Android app on Google Play

 

पत्र क्रमांक - 6

 

अनाहूत असे पत्र लिहितोय त्याबद्दल क्षमस्व !
सर्वप्रथम हे जाहीर करतो की, प्रस्तुत लिखाण म्हणजे रुढ अर्थाने प्रेमपत्र वा तत्सम कसलाही प्रकार अजिबात नाही. केवळ माझ्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन द्यावी या साठी केला गेलेला हा पामर प्रयत्न आहे.

एक महत्वाची बाब मला विशद करावीशी वाटते की मी हे असे पराक्रमी लिहून तुझे मन वळविण्याचा  किंवा माझ्याबद्दल विचार करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत नाही.. वा तसा तुला विचार करायची गरजच नाही. तू तेवढी करारी आणि बाणेदार आहेस.. ( अरे हो की हाही गुण मला तुझा भावला होता!) तुला माझ्या केवळ शुद्ध भावना कळाव्यात हाच एकमेव हेतू ह्या लेखणात आहे...

आजवर जे काही दोन आठवड्यात घडले वा नकळतपणे घडवले गेले ते विलक्षण होते. एकूणच माझ्या हातून जे घडले ते कसे वा का घडले? ते अजून मला उमगत नाही. आजवर असे भावनाविवश वगैरे होणे मला पहिल्यांदाच  भावतेय. कारण मी स्वतंत्र विचार करणारा समाजशील प्राणी आहे. माझ्या जगण्याच्या आखीव-रेखीव अशा पाच मिती आहेत. वाचन -लेखन-मनन-चिंतन-सूक्ष्म निरीक्षण. या सर्वांचे प्रवाही सिंहावलोकन म्हणजे माझे जीवन.

एकूण मौज आहे बरं का? कोणी एक मुलगी माझा  असा मानसिक कल्लोळ करेल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मुळात मला आजवर ज्या मुली आवडल्या त्यांच्यापाशी मी अशाप्रकारे कधीच व्यक्त झालो नाही. कारण मध्यमवर्गीय संस्कार !!!! आजकाल सभोवतालचे वातावरण खुप बदललेलं होतं. तुला सांगितलेलेच आहे की घरी माझ्या लग्नाचा विचार चालू आहे. मग काय, चर्चा , गप्पा, टोमणे सगळे कसे मजेत रमले... त्यात १ जुलैला मी रात्री जिलाटो इटालिनो मध्ये आल्यावर नकळतपणे तुला पाहून जरा वेगळेपणा वाटला.. थोडेसे अंतर्मनात डोकावले व माझ्या घरात साजेशी, सोज्ज्वळ, सुसंस्कृत अशी व्यक्ती - माझी पत्नी म्हणून तू म्हणून यावीस असे वाटले. अर्थात मला प्रेम भानगडी वगैरे तकलादू प्रकार अजिबात रुचत नाहीत. वा त्याबद्दल मला फार राग आहे. असे प्रकार म्हणजे केवळ वरवरची गरज भगवण्याचे सोपस्कर आहेत- मग ते शारिरीक असो वा मानसिक.

मला तुझ्याशी लग्न करायचे या सभ्य हेतूने मी ११ जुलैला "तसे" व्यक्त झालो. म्हणजे हल्लीच्या भाषेत प्रपोज केले. अर्थात लग्नासाठीच. मात्र त्यावेळी पुढे माझी एवढी अतोनात घुसमट होईल असे तिळमात्र वाटले नव्हते. का कुणास ठाऊक डोळ्यात मला चक्क होकार दिसला होता. त्यात मी गणपती मंदीरात बोलवले की तू आलीस. मला वाटले सगळे कसे मनासारखे होतेय... त्यात तू विचार करुन सांगते म्हटल्यावर मला तोळाभर  मांस चढले. मला वाटले की तू होकरासाठी विचार करायला वेळ घेतला.  मला तुझ्याबद्दल काही फिलिंग्स नाहीत असे त्याच वेळी सांगीतले असतेस तर पुढे होणारा माझा एवढा मानसिक त्रास वा वैचारिक कल्लोळ तरी वाचला असता...
असो  मला तुला प्रतिप्रश्न करायचा किंचीतही अधिकार नाही. मुलींच्या मनात काय चालते याचा ब्रम्हदेवाला सुद्धा सुगावा लागणे शक्य नाही त्यामुळे मी विचार करणे म्हणजे करंटेपणाचे ठरेल. एकूण मी आजवर मोकाटपणे जगलो. व्यासंगी म्हणून वावरलो. स्वत:च्या जगण्याच्या व्याख्या मीच करून मौजेने फिरलो. सुख-दु:ख, आर्थिक चणचण वगैरे क्षुद्र गोष्टींचा त्रास आनंदाने सहन केला. मात्र ’असा’ त्रास सहन करणे माझ्या परीने फार जिकरीचे आहे.. म्हणून हा लेखन प्रपंच....

