Get it on Google Play
Download on the App Store

संपादकीय

नमस्कार,

टेक मराठीचा पहिला ई-दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना आम्हांस आनंद होत आहे.

नुकत्याच झालेल्या यशस्वी मंगळ मोहिमेमुळे भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे हे जगाला समजले. संरक्षण, राज्यकारभार, वैद्यकिय सेवा, दळणवळण इत्यादि सर्व देशपातळीवर मह्त्वाच्या ठरणाऱ्या क्षेत्रामध्येही आपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या प्रगतीचा वेग अपेक्षेप्रमाणे आहे का किंवा तो अधिक चांगला असण्याच्या दृष्टीने काय करायला हवे होते हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल. पण एक मात्र खरं की मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण यामुळे सामान्य लोकांपर्यन्त तंत्रज्ञान पोहोचण्यास मदत झाली. यापुढची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाचा परिणमकारक वापर. याबाबतीत आपल्याला सामान्य माणसांच्या पातळीवर एक दरी दिसून य़ेते. ही दरी भाषेमुळे निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञान आणि इंग्रजी हे एक समीकरण झालेले आहे. त्यामुळे “इंग्रजी नसेल तर तंत्रज्ञान नाही” अशी अवस्था आहे.
टेक मराठी या संस्थेने नेमकी हीच परिस्थिती ओळखून त्यावर उपायाच्या द्रुष्टीने काम सुरु केले. तंत्रज्ञानातील संज्ञांना मराठी प्रतिशब्द शोधणे हा उद्देश न ठेवता फ़क्त मराठीतून ते समजावून सांगणे हा उद्देश ठेवला. प्रस्तुत दिवाळी अंक हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
या दिवाळी अंकामध्ये तंत्रज्ञानाविषयी विविधांगी माहिती आणि मनोरंजन आहे. लेखक, उद्योजक यांच्या मुलाखती, अॅन्ड्रॉईड आणि त्यावर आधारित अॅप्स बद्दल माहिती, आपल्या अवतीभवती नेहमीच दिसण्याऱ्या एम्बेडेड सिस्टीम्स इत्यादी सर्व आहेच पण तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अंतर्मुख करणारे लेख/कविताही आहेत.
वाचकांनी हा ज्ञानाचा ठेवा अवश्य अनुभवावा आणि ह्स्तांतरित करावा, ही नम्र अपेक्षा आहे.
प्रशांत दत्तात्रय पुंड
संपादक