Get it on Google Play
Download on the App Store

तीन उपाय


कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो. मी रस्ता चुकलो नव्हतो एवढं नक्की आणि पारही तोच होता. पण बाबा काही दिसत नव्हते. शेवटी त्या पाराशेजारीच गाडी पार्क केली आणि नाईलाजानेच गाडीतून उतरलो. त्या असह्य उकाड्याने एकदम गुदमरल्यासारखं झालं. चेहरा आणि मान रुमालाने खसाखसा पुसले आणि शेजारच्या टपरीच्या दिशेने चालायला लागलो. टपरीपर्यंत पोचतोय ना पोचतोय तोच समोरच्या कोपऱ्यात खुणेचं लाल पागोटं दिसलं. होय तेच.. तेच तेच.. बाबाच होते ते. माझ्याकडेच बघत होते. अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले.

****************

वैतागून मी हातातली पिशवी खाली ठेवली आणि पारावर बसलो. खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला.

"हॅलो"

"..."

"अग नाही. इथेच आहे अजून. आधीची एसटी चुकली माझी आणि आता पुढची एसटी कॅन्सल झालीये म्हणे. पुढे काहीतरी अपघात झाल्याने रस्ता बंद आहे"

"..."

"छे. आज जाणं तर नक्कीच होणार नाही. आता परत कसं यायचं बघतो."

"..."

"हो.. बरं फोन करतो नंतर."

आता परत जायला बस कधी आणि कुठून मिळेल काहीच अंदाज नव्हता. आता काय करायचं या विचारात मी इकडे तिकडे बघत तिथेच उभा होतो.

"राम राम"

थोड्या अंतरावरून आवाज आला. एक किंचित वयस्कर गृहस्थ डोळे मिटून शांत बसले होते. मीही हसून राम राम केलं. त्यांनी डोळे किंचित किलकिले उघडून हात हलवला. आता त्यांनी नुसतंच "बरं" अर्थाने हात हलवला की "इकडे या" या अर्थी हलवला हे मला समजलं नाही. आणि या आगजाळ उन्हाने किलकिले केलेले डोळे त्यांनी पुन्हा मिटूनही घेतले. मला तसंही काम नव्हतं आणि कदाचित बोलता बोलता बसची माहिती मिळेल या हेतूने मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो.

"नमस्कार"

"नमस्कार नमस्कार"

"भारीच ऊन आहे नाही?"

"या ऊन्हाचं कौतुक तुम्हा एसीवाल्यांना.. आम्हाला काय रोजचंच आहे" किंचित हसत ते म्हणाले. मीही हसलो.

"त्रासलेले वाटता"

"हुं"

"आणि तेही उन्हाने नाही"

अनोळखी माणसाशी एवढी जवळीक, चौकशी वगैरे मला जरा अप्रस्तुत वाटली. पण तरीही म्हातारबाबा कदाचित काळजीने किंवा सहज काहीतरी संभाषण पुढे न्यायचं म्हणून म्हणत असतील म्हणून मी ही म्हणालो.

"खरंय. पण तुम्हाला कसं कळलं?"

"ज्योतिषी आहे मी. फक्त चेहरा बघून सांगू शकतो"

"काय?? खरंच?"

म्हातारबाबा अचानक जोराने हसले. "नाही ओ. चेष्टा करत होतो तुमची. तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना. त्या अंदाजाने म्हणालो फक्त".... मी काहीच बोललो नाही.

"काही समस्या आहे का?"

अचानक माझे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना घडाघडा सांगून टाकून मोकळं व्हावंसं वाटून गेलं मला. अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!

काही समस्या?? त्या हिंदी चित्रपटातल्या "एक हो तो बताऊँ" सारखं म्हणावसं वाटलं मला.

"हम्म. अहो काही ना काही प्रॉब्लेम्स चालूच आहेत. एकही धड मार्गी लागत नाहीये. वैतागून आज शेवटी एका ज्योतिषीमहाराजांना भेटायला चाललो होतो. बरेच ज्ञानी आहेत असं ऐकून आहे. तिकडेच चाललो होतो तर नेमकी बसही नाहीये आता."

बाबांनी पुन्हा एकदा किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं. पुन्हा डोळे मिटून काही वेळ शांत बसले आणि जरा वेळाने म्हणाले

"मी मगाशी चेष्टा करत नव्हतो. खरं सांगत होतो."

"म्हणजे?"

"भविष्याबद्दल"

"काय????? खरंच?"

"होय"

मग मगाशी थट्टा करतोय असं का म्हणालात?"

"ते उगाच. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही असं वाटलं म्हणून"

"तुम्ही खरंच ज्योतिषी आहात?"

"हो. आणि तोही कुडमुड्या नाही. चांगलं शास्त्रशुद्ध शिकलेला. तुमचा चेहरा बघताक्षणीच तुमच्या सगळ्या समस्या माझ्या नजरेसमोर आल्या. फक्त समस्याच नाही तर त्यावरचे उपायही"

"चेहरा बघताक्षणीच? कधी बघितलात तुम्ही चेहरा? आपण भेटल्यापासून तुमचे डोळे मिटलेले आहेत. अगदी आत्ताही" मी एक शेवटचा खडा टाकून बघितला,

"पहिल्या वेळी रामराम केलं तेव्हा दिसला तेवढंच दर्शन पुरतं मला. पण मला आधी आली होती ती शंका रास्त होती. तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. तुम्ही तुमच्या बसची शोधाशोध करा. मी निघतो"

"अहो तसं नाही" आता मात्र मी पुरता खजील झालो होतो. "प्लीज तुम्ही रागवू नका. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता माझा."