एकूणच कुतरोड होऊ लागली की माणूस विलक्षण निराश होतो. अगदी तसेच माझे होत असावे. मी  कुटुंबसंस्था मानणारा आहे.त्यात लग्न ही पराकोटीची, मांगल्याची, सोळा संस्कारातील महत्वाची घटना आहे. मला माझ्या भावी सहचारिणीमध्ये जे गुण, स्वभाव हवे होते ते तुझ्यात दिसले. हीच सुरुवात तुझ्याकडे आकर्षिले जाण्याची. कारण मला आकृष्ट करण्याजोग्या ज्या काही बाबी आहेत त्या तुझ्यात ओतप्रोत आहेत....त्यात माझ घर धर्मिक, सणासुदीचं प्रचंड जोपासना करणारे.. त्यात जुलै ऑगस्ट  महीने सुरु झाले की (मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु झाला की) माझे मन फार एकाकी असल्याचे जाणवते... कोणीतरी आपले असावे याची हुरहुर फार वाटते.आणि नेमके याच दिवसात महाविद्यालये सुरु होतात. त्यातून मी पुण्यामध्ये शिकलेला मुलगा... तिथे ज्या मुली पाहण्यात आल्या त्याबद्दल मी आता काही सांगू ईच्छित नाही.. यावर किमान मी एक प्रबंध लिहू शकतो .. एवढा माझा अभ्यास आहे.... असो... त्यामुळे तुलना करायची झालीच तर तू त्यांच्यापेक्षा फार वेगळी आहेस... सालस, सभ्य, सुसंस्कृत, घरगुती वगैरे वगैरे.. म्हणून मला तुझ्याकडे एक विलक्षण जागृत ओढ वाटली... कदाचित यालाच प्रेमाची सुरुवात म्हणत असावेत... एकतर्फी
तुझ्याबाबतीत मी तुझ्या नकाराधिकाराचा कधीच विचार केला नाही. मला तू आवडतेस म्हणजे मी तुला आवडायला पाहिजेच असे काही नाही. हा दुधखुळा विचार मी केला.तसंही हे एक छान झाले माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला योग्यवेळी....  कारण आजवर माझा असा भ्रम होता की मुली मुलांचा विचार करताना त्याचा स्वभाव, कौशल्ये, विश्वास व कुवत पाहतात. या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत... पण असुरक्षितता आहे ती पैसा..अडका..घर.. गाडी वगैरेची...
या व्यवहारी जगात असा सो-कॉल्ड विचार करने स्वाभाविक आहे.. शिवाय माझ्याबद्दल जर तुला काहीच वाटत नसेल तर ईतर बाबींचा तपशील व्यर्थच म्हणावा लागेल.... त्यात तुझा जो निर्णय आहे तो मला शिरसावंद्य ! उगाच तुझ्या मागे पुढे करून तुझे मन वळवायला ना तुला आवडणार अन् माझ्या तत्वात असे अवास्तव नाही बसत.

मुळात  भावना ही मनाच्या केंद्रस्थानी असते तीच तुला नाही तर मी कितीही प्रयत्न केले तरीही काही उपयोग नाही. हे सगळे सिनेमामध्ये चालते... आणि मी आयुष्याकडे खूप प्रॅक्टिकल म्हणून पाहणारा आहे.. मला वास्तववादात जगायला आवडते... कारण  माझ्या एकूण सामाजिक जाणीवा आणि बौध्दिकं वास्तववादाच्या जवळीक साधणारे आहे... असो... जड लिहायला नको... उगाच साहित्यिक अंगाने लिहू लागायचो...

