जपानला प्रयाण
जॉर्डनच्या म्हणण्यानुसार सगळे जपानला जाण्यासाठी तयारी सुरु करतात. डॉ.अभिजीत आणि डॉ.एरिक आपल्याजवळ असलेले नोट्स आणि आराखडे बरोबर घेतात. इम्रान स्केचिंगची साहित्य सोबत घेतो. अँजेलिना आणि लिसा इंटरनेटवरून जपानविषयी माहिती मिळवतात. दुसरीकडे जॉर्डन सर्वांची जपानला जाण्यासाठीची तिकिटे बुक करतो. या सर्वांमध्ये डॉ.मार्को यांच्या मनात काही वेगळंच चालू असतं. आपल्या मनातील शंका ते अँजेलिना आणि लिसा या दोघींना सांगतात. तिघेही त्या गोष्टीवर बराच वेळ चर्चा करतात आणि ती गोष्ट जॉर्डनला सांगायला जातात. जॉर्डन त्याच्या रुममध्ये मोबाईलवर इंटरनेट सेटिंग सेट करत असतो. डॉ.मार्को, अँजेलिना आणि लिसा या तिघांना एकत्र येताना पाहून तो 'काय झालं' म्हणून विचारतो.
"सर, आपण खरंच जपानला जाण गरजेचं आहे का?" अँजेलिना जॉर्डनला विचारते.
"का? अचानक तुला काय झालं?" जॉर्डन तिला आश्चर्याने विचारतो.
"तसं काही नाही सर, पण आम्हा तिघांना जरा शंका होती. आपल्याला सी-हॉर्सची जी आकृती दिसली, ती एका अर्थाने जपान देश दर्शवते तर दुसऱ्या अर्थाने ती खोल समुद्र सुद्धा दर्शवते. मग आपण खोल समुद्रात जायला हवं का?" अँजेलिना पुढे म्हणते.
अँजेलिनाच्या या वाक्याने जॉर्डन देखील बुचकळ्यात पडतो. तसं पहायला गेलं तर अँजेलिनाचं बोलणं चुकीचं नव्हतं. पण मग पुढे नक्की काय करायचं? डॉ.अभिजीतच्या निरीक्षणानुसार जपानला जायचं कि अँजेलिनाने काढलेल्या तर्कानुसार समुद्राखालील गोष्टींचा अभ्यास करायचा हा प्रश्न जॉर्डनसमोर उपस्थित होतो.
"बरं तुम्ही तिघांनी एक काम करा. सी-हॉर्स आणि जपान या दोन्ही गोष्टींवर सकाळपर्यंत रिसर्च करा. आणि सी-हॉर्सवर काम करण्यापेक्षा समुद्री जीवांवर रिसर्च करा. बघा काही लिंक लागते का? तुम्ही तिघेही सकाळपर्यंत योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचाल याची मला पूर्ण खात्री आहे." जॉर्डन त्या तिघांना रिसर्च करायला सांगतो आणि ते लगेचच कामाला लागतात. साधारण पहाटे ४ वाजेपर्यंत तिघांचं काम संपतं.
डॉ.मार्को जॉर्डनला त्यांच्या अहवालाबद्दल सांगतात, "आम्ही तिघांनी रिसर्च करत समुद्री जीवांवर पुढील माहिती मिळवली आहे. आपण जर महासागरात मोहीम सुरु करायचं म्हणू तर महासागर आणि त्यालगतच्या समुद्रांनी पृथ्वीचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापला आहे आणि याचा बराच मोठा भाग असंख्य संबंधित जीवांना समृद्ध आढळला आहे. त्यांपैकी कोणताही भाग पूर्णतः जीवरहित नाही; मग तो अत्यंत थंड असो किंवा फार खोल आणि अंधारी असो. महासागराच्या वरच्या थरात रंगयुक्त वनस्पती आढळतात कारण तेथपर्यंत सूर्यप्रकाश परिणामकारकपणे जाऊ शकतो व त्याचा उपयोग त्या वनस्पतींना प्राथमिक अन्ननिर्मितीकरिता होतो. त्याखालील सागरात सर्वसाधारणपणे २० से. ते ३००से. या पल्ल्यातील तापमान आढळते व ते सजीवांना इष्ट त्या मर्यादेतच असते. घनता व दाटपणा या दृष्टीने सागरातील पाणी त्यातील सर्व प्रकारच्या जीवांना तरंगण्यास फार सोईचे माध्यम असते." डॉ.मार्को पुढे बोलतात.
