ज्वालामुखी
जॉर्डन आणि त्याची टीम जपानला पोहोचते. टोकयो विमानतळावरून ते सर्वजण इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्केओलॉजीमध्ये जातात. तिथे त्यांना जपानमधील प्राचीन अवशेषांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. जपानमध्ये सतत भूकंप होत असल्याने तेथील प्राचीन कालीन माहिती मिळणे कठीण जाते. संग्रहालयामध्ये माहिती मिळवत असताना तेथील मुख्य व्यवस्थापक ब्रूस त्यांची मदत करतो. अँजेलिनाप्रमाणेच ब्रूस हा देखील प्राचीन भाषांचा अभ्यासक असतो. त्याच्या कार्याची दाखल घेत जपान सरकार त्याची इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्केओलॉजीच्या मुख्य व्यवस्थापक या पदावर नियुक्ती करतात.
जॉर्डन आणि ब्रूस यांची जुनी ओळख असते. त्या दोघांनी साधारण १५ वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं. ब्रूसला जॉर्डनबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा होती. जॉर्डन स्वतः एका मोहिमेवर आल्याने आणि आपण स्वतः त्याला मदत करत असल्याने त्याला आनंद होतो. मोहिमेची माहिती देत असताना जॉर्डनने त्याला डॉ.अभिजीतच्या हातावर अचानकपणे कोरलेल्या संकेतांबद्दल सांगतो. ब्रूसला ही गोष्ट कळताच तो जॉर्डनसह अभिजीतला भेटावयास जातो.
डॉ.अभिजीत हे लिसा आणि अँजेलिना यांच्याबरोबर जपानच्या प्राचीन अवशेषांवर चर्चा करत असतात. ब्रूस त्याच्या हातावरील सांकेतिक भाषा बघणार इतक्यात डॉ.अभिजीतच्या हातावर कोरलेले संकेत पुसटसे होत जातात आणि बघता बघता ते शब्द पूर्णपणे मिटून जातात.
"हे कसं काय झालं? इतक्या दिवसांपासून मी प्रयत्न करत होतो आणि ते आता निघून गेलंय. पण नक्की ते काय होतं?" डॉ.अभिजीत उत्साहाने म्हणतो.
"याचा संबंध नक्की प्राचीन गोष्टींशी आहे. मी ती भाषा थोडक्यात बघितली. मी ती वाचू शकतो. आपल्याकडे त्या सांकेतिक शब्दांचे फोटो आहेत का?" ब्रूस जॉर्डनला म्हणतो.
"हो हो. आम्ही त्या शब्दांचे फोटो काढले होते." असं म्हणत तो डॉ.एरिक यांना त्यांनी हिमालयामध्ये काढलेले फोटो घेऊन बोलावतो. डॉ.एरिक ब्रूसला त्या फोटोच्या प्रिंट देतो. ब्रूसला ती प्राचीन भाषा समजत होती. अँजेलिना, डॉ.अभिजीत, जॉर्डन, लिसा आणि डॉ.एरिक त्यांच्याजवळ बसलेले असतात. बराच वेळ त्या शब्दांकडे निरखून पाहिल्यावर ब्रूस बोलू लागतो.
"ही भाषा साधारण ४,००० वर्षांपूर्वीची आहे. एक आत्मा आहे जो त्या काळातील पूर्वेकडील प्रदेश म्हणजे आताचा जपानमध्ये मृत्युमुखी पडला होता. त्या काळात काहीतरी अघटीत घडलं होतं ज्यामुळे संपूर्ण जगाचा नाश झाला होता. तुम्ही हिमालयामध्ये ज्या आकृतीला स्पर्श केला होता ती आकृती तुम्हाला इथे येऊन त्या आत्म्याला जागृत करायला सांगत होती." ब्रूस म्हणतो.
"हे नक्की खरं आहे का?" जॉर्डन लालसेने विचारतो.
"जॉर्डन, माझ्या मित्रा. २३ वर्षांपासून प्राचीन भाषांचा अभ्यास करतोय आणि ही भाषा जपानच्या प्राचीन भाषेशी अगदी मिळती जुळती आहे." ब्रूस म्हणतो.