कारण मला अजून समजत नाही की तुझा नकार मी का पचवू शकत नाही? मला तुझ्याशिवाय दुसरी कोणी भावेल असे आत्तातरी वाटत नाही.. किंवा एकदा दुधाने तोंड पोळले तर ताकसुद्धा फुंकुन प्यावे लागते.. अशा प्रकारे मी पुन्हा असे प्रयत्न करीन मला वाटत नाही. किंवा मी तुला गृहीत धरले... तुझे कोणीतरी असेल वा घरगुती अडचणींमुळे तू नकार देत असावीस असा विचारच मी कधी केला नव्हता.. आज असे लिहिताना मला प्रकर्षाने जाणवतेय... असो... काहीतरी हरवल्यागत झालेय.. परीक्षेत बसण्याआधीच नापास झालोय. अशी हृदयद्रावक अवस्था झालीये.

कारण मी तुझा खुप खोलवर विचार केला होता... तुझ्याकडे बौद्धिक, वाचिक असे सर्व काही पक्के दुवे मला आढळले होते.. आणि ते तुझ्यात पुरेपूर आहेत...  ते मला भविष्यात एक सहकारी म्हणून उपयोगी पडणारे आहेत.. नाटक.. सिनेमा... महितीपट.. साहित्यविषयक वगैरेंसाठी... त्याच स्वप्नात मी रमलो होतो.. मनाचे ईमले रचू लागलो होतो... मनसुबे आखू लगलो होतो.. तुला माझ्या सारखा मिळणार नाही अश्या भ्रमात राहीलो होतो...तुझ्या आजपर्यंच्या माझ्यासोबतच्या वागण्याचा, बोलण्याचा हसण्या-खिदळ्ण्याचा वेगळाच गैरसमज केला होता ... असो...
आता मला काहीतरी सांगायचे आहे ते लिहितो... माझ्याबद्दल तुझ्या मनात जे स्थान होते ते मी कायमचेच गामावून बसलोय... व पुन्हा ते मला मिळणार नाही... याची मला पुर्ण खात्री आहे. तरीही माझे तुझ्या बाबतीत असे का व्हावे... त्यबद्दल केलेल्या चिंतनातून...मननातून असे लिहिते झलोय... माझी निवड ही नेहमीच सर्वोत्कृष्ट असते.. आणि ती मला प्राप्त झाली की सर्वश्रेष्ठ होते...... एकूणच मला जिच्यामुळे आयुष्यात असा पहिल्यांदा त्रास झाला तिला हे कळावे की मी कसा आहे हाच सभ्य हेतूने ह्या लिखाणाचे शिवधनुष्य पेलले आहे. एक नमूद करतो की ह्या लेखनाद्वारे मी माझी सालंकृत बाजु मांडू ईच्छितो...
एकतर मी माझे आत्मचरित्र वगैरे सांगणार नाही.. कारण मला आत्मचरित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचे वाटते... चारित्र्याला चिंतनाची जोड असेल  आणि वैचारिक बैठक पक्की असेल तर सर्व गोष्टी पाण्यासारख्या स्वच्छ दिसतात. तसेच माझे आहे...

तुझ्या मनात माझेविषयी जे काही कडू गैरसमज आहेत.. वा हीनपणाची भावना आहे ती कशी चूक आहे हे प्रस्तूत लिखाण वाचल्यावर कळावे.. हीच रास्त अपेक्षा... मी एक कलंदर माणूस आहे. व्यक्त होताना पराकोटीचा सच्चेपणा बाळगतो.. कसलीही पर्वा करत नाही...तुला काही बाबी विशद करायच्या होत्या म्हणून हे असे लिहितोय... बोलून सुद्धा या भावना व्यक्त होतील मात्र तुला पाहीले की माझी प्रचंड घुसमट होते.. फार त्रास होतो... बोलणे शक्य होत नाही.. हात-पाय थरथर कापतात... म्हणून असे लिहितोय...मी तुझ्याबाबतीत कधीच फालतू विचार केला नव्हता..आणि कदापि करणारही नाही... केवळ एक समजूतदार सहकारी म्हणून मला तू हवी होतीस.. त्यासाठी मला तुझ्याशी चर्चा, गप्पा करायच्या होत्या... अर्थात हे सर्व तुला सांगितले आहे... उगाच मनात एक भाव ठेवून मला बोलायला अजिबात आवडत नाही... जे आहे ते स्पष्टपणे.. निर्भिडपणे... बोलणारा माणूस आहे मी... ओठात एक पोटात दुसरे. असा दुटप्पी पणा मला सहन होत नाही.. मात्र हा अस एकतर्फी विचार करताना हे साफ विसरलो की तुझ्याही काही भावना असतीलच की... एकंदरीत व्यवहार्यपणे तू माझा विचार का करावास.?

