Get it on Google Play
Download on the App Store

महाराष्ट्रात महानुभाव

: यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाची पुरस्कार केला. ‘महानुभाव’ या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. महानुभाव’ शब्दाचा ‘महान् अनुभवः तेजः बलं वा यस्य’ असाही अर्थ केला जातो. डॉ. वि. भि. कोलते यांच्या मताप्रमाणे या संप्रदायाचे मूळ नाव ‘परमार्ग’ असेच होते (लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५). चक्रधरोक्त ⇨सिद्धांतसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात श्रीचक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधिश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभु आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी श्रीदत्तात्रय, श्रीकृष्ण श्रीचक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे. देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना ⇨साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर ल श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशुद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपसना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभवांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत. महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायांपैकी महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. त्यांना "पंचकृष्णा" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सुत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात. संदर्भ :- http://bhagvans.blogspot.in