पोपट आणि ससाणा
एक ससाणा एका पोपटाला म्हणाला, 'अरे, तुझी चोच इतकी मजबूत असताना सुद्धा तू आपला चरितार्थ नुसती फळं नि किडे खाऊन चालवावास हे बरं वाटत नाही. त्यापेक्षा आमच्यासारखं तुम्हीही मांस खावं हे चांगलं.' ह्या ससाण्याच्या बोलण्याचा पोपटाला इतका राग आला, की त्याने एका शब्दानेही त्याला उत्तर दिले नाही. काही वेळाने तो पोपट एक कबुतराच्या खुराड्यावरून उडत चालला असता तेथे ससाण्याचे प्रेत उलटे टांगून ठेवलेले त्याला दिसले. ते पाहून पोपट म्हणाला, 'अरे, कबुतराच्या मांसावर निर्वाह चालविण्याची इच्छा सोडून जर तू माझ्यासारखाच फळं नि किडे खाऊन राहिला असतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसती.'
तात्पर्य
- स्वतःच्या भरभराटीच्या काळात जो दुसर्याचा उपहास करतो त्याला विपत्ती आली म्हणजे तोच दुसर्याच्या उपहासास कारण होतो.