एक तर मी इंजिनिअर नाही.. स्थायिक नाही.. घर-दार, पैसा-अडका यांची भ्रांत आहे... फार देखणा नाही ... व सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींच्या नजरेत भरावा असा रुबाबदार पण नाही ... मला तू का हवी होतीस याचे एकमेव कारण म्हणजे तू माझ्याच जातीतली आहेस आणि दुसरे महत्वाचे  तू एक इंजिनिअर आहेस. तसा मी जात-पात मानत नाही. मात्र लग्नामुळे दोन कुटुंब जोडली जातात.दोन समान संस्कारातील, चालीरितीतील कुटुंब एकत्र होण्यासाठी जातीला प्राध्यान्य दिलं गेलं पाहिज. असो यावर जास्त लिहित नाही उगाच भरकटले जाईन. असो.

माझी इंजिनिअर होण्याची फार इच्छा होती.. मात्र बारावीनंतर प्रवेश मिळून देखिल मला आर्थिक अडचणींमुळे इंजिनिरींगला जाता आले नाही... ते माझे आयुष्यातील फार वाईट दिवस होते अजुनही गहीवरून येते तुला आता काय सांगू शिकण्यासाठी... म्हणून मी किती उपद्व्याप केलेत... असो खुपच आत्मचरित्रात्मक लिहू लगलोय..तर याकरीता मला माझी बायको इंजिनिअर हवी होती... असो आता हे कायमचेच दीवास्वप्न झाले..
बाकी काय सांगावे...गेली १० - १२ वर्षे मी पुण्यात फार मोकाटपणे वावरलो... मात्र तत्त्वाने जगलो.. मला जे आवडेल, मनाला रुचेल व आत्मिक समाधान मिळेल असेच जगलो...उगाच जगच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही... मध्यमवर्गीय कुबटलेपणातून बाहेर पडलो.. चौकटीबाहेरचा विचार करु लागलो... उगाच जगाच्या प्रवाहात मिसळून गेलो नाही.... कदाचित याच कारणांमुळे मी मागे राहीलो.. बाकीचे माझ्यासोबतचे फार पुढे गेले... मी मात्र अजागळपणे जगण्याचे अर्थ शोधीत बसलो..

मला मात्र याची पर्वा नव्हती की  खंत  नव्हती... आता मात्र खेद वाटतो... कारण व्यवहारी जगात स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी झुंजणाऱ्याला जिन्याखालचा अंधार मिळतो.... असो.प्रारंभी सांगावेसे वाटते असे की मला तुझ्याबाबतीत असे कसे एकाएकी जाणवू लागले, आज मागे वळून पाहताना कळते की, तुझ्याबाबतीत जेव्हा गॉसिप होत असे.. एकूणच... जुलै महीन्यात मला मनातून कसंनुसं होई. का कुणास ठाऊक.. कारण आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीविषयी जेव्हा असे प्रकार कानावर पडतात तेव्हा... असे होत असावे... कदाचीत तुझ्यात गुंतण्याची सुरुवात इथूनच झाली असावी... तारुण्यसुलभभावना ह्या असतातच की... असो... मुळात तुझ्या बाबतीत मला नंतर एवढा त्रास होइल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते... शपथ घेउन सांगतो... मला आयुष्यात असे अनुभव पहील्यांदाच आले आहेत... तू अशी एकमेव मुलगी भेटलीस की जिच्यामुळे माझे मन जेवणात रमत नाही की झोपण्यात रमत नाही... असे कसे व्हावे याचा अचंबा वाटतो...कदाचित तू माझा जेव्हा त्या दोन दिवसात विचार केला असल्यास.. तुला जे तुझ्या पार्टनरमध्ये स्वभाव गुण, सुरक्षितता वा अनेक अशा गोष्टी त्या माझ्यात दिसल्या नसाव्यात.... वा मी तुझ्या लायक नसावा...किंवा तुझ्या काही अडचणी असतील .. असे एक ना अनेक प्रकारे विचार मंथन मी केले.. करतो आहे... असो... असे माझे अनेक विचारांचे खंडन-मंडन अविरतपणे चालूच राहते..... लेखक बनण्याची फार हौस आहे म्हणून...एक मात्र खरे आहे की मला तुझा नकार फारच जिव्हारी लागला आहे.. वेदना तीव्र होताहेत… आपण कोणालातरी आवडत नाही याची जाणीव मनाला चटका लावून गेलीये... असो

