन शिरवाडकर हे नाव काळाच्या ओघात लुप्त झाले असते तरी ते आम्हाला चालण्यासारखे होते. पण आज जिकडे तिकडे ज्यांच्या नावाचा उच्च्चार केला जात आहे ते शिरवाडकर आम्हाला नकोत.
मराठी भाषेला अभिजात भाषांचा दर्जा मिळाला काय किंवा न मिळाला काय, आम्हाला त्याचे सोयरसुतक नाही. पोट भरूनही ज्यांच्या कणगीतले धान्य तसूभरही कमी होत नाही त्या तृप्तात्म्यांचे हे उद्योग आहेत.आमच्या नांगराला मोहरांचा हंडा लागून लक्ष्मीची कृपा झाल्याची स्वप्ने आता पडत नाहीत. पण पिकांचा पैका झाला नाही तर परसातल्या लिंबाला लटकणारे फास रोज आमच्या स्वप्नात येतात. अशा आम्हाला काय करायचेत तुमचे भोंगळ आणि नटवे मराठीप्रेम ? अशावेळी नाशिकच्या आदिवासी पोरांची शिक्षणे करणारा तो प्रेमळ कुसुमाग्रज आम्हाला हवा आहे.
'आपण सगळे फक्त मराठी आहोत ' असे सांगून 'या माझ्या मागे' म्हणणाऱ्या तुमचे कोणीच आम्हाला नको आहे. पण होय...एका महामानवाच्या मागे जाऊन काळाराम मंदिर सत्याग्रहात लढणारा आणि गोदावरीच्या 'पवित्र' रामकुंडात त्रिकाळ संध्या करूनही मने पवित्र न झालेल्या भूदेवांना , मायमराठीच्या पोट खपाटी गेलेल्या लेकरांचाही रामावर हक्क आहे, असे ठणकावून सांगणारा विद्रोही कुसुमाग्रज आम्हाला हवा आहे.
झाडाखाली उताणे पडून पेनाने टाळके खाजवीत यमके जुळवणारे आणि साहित्य संमेलनात त्या चिठ्ठ्या वाचून टाळ्या मिळवणारे कवी आम्ही खूप पाहिलेत. त्यांच्यावर 'सारस्वतांना राजाश्रय' या गोंडस नावाखाली होणारी उधळपट्टी देखील आम्ही पिकवलेल्या घामातूनच झाली आहे.त्यामुळे आम्हाला त्याचे अप्रूप ते काय? 'पैशाची रास लावल्याशिवाय शिकणे गुन्हा आहे' अशी पाटी लावली तरी आश्चर्य वाटणार नाही त्या मुलखात 'फक्त लढ म्हणा' असा संदेश देणारा शिक्षक कुसुमाग्रज आम्हाला हवा आहे.
सीमेवर युद्ध सुरु असताना 'बर्फाचे तट पेटून उठले , सदन शिवाचे कोसळते ! रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमवर ओघळते!!' असे लिहिणारा हा देशभक्त शत्रूला 'कोटी कोटी असतील शरीरे ,परि मनगट आमुचे एक असे !' हे ठणकावून सांगणारा आणि त्याचवेळी मराठी मातीचा लढाऊ बाणा जपण्यासाठी प्रेरणा देत राहणारा शाहीर कुसुमाग्रज आज आम्हाला हवा आहे.
देवाचा बाजार मांडणाऱ्या पोटार्थी जमातीची आपल्या 'देव्हारा ' या कवितेतून टर उडवणारा पण त्याच वेळी समाजाच्या दुर्धर रोगावर आपल्या 'पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना,' गाभारा सलामत तर देव पचास.' अशा शब्दांनी बोट ठेवणाऱ्या शिरवाडकरांना तुम्ही ओळखत नसालच. देव माणसाचे नाही तर माणूस देवतांचे योगक्षेम चालवतो,हे उघड करून दाखवणारा तो बंडखोर कुसुमाग्रज आम्हाला हवा आहे.
आईबापांच्या कमाईवर उचलेगिरी करणाऱ्या आणि पंखात बळ आल्यावर त्यांनाच घराबाहेर काढणाऱ्या औलादी इथेही जन्माला येतात. पण अश्या कित्येक आसवांच्या नद्या वृद्धाश्रम नावाच्या धरणात अडवल्या जातात आणि अडगळीच्या खोलीतल्या खाटेवरून वाहणारे उष्ण ओझर दाराबाहेर पडेपर्यंत सुकून जातात. 'नटसम्राट' नाटकातून त्या हरामखोरांची थोबाडे रंगविणारा कठोर कुसुमाग्रज आम्हाला हवा आहे.
गोरगरिबा छळू नका ! पिंड फुकाचे गिळू नका ! गुणीजनांवर जळू नका ! असे टाहो फोडून सांगणारे कुसूमाग्रज जर आपल्या नावे चालणारा सोहळा पाहायला जिवंत असते तर पुन्हा बर्फाचे तट त्यांनी पेटवले असते. माय मराठीवर तिच्याच पोरांनी चालवलेले बलात्कार त्यांनी पहिले असते तर पुन्हा त्या दग्ध दधीचि सावरकरांची शपथ घेऊन लढा उभारला असता त्यांनी. कोमल आणि नवोन्मेषशालिनी अशी त्यांची लेखणी ठिणग्या प्रसवू लागली असती. तसे सारे कल्पना ठरले तरी केवळ बोलघेवड्यांची ही थेरं पाहून ज्यांच्या मेंदूतून ठिणग्या फुटू पाहतात त्या साऱ्यांना आमचा कुसुमाग्रज हवा आहे. तुमचा नाही.
लेखं - संकेत कुलकर्णी