Get it on Google Play
Download on the App Store

२. दोघे सोबती

रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन. असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले? रामा बोलला, हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे. हे ऐकून हरी फारच खजील झाला.

चिमुकली इसापनीती

राम गणेश गडकरी
Chapters
१. उंदीर व बेडूक २. दोघे सोबती