मी मुलींच्या भावविश्वावर काही लिहीणार नाही.. हा माझ्या आवडीचा विषय आहे... एकूणच वैष्यम्य वाटेल तुला की, कोण कुठला गावठी मुलगा १५-२० दिवसात एवढा गुंतलाय....? कारण मी सच्चेपणाने प्रेमात पडलोय.. एकतर्फी.. म्हणून हा अजब खटाटोप.. कारन आवडतेस असे सांगितल्यावर तू चक्क प्रपोजल समजून नकार दिलास... आता तर प्रेमात पडलो असे सांगण्यासाठी काय करू... असो.. एरवीच मी तुझ्या मनातून सफ उतरलो आहेच आहे.. हे असे लिहून तुला वाचायला देवून अजून तिरस्कार ओढवून घेइन... मात्र माझ्या मनातील विचार तुला लिहून दाखवण्याखेरीज कोणताही पर्याय  मजजवळ नाही... असो... आजवर मी तुझा खूप खोलवर विचार केला.. तोही एकमार्गी... कारण मी पुढे-मागे पुण्यातच स्थायिक होणार आहे. तुझ्याबद्दल अतिटोकाचा विचार केला सर्व बाबींनी... मश्गूल झालो होतो... मात्र एक चुकलो तुझ्या बाजूने विचार केलाच नाही.. मगाशीच लिहीले आहे... की मी तुला गृहीत धरले होते..मला वाटले तू पैसा, घर-दार, सो -    कॉल्ड सेटल्ड वगैरे... न पाहता केवल माझा स्वभाव, सुसंस्कृतपणा पाहशील.मला मुली अशा बाबतीत कसा विचार करत असतील याची कल्पना नाही.  असो...तुझ्या जागी तू बरोबर माझ्या जागी मी... मला याचा खेद वाटतो.. तुला माझ्याबाबतीत काहीच फिलिंग्ज  नाहीत असे तू आज मला बाल्कनीत सांगितलेस...आणि मी पण तुला बळजबरीने माझा विचार कर म्हणून सांगू शकत नाही.. कारण प्रत्येकाला स्वतःचा नकाराधिकार असतोच आणि तो त्यांनी त्याचा योग्यवेळी वापर करावा असे मानणारा मी आहे. तुझ्या नकाराधिकाराचा मी मान राखलाच पाहिजे कारण आवडणाऱ्या व्यक्तीचं हित आणि त्याचं मत हेच महत्वाचं. त्यात मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कर्ता आहे. असो......


बैठकीची लांबी फारच वाढली आहे...मी तुझ्या बाबतीत खुप अपेक्षा ठेवून बसलो होतो.. हे साफ विसरलो की अपेक्षा ही भ्रमनिरास होण्याची पहिली पायरी आहे...उगाच मनसुबे रचून, मनचे इमले रचून काही होत नाही... जे आहे ते असेच आहे.. आणि ते तसेच राहणार... मी काही सिनेअभिनेता वगैरे अजिबात नाही.. कुछ भी करुंगा लेकीन तुझे हासिल करके रहुंगा.. वगैरे सिनेमात छान दिसते... वास्तवात नाही... मी मात्र फार निराश झालो आहे.. मला आता वाटत नाही की मी कोणच्या तरी पुन्हा प्रेमात पडेन.. कारण प्रेम हे एकदाच होत असते.. नंतर केवळ त्याची पुनरावृत्ती  होत असते. आडजेस्टमेंट म्हणून जगणे सुरु होते.. नंतर तेच हळूहळू आवडू लागते.... असो... एक मजेशीर गोष्ट नमूद करतो.. तुझ्या नकारामुळे मला माझ्यातली विलक्षण सहनशक्ती गवसली आहे. आणि ती जोपासली जातेय... हाही अनुभव जगण्यात येणे होते म्हणून असे सगळे घडले असावे.. असे मानून पुढे जायचे... आता जास्त काय लिहावे तुर्तास एवढेच लिहून थांबतो... वाचल्याबाद्दल धन्यवाद...
22 जुलै 2012

 

पत्रावळी

Bhushan Vardhekar
Chapters
पत्र क्रमांक - 9
पत्र क्रमांक - 6
पत्र क्रमांक - 7