Get it on Google Play
Download on the App Store

योगासने

योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होय. म्हणून ‘स्थिरसुखं आसनम्‌’ (स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन) अशी आसनाची व्याख्या योगसूत्रांत केली आहे. शुद्ध मन नसलेले शरीर, स्थिर बुद्धी नसलेले शरीर कोणतेही महत्त्वाचे कार्य यशस्वी करू शकणार नाही, स्वस्थ व व्याधिमुक्त शरीराशिवाय मनावर नियंत्रण आणता येणार नाही.

योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात. योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, ⇨ प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व ⇨समाधी होत. यास ⇨अष्टांगयोगम्हणजे आठ अंगे असलेला योग असे म्हणतात. सुखावह स्थिरपणाने (कोणतीही हालचाल न करता) व शांत चित्ताने एखाद्या विशिष्ट स्थितीत दीर्घकाल राहता आले, म्हणजे ते ‘आसन’ साध्य झाले, असे म्हणता येईल. तसेच कोणत्याही शारीरिक बैठकीत किंवा स्थितीत सुखावह व यातनाविरहित रीतीने मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र व एकाग्र राहता येणे, हे आसनांच्या अभ्यासाने साधले पाहिजे. त्याकरिता एकूण शारीरिक स्वास्थ्य टिकून राहणे जरूरीचे आहे. शरीरातील विविध इंद्रिये व संस्था - उदा., श्वसन, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन इ. तसेच स्नायूसमूह, ज्ञानतंतू, मन यांसारखे घटक या सर्वांची कार्यक्षमता व परस्परसहनियमन यांचा विकास व्हावा लागतो व तो योगासनांच्या नित्य सरावातून साधता येतो. योगासनांच्या विविध स्थितींमुळे–हालचालींमुळे पाठीचा कणा (मेरुदंड) आणि त्यातील पृष्ठवंशरज्जू अर्थात मज्जारज्जू–ज्ञानतंतू–मज्जापेशी यांच्यावर इष्ट परिणाम होतो.

- अभिषेक ठमके (एम.ए., बी.ए.)