"समुद्रात प्रचंड व भिन्नतापूर्ण असा जीवसंग्रह असून त्यात सर्वांत लहान आणि सर्वांत मोठ्या जीवांचा समावेश आहे. किनाऱ्याजवळच्या पाण्यातील, सूक्ष्मदर्शकातूनही न दिसणारे पण विलग केलेले सोडले, तर सूक्ष्मजंतू हेच सर्वांत लहान जीव होत. आकारमानात त्याच्या अगदी विरुद्ध टोकास सर्व प्राण्यांत अजस्र असलेल्या निळा देवमासा जवळपास ३४ मी. लांब असतो. अतिसूक्ष्म आदिजीवांपासून ते खोल समुद्रातील सुमारे ११ मीटर लांबीच्या स्क्विड सारखे पाठीचा कणा नसलेले प्राणी सागरात सापडतात, तर लहानात लहान मासा शिंड्लेरिया द. पॅसिफिक महासागरात आढळत असून याची लांबी प्रौढावस्थेत १५ मिमी. व वजन ५ मिग्रॅ. पेक्षा कमी असते. सागरी वनस्पती यांची माहिती आम्ही घेतली. ती आम्हाला आपल्या कामाची वाटली नाही. मग राहिलेल्या सागरी प्राणी आणि सागरातील सूक्ष्मजंतू असे जीवांचे वर्गीकरण आपल्याला अँजेलिना व्यवस्थित सांगू शकेल." असे म्हणत डॉ.मार्को अँजेलिनाकडे बघतात. अँजेलिना पुढे बोलू लागते.
"स्वरूप व आकारमान यांचा विचार केल्यास सागरात प्राण्यांची एक प्रेक्षणीय मालिकाच आहे. टिनोफोरा, एकायनोडर्माटा, कीटोग्नॅथा, ब्रॅकिओपोडा व फोरोनिडा हे पाच संघ सागरी आहेत. एकूण प्राण्यांच्या वर्गांपैकी ४४ टक्के वर्ग सागरी असून त्यांचे ९४ टक्के प्रतिनिधी सागरात कोठेतरी आढळतात. उभयचर म्हणजेच पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील प्राण्यांव्यतिरिक्त इतर सर्व वर्गांतील काही प्राणी सागरी समुदायात समाविष्ट आहेत. अनेक प्रकारचे मासे, कासवे व काही साप सागरात आढळतात. पेंग्विनासारखे पक्षी उडता येत नसल्याने बराच काळ सागरात पोहतात; ॲल्बॅट्रॉसासारखे इतर पक्षी दीर्घकाल महासागरावर भराऱ्या मारतात व घरट्यासाठी जमिनीवर उतरतात. कॉर्मोरंट पक्षी पाण्याखाली चांगले पोहतात व बरेच खोलपर्यंत जाऊन येतात. देवमासे, डॉल्फीन व सागरी गाई या स्तनी प्राण्यांचे जलजीवनाकरिता जे विशिष्टीकरण झालेले असते त्यामुळे ते सागर सोडून जाऊच शकत नाहीत, परंतु सील, सागरसिंह, सी ऑटर हे व इतर काही स्तनी प्राणी फक्त प्रजोत्पादनार्थ जमिनीवर येतात. सागरी अपृष्ठवंशी प्राण्यांचे नानाविध प्रकार असून त्यांमध्ये बिळे पाडणारे कृमी, मॉलस्क व क्रस्टेशिया प्राणी भरपूर असतात. अनुकूल परिस्थितीत वाळूच्या पृष्ठभागावर तारामीन, सी अर्चिन, ब्रिटल स्टार व सँड डॉलर सारखे प्राणी वावरत असतात. आंतरगुही म्हणजेच शरीरात पचन- देहगुहा असलेल्या व ब्रायोझोआ यांपैकी काही प्राण्यांचे निवह घन पदार्थास चिकटून असतात किंवा स्वैरपणे तरंगतात. सायफोनोफोरातील निवह प्राण्यांत पोहणे, तरंगणे, अन्न पकडणे, अन्नाचे अंतर्ग्रहण, प्रजोत्पादन यांसारख्या विभिन्न कार्यांसाठी विशेषीकरण झालेले आढळते. उष्ण कटिबंधीय सागरातील