Get it on Google Play
Download on the App Store

अ अ अॅन्ड्रॉईड चा!

कोणे एके काळी, जेव्हा मी पुण्यनगरी मध्ये माझा स्वत:चा व्यवसाय सुरु केला, तेव्हा माझ्याकडे एक मोठ्ठा संगणक होता, ज्याने एक आख्खं टेबल व्यापलं होतं. त्याला आम्ही ‘डेस्कटॉप पीसी’ असं म्हणायचो. (अजूनही म्हणतो) त्याला एक डायल अप इंटरनेट कनेक्शन जोडलेलं होतं. जोडीला एक घरचा दूरध्वनी. मी बाहेर कुठे मीटिंग ला गेलो, की नेमके घरी फोन येणार, घरचे बिचारे लोक निरोप लिहून घेणार, मी पुन्हा घरी आलो की, मी ते निरोप वाचून डेस्कटॉप पीसी चालू करून ई-मेल वाचणार, असं आयुष्य निवांत होतं.

मग आले लॅपटॉप. ते बॅगमध्ये ठेवले, की कुठेही घेऊन जा, आणि तिकडे बसून काम करा. यांना एक वाय फाय कनेक्शनची सोय होती. म्हणजे, जिथे मी जायचो, तिथे वाय-फाय इंटरनेट असलं, आणि त्याचा पासवर्ड त्या लोकांनी मला दिला, तर मी कुठेही ई-मेल पाहू शकायचो. जोडीला आले पेजर, मग मोबाईल. आता लोक मला कुठेही गाठायला लागले. कामाची बोलणी विनाविलंब व्हायला लागली.

पण नुसतीच बोलणी व्हायची. एक तर प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप घेऊन जाणं अजूनही खूप अवघड होतं, आणि त्यात घेऊनही गेलो, तरी प्रत्येक ठिकाणी वाय फाय इंटरनेट मिळेलच याची शाश्वती नाही !

जेव्हा वर्षोनुवर्षे जगभर खूप लोकांना ही समस्या सतावू लागली, तेव्हा त्यातून एक विचार पुढे आला, मोबाईल वरच इंटरनेट, ई-मेल, डेटा फाईल्स, इत्यादी सगळं मिळालं तर? म्हणजे फोन सुद्धा, आणि काम सुद्धा, दोन्ही एकत्र !

आणि ही कल्पना वस्तुस्थितीत आली साधारणत: एकोणीसशे नव्वद च्या दशकात, जेव्हा आय बी एम, मायक्रोसॉफ्ट, नोकीया, सॅमसंग इत्यादी कंपन्यांनी Palm OS, Symbian, Windows CE, Bada अशा ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरून मोबाईल आणि पी.डी.ए. (Personal Digital Assistant) नामक मोबाईलची सुधारीत आवृत्ती बाजारात आणली.

साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टची Windows Mobile OS, ब्लॅकबेरी लिमिटेडची Blackberry OS अशा अनेक सुधारीत ऑपरेटिंग सिस्टिम्स बाजारात आल्या.

मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती घडवली ती स्टीव जॉब्स यांनी. सन २००७ ला अॅपल कंपनीनं iPhone नामक ‘स्मार्टफोन’ बाजारात आणला. iPhone नं मोबाईल मार्केट हलवून सोडलं. iPhone हा screen touch interface नं काम करणारा जगातला पहिला मोबाईल फोन. या screen touch interface मुळे मोबाईलवर काम करणं सामान्य लोकांसाठी कितीतरी पटीनं सोप्पं झालं.

मोबाईल जगतातील पुढची क्रांती अॅन्डी रुबीन यानं गुगलच्या साथीनं घडवली. त्यानं अॅन्ड्रॉईड ही Open source ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली. या आधीच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स या पेड लायसन्स प्रकारात मोडणा-या होत्या, म्हणजेच त्यांचे पैसे येन केन प्रकारेण ग्राहकाला पडायचे. Open source license खाली येणा-या सिस्टिम्स ग्राहक एकही पैसा खर्च न करता (चकटफू) वापरू शकतो. या कारणानं अॅन्ड्रॉईड वापरणारे डिव्हाईसेस (मोबाईल, टॅबलेट इत्यादी) खूप कमी दरात ग्राहकांना मिळू लागले.

Android

भारत हा काटकसरी लोकांचा देश आहे. भारतीय मार्केट हे सगळ्या जगात ‘चोखंदळ’ म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय लोक एखादया वस्तूची उपयुक्तता, गुणवत्ता, आणि किंमत याची योग्य ती सांगड घालून खरेदी करतात. अॅन्ड्रॉईड च्या आधी असलेलं जागतिक स्मार्टफोन मार्केट उपयुक्तता आणि गुणवत्ता यात आघाडीवर होतं, पण किंमती भरमसाट असल्यानं ते भारतीय ग्राहकाला पटवण्यात फारसं यशस्वी झालं नाही. पण अॅन्ड्रॉईड नं यात चांगलीच मुसंडी मारली.

