Get it on Google Play
Download on the App Store

१. उंदीर व बेडूक

एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.

चिमुकली इसापनीती

राम गणेश गडकरी
Chapters
१. उंदीर व बेडूक २. दोघे सोबती