Get it on Google Play
Download on the App Store

सावरकर साहित्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक,ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.

सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.

सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत[] यांनी गायल्या आहेत.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.