आज जागतिक स्मार्टफोन बाजारातला ८० टक्के, तर भारतीय बाजारातला ९० टक्क्यांच्या वर हिस्सा फक्त एकटया अॅन्ड्रॉईड नं व्यापला आहे, यावरून अॅन्ड्रॉईड ची ग्राहाकांवरची पकड स्पष्ट दिसून येते.

सॅमसंग, झोलो, मायक्रोमॅक्स, लेनोव्हो इत्यादी आघाडीवरच्या स्मार्टफोन बनविणा-या कंपन्या अॅन्ड्रॉईड वापरत आहेत. एवढंच नाही, तर आता गुगल ग्लास, गुगल टेलिव्हिजन इत्यादी डिव्हाईसेस वर सुद्धा अॅन्ड्रॉईड वापरली जात आहे. यावरून अॅन्ड्रॉईड चा व्यापक वापर आणि उपयुक्तता सहज लक्षात येते.

अॅन्ड्रॉईड ची एक गम्मत म्हणजे इंग्रजी अक्षर A पासून सुरु होऊन त्याची पुढची व्हर्जन्स आता K पर्यंत आली आहेत, आणि यातली C पासून पुढची सर्व नावं म्हणजे खाण्याच्या गोष्टी आहेत. Alpha, Beta, Cupcake, Donut, Eclair, Froyo, Gingerbread, Honeycomb, Ice cream sandwich, Jelly bean, Kit Kat ही अॅन्ड्रॉईड ची नावं. तोंडाला पाणी सुटलं लिहितांनाच !

असं काय आहे या अॅन्ड्रॉईड मध्ये की जनमानसाची एवढी पकड यानं घेतलीये? पाहुया अॅन्ड्रॉईड चे काही वैशिष्टये.

फोन संभाषण (Telephonic features) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम voice call, video call, conference call इत्यादी संभाषण सुविधा पुरवते.

मेसेजिंग (messaging) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम SMS (Short Messaging Service) आणि MMS (Multimedia Messaging Service) दोन्हीला सपोर्ट करते.

इंटरनेट कनेक्टीव्हीटी (Internet connectivity) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम वाय-फाय द्वारे इंटरनेट कनेक्शन वापरू शकते. शिवाय, आपण आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला (Idea, Airtel, BSNL etc.) सांगून आपल्या सीम कार्ड द्वारे डेटा कनेक्शन प्लॅन अॅक्टिवेट करू शकतो, ज्या द्वारे आपल्याला 2G अथवा 3G सर्व्हिस अॅन्ड्रॉईड मध्ये वापरता येते. (2G चा स्पीड कमी असतो, पण 3G चा स्पीड जास्त असला तरी त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते हे लक्षात घेऊन जेथे इंटरनेट स्पीड खूप जास्त गरजेचा आहे तेथेच 3G वापरणे कधीही सोयीस्कर ठरते.)

अॅप्स (APPs) – स्मार्टफोनवर वापरल्या जाणा-या प्रोग्रॅम्सना अॅप्स म्हणतात. अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण अनेक उपयुक्त अॅप्स गुगलच्या गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकतो, आणि वापरू शकतो. यामध्ये अनेक वर्तमानपत्रे, social networking APPs, गेम्स, इत्यादींचा समावेश होतो. यापैकी काही अॅप्स हे पूर्णपणे फुकट असतात, तर काहींना पैसे पडतात.

मल्टी टास्कींग (Multitasking) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम एकाच वेळेला अनेक अॅप्स वापरण्याची सोय देते. यापैकी एक अॅप हे स्क्रीनवर असते, तर बाकीचे लपलेले (hidden) असतात, ज्यांना ग्राहक एका पूर्वनियोजित कृतीने कधीही पाहू शकतो, आणि ते पुढे चालू ठेवू शकतो.

गुगल सर्च (Voice based Google search facility) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण बोलून सुद्धा अनेक गोष्टी शोधू शकतो. उदाहरणार्थ, “शनिवार वाडा” असं बोलल्यास अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला शनिवार वाडा असलेलं ठिकाण, त्याची माहिती, तेथपर्यंत जाण्याचा रस्ता, जायला लागणारा वेळ, इत्यादी सर्व माहिती पुरवते.

गुगल नेव्हिगेशन (Google navigation) – यामध्ये आपण दोन ठिकाणांना जोडणारे रस्ते शोधणे, त्यांमधील अंतर शोधणे, जवळची सार्वजनिक ठिकाणे (बस थांबा, खानावळ, शाळा) शोधणे, आपण आत्ता कुठे आहोत हे GPS (Global Positioning System) च्या सहायाने बघणे इत्यादी सुविधा आपल्याला वापरता येतात.

गुगल कॅलेंडर (Google calendar) – यामध्ये आपण आपले इव्हेंट्स, सुट्ट्यांचे दिवस, वाढदिवस इत्यादी पाहू शकतो, आणि त्यांचे रीमाईन्डर्स लावू शकतो.