"तो आत्मा नक्की कुठे आहे?" डॉ.एरिक विचारतात.
"याची मला काही कल्पना नाही. त्यांनी तसं काहीही नमूद केलेलं नाहीये. आता आपल्यालाच त्या जागेचा शोध घ्यावा लागेल." ब्रूस म्हणतो.
"मग? कुठून सुरुवात करायची?" जॉर्डन विचारतो.
"तसं नाही. तुमच्यापैकी कुणीही जपानचा नागरिक नाहीये. तुम्हा सर्वांसाठी मी एक अर्ज लिहितो. मग आपण मोहिमेला मार्गी लावू." ब्रूस म्हणतो.
"मग सध्या तुम्हाला नक्की काय हवं आहे?" डॉ.अभिजीत विचारतो.
"मला तुम्हा सर्वांची फोटो आणि आय.डी.प्रुफ हवी आहेत." ब्रूस म्हणतो.
जॉर्डन लगेचच त्याला सर्वांची फोटो आणि आई.डी.प्रुफ उपलब्ध करून करून देतो. यामध्ये त्याचा, डॉ.अभिजीत, डॉ.एरिक, डॉ.मार्को, अँजेलिना, लिसा आणि इम्रान यांचा समावेश असतो. जपान सरकारकडून तो लगेचच त्या सर्वांच्या नावाची शिफारस करतो, जपान सरकार त्यांना तत्काळ परवानगी देते.
आता ब्रूस देखील जॉर्डनबरोबर होता. तो जॉर्डनला जपानमधील प्राचीन गोष्टींची माहिती देतो.
"आपल्याला आता विभागून काम करायला हवं. जपानमध्ये एकूण २६ अशी ठिकाणे आहेत जिथे आपण जाऊ शकतो. ती ठिकाणं म्हणजे गोर्योकाकू किल्ला, सांनी मारुमाया, मोत्सुजी मंदिर, जोडो गार्डन, तागा वाडा, शाही पॅलेस, कामकुरा, टोरो, टोडिजी मंदिर..." ब्रूस पुढे बोलणार इतक्यात.
"आपल्याला ४,००० वर्षांपूर्वीच्या गोष्टी हव्या आहेत." जॉर्डन त्याला थांबवत म्हणतो.
"इथे इतके प्राचीन फक्त ज्वालामुखी आहेत." ब्रूस म्हणतो.
"मग आपण ज्वालामुखी असलेल्या ठिकाणी जाऊ." जॉर्डन म्हणतो आणि आपल्या सहकाऱ्यांकडे बघत विचारतो, "ज्वालामुखी जवळ जाण्यापासून कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?" सार्वजन मोहिमेला येण्यासाठी सहमती दर्शवतात.
"जपानमध्ये २०० पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत. यात आपला भरपूर वेळ जाईल." डॉ.मार्को म्हणतात.
"सर्वात अगोदर आपण माउंट ओंकटो, साकुजीमा आणि माउंट फुजी या तीन ज्वालामुखीजवळ रिसर्च करायला हवा." डॉ.अभिजीत म्हणतो.
"या तीन ठिकाणी का?" ब्रूस विचारतो.
"जपानमध्ये हेच असे तीन ज्वालामुखी आहेत ज्यांच्याजवळ म्हणावं तसं संशोधन करता आलं नाहीये." डॉ.अभिजीत म्हणतो. सर्वांना अभिजीतचं बोलणं पटतं. "मग आपल्याला तीन गट पाडावे लागतील."
"एक काम करूया, अँजेलिना, डॉ.मार्को आणि इम्रान माउंट ओंकटो येथे जातील. लिसा, डॉ.एरिक आणि ब्रूस साकुजीमा येथे जातील. राहिलो मी आणि डॉ.अभिजीत, आम्ही दोघे फुजियामा येथे जाऊ. कुणाला काही शंका?" सगळे नकारार्थी मान हलवतात. "ठीक आहे. आपण उद्या सकाळीच मोहिमेला निघू."