संत सावता महाराज
‘कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे,
कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे,
थोर संत म्हणजे संत सावता महाराज.
कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्र्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज आहेत. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती.
अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.
‘‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्र्वर भेटतो.
‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग
मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी,’’
असे म्हणणार्याह सावता महाराजांना त्यांच्या मळ्यातच विठ्ठलदर्शन होत असे.
त्यांच्या सर्व अभंगरचना काशिबा गुरव यांनी लिहून घेतल्या आहेत. अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
संत नामदेव म्हणतात -
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।
संत सावता महाराज हे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्र्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. महाराजांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.