एकाच गुगल अकाऊंटने सगळं काही (One Google account for all) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम ग्राहकाचा एक गुगल अकाऊंट घेते, आणि तोच एक अकाऊंट गुगलच्या विविध सर्व्हिसेस करता वापरते. उदाहरणार्थ, Google mail (ज्यामध्ये आपले ई-मेल्स व फोन कॉन्टॅक्टस् साठवले जातात), Google Maps (ज्यामध्ये आपण आपली घर व कचेरीची ठिकाणे साठवू शकतो, व वेळेला त्याचा उपयोग नेव्हिगेशन करता करू शकतो), Google Keep (ज्यामध्ये नोट्स साठवल्या जातात), Google Play (जेथून अॅप्स डाऊनलोड केले जातात), Google Drive (आपल्या फाईल्स करता ऑनलाईन स्टोअर) इत्यादी. एक अजून चांगली सुविधा म्हणजे, आपल्या स्मार्टफोनवर वापरलेल्या अकाऊंटद्वारे ही माहिती गुगल सर्व्हर वर साठवली जाते, जी आपण आपल्या डेस्कटॉप / लॅपटॉप वर सुद्धा कधीही वापरू शकतो, अगदी आपला स्मार्टफोन जवळ नसतांना सुद्धा आपले सगळे ई-मेल्स, फोन कॉन्टॅक्टस् इत्यादी सर्व आपल्याला सहज मिळते.

प्रादेशिक भाषा वापर (Multi language support) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आपण अनेक प्रादेशिक भाषांचा वापर करू शकतो. आपल्या मातृभाषेत संदेश (SMS) पाठवण्याचा आनंदच काही वेगळा !

वापरातील सुलभता (Accessibility) – कमी अथवा न ऐकू येणा-या, कमी अथवा काहीच न दिसणा-या व्यक्तींकरता अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम काही सुलभ सुविधा देते. यामध्ये स्क्रीनवर बोट टेकवल्यास आपण काय क्रिया करणार आहोत, याची आगाऊ सूचना देणे, केलेली क्रिया ग्राहकाला ऐकवणे, स्क्रीन वरील अक्षरे मोठी दाखवणे, स्क्रीनचा प्रकाश वाढवणे इत्यादी सुविधा येतात.

फाईल्स हस्तांतरण (Files transfer between devices) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे आपण Bluetooth connectivity सुविधा वापरून आपल्या स्मार्टफोनमधील फाईल्स दुस-या डिव्हाईसवर (संगणक, मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी) ट्रान्सफर करू शकतो. शिवाय, दुस-या डिव्हाईसवरील फाईल्स आपल्या स्मार्टफोन वर आणू शकतो. यासाठी आपला व समोरचा डिव्हाईस Bluetooth supported असणं गरजेचं आहे.

मल्टिमिडीया (Multimedia support) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिममधील गॅलरी, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, साऊंड रेकॉर्डर, व्हिडीओ प्लेअर अशी अनेक अॅप्स आपल्याला फोटो, गाणी, व्हिडीओ यांचा मनमुराद आनंद देतात.

फोन सुरक्षितता (Phone security features) – अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला फोन लॉकिंग करता विविध पर्याय देते. यात प्रामुख्याने पॅटर्न लॉक (यामध्ये ठराविक पद्धतीने बिंदू जोडत गेल्यास स्क्रीन अनलॉक होतो), पिन / पासवर्ड लॉक (यामध्ये ठराविक key combination टाईप केल्यास स्क्रीन अनलॉक होतो), व्हॉईस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्ती ठराविक शब्द बोलल्यास स्क्रीन अनलॉक होतो), फेस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्तीचा चेहरा स्मार्टफोनच्या समोर धरल्यास अथवा ठराविक व्यक्तीच्या चेह-याने ठराविक क्रिया केल्यास, उदाहरणार्थ डोळे मिचकावणे, स्क्रीन अनलॉक होतो).

याशिवाय अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घातलेले काही अॅप्सही आपल्यासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करतात. क्विक हील अॅन्टिव्हायरस ठराविक फोन नंबर्स वरून येणारे फोन्स अथवा संदेश ब्लॉक करतं, अॅपलॉक हे अॅप एक पूर्वनियोजित पासवर्ड टाकल्याखेरीज आपल्याला बाकीचे कुठलेही अॅप्स वापरू देत नाही.

अशा पद्धतीनं स्मार्टफोन हे आता एक चालतं बोलतं ऑफिस झालंय. जग खूप छोटं झालंय, अगदी खिशात बसायला लागलंय. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, अगदी स्मार्टफोनचा सुद्धा ! सतत स्मार्टफोन्सवर लक्ष दिल्याने कामातलं लक्ष उडणं (distraction), वैयक्तिक संबंधांमधले बिघाड इत्यादी समस्या आत्तापासूनच भेडसावतायेत. सदैव संपर्कात राहिल्यानं थोडासुद्धा निवांतपणा मिळेनासा झालाय. त्यामुळे चिडचिड, उदासीनता, सततची चिंता इत्यादी मानसिक समस्या उद्भवत आहेत.

स्वत:वर ताबा ठेवून स्मार्टफोनच्या आहारी न जाता त्याचा वापर करायला शिकूया. तर करूया सुरुवात?

अ अ अॅन्ड्रॉईड चा…

 

[लेखक : मंदार नाईक ]

*छायाचित्र इंटरनेटवरून साभार