मोठमोठ्या प्रवाल-भित्ती बऱ्याच अंशी निवह- प्रवालांच्या कंकाली स्रावणापासून व आंतरगुही प्राण्यांपासून बनलेल्या असतात. सागरी प्राण्यांत सर्वांत संख्येने अधिक व विभिन्न असे कवचधारी प्राणी असून ते मोठ्या संख्येने वरच्या पातळीत पोहतात ते स्वतः नंतर हेरिंग, मॅकेरेल यांसारख्या पृष्ठभाग व तळ यांमधील भागात राहणाऱ्या माशांचे आद्यान्न बनतात. खेकडे, शेवंडे व क्रेफिश यांचा एक मृत जीवांवर उपजीविका करणारा गट तळाशी घाण पदार्थ नष्ट करणारा म्हणून राहतो. प्रौढावस्थेत स्थानबद्ध अवस्थेत अन्य घन वस्तूवर घट्ट चिकटून बसणाऱ्या बार्नेकलांचा दुसरा गट आहे, त्यांच्या रूपांतरित पायांनी ते कार्बनी अपरद व लहान जीव पकडण्यासाठी परिसरातील पाणी लोटून देतात." जॉर्डन अँजेलिनाला मध्येच थांबवतो.
"एवढं सगळं पाहून तुझं काय म्हणणं आहे?" जॉर्डन अँजेलिनाला विचारतो.
"आता मला सुद्धा वाटतंय, आपण जपानला जायला हवं." अँजेलिना हळू आवाजात म्हणते.
"तुम्ही तिघांनी स्वतःला एका चौकटीमध्येच सीमित केलं आहे. यात तुमची काही चुकी नाही. तुम्ही तिघेही आपापल्या क्षेत्रामध्ये विद्वान आहात पण मी या सर्व गोष्टींचा देखील विचार करत असतो. माणसाने आपापल्या क्षेत्रात पारंगत असावं, पण दुसऱ्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती ठेवल्या काही हरकत नसावी. तुम्ही तिघांनी शंका उपस्थित केली म्हणजे तुम्हा तिघांना मोहिमेची किती चिंता आहे हे दिसते." जॉर्डन त्या तिघांना समजावण्याच्या सुरात म्हणतो.
"अभिजितने जेव्हा जपानला जाण्याबद्दल सांगितलं तेव्हा मी जपानच्या इतिहासावर एक नजर टाकली. जपानी बेटांवर केलेल्या पुरातत्वीय उत्खननांत निरनिराळ्या जागी मानवाच्या अस्थी आणि अश्मायुधे सापडली आहेत. त्यांवरून पुराणाश्मयुगात व मध्य-पुराणाश्मयुगात जपानात कोणत्या तरी रूपात मानवी वस्ती असावी. अर्थात ती कोणत्या प्रकारची होती आणि त्या वेळी कशा प्रकारची समाजव्यवस्था होती, यांविषयी विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. त्यातच नवाश्मयुगाच्या प्रारंभापासून पुष्कळच पुरावा आणि साधने उपलब्ध झाली असल्याने त्या काळाचे चित्र बरेचसे स्पष्ट होत जाते. ज्याला आपण तात्पुरता ७–८ हजार वर्षांपूर्वीचा कालखंड समजू, त्यापासून नवाश्मयुगाची वैशिष्ट्यद्योतक अशी दगडांची व हाडांची आयुधे, जनावरांची शिंगे सापडली आहेत. तिथे राहत्या घराचे अवशेषही सापडले आहेत. त्या सर्व पुराव्यांमधून आपल्याला काही माहिती मिळू शकेल असे मला वाटते." एकदम बोलून जॉर्डन गप्प तिघांकडे पाहत राहतो.
"ओके सर, मग आता आम्ही तिघेही तयारीला लागतो." लिसा जॉर्डनला म्हणते.
"हम्म... गुड नाईट... जपानला जाण्यासाठी उद्या दुपारची फ्लाईट आहे. तुम्ही झोप आता." एवढं बोलून जॉर्डन त्याच्या खोलीत जातो.