"हम्म.. असो"

"अहो बरेच प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या.. घरात, कामात........... "

"एक मिनिट.. " बाबांनी अचानक हात वर करून मला थांबवलं. "मी तुम्हाला तुमच्या समस्या विचारत नाहीये. मला त्या माहित आहेत असं म्हणालो मी. आणि त्यावरचे उपायही...!!! लक्ष नाहीये तुमचं"

"सॉरी. अहो तसं नाही."

"बरं. हे घ्या". त्यांनी खिशातून एक खडा काढला आणि माझ्या हातात दिला.

"तुमच्या घराजवळ गणपतीचं देऊळ आहे?"

"हो अगदी घरासमोरच आहे."

"अरे वा छान.. आणि शनीचं?"

"शनीचं? नाही. म्हणजे आहे पण ते खुपच लांब आहे"

"कितीही लांब असो. उद्यापासून रोज सकाळी उठायचं गणपतीच्या देवळात जायचं. बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आत जायची गरज नाही. आणि त्यानंतर तिथून थेट शनीमंदिरात जायचं. तिथेही बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आणि त्यानंतर ती दोन देवळं म्हणजे दोन बिंदू समजून त्या दोन्ही देवळांना मिळून एक अशा प्रदक्षिणा घालायच्या. पण आपल्या नेहमीच्या प्रदक्षिणांसारख्या नाही. धावत. जितक्या जास्त वेगात धावता येईल तितक्या वेगात"

"बरं"

"किती घालाल प्रदक्षिणा? एकवीस. आणि या सगळ्या प्रदक्षिणा सूर्योदयाच्या आत झाल्या पाहिजेत."

"सूर्योदयाच्या आत?"

"का काय झालं? जमणार नाही?"

"नाही नाही. जमेल."

"आणि हा खडा चोवीस तास तुमच्या बरोबर बाळगायचा. एक क्षणही अंतर द्यायचं नाही"

"बरं"

"आणि शेवटची अट म्हणजे आजपासून फक्त खरं बोलायचं. एक कणभरही खोटं नाही. असत्याचा अंशही नको."

"बरं"

"ठीक. या आता"

झालं? एवढंच? अजून काही नाही? पुन्हा भेट, दक्षिणा वगैर काहीच नाही? असे विचार करत मी तिथेच चुळबुळत उभा राहिलो. ते विचार जणु वाचल्याप्रमाणे पुन्हा ते स्वतःच म्हणाले "मी दक्षिणा वगैरे काही घेत नाही. रोज प्रदक्षिणा घालायला जेवढी मिनिटं त्याला दहाने गुणून तेवढे रुपये रोज बाजूला काढून ठेवा. त्या पैशाचं काय करायचं ते नंतर सांगेन. असो. मी सांगितले ते नियम अगदी मनापासून पाळा. बदल दिसेल. नक्की दिसेल. सुधारणा दिसायला लागली की मला इथेच येऊन भेटा. तेव्हा दक्षिणेचं बोलू. या आता" मी एकदम त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आधी काही म्हणाले नाहीत पण नंतर अचानक मागे सरकले आणि म्हणाले "याची गरज नाही"

****************

बाबांनी सांगितलेल्या उपायांनी सुरुवातीला काहीच फरक जाणवला नाही. तरीही मी ते नेटाने करत राहिलो. प्रदक्षिणा, तो खडा, आणि असत्य टाळणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि बघता बघता एकदम फरक जाणवायला लागला. बुडायला आलेलं वर्कशॉप पुन्हा उभारी धरायला लागलं, हातात पैसे शिल्लक राहायला लागले, विकलेली गाडी थोडेसेच जास्त पैसे देऊन पुन्हा विकत घेतली, तब्येतीच्या कटकटी बघता बघता कमी होत गेल्या, झोपेच्या तक्रारी बंद झाल्या, हे म्हणजे एकदम जादूची कांडी फिरवल्यागत होत होतं सगळं !! बाबांना मी रोज मनोमन नमस्कार करत होतो. सुधारणा नक्कीच जाणवत होती. बाबांना भेटायला जायचं होतं पण कामाच्या व्यापात बघता बघता कसे १०-११ महिने उलटून गेले कळलंच नाही. गेल्या उन्हाळ्यात बाबांचे पाय धरून इथून निघालेलो मी पुन्हा या उन्हाळ्यात परतलो होतो. त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांना काय हवी ती दक्षिणा देण्यासाठी. खुणेच्या पाराच्या ठिकाणी येऊन मी कार थांबवली आणि दार उघडलं. कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो.

****************

अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले. माझ्याकडे पाठ केली आणि उलट दिशेने पावलं टाकायला लागले. पण चालण्याचा वेग अतिशय मंद होता. अचानक माझं लक्ष त्यांच्या हातातल्या लाल-पांढऱ्या छडीकडे गेलं. मी जागच्या जागी थिजून गेलो. वर्षभरात आपण बाबांची साधी चौकशीही केली नाही की त्यांना भेटायला आलो नाही. त्यांच्यावर एवढा भयानक प्रसंग ओढवला आणि आपल्याला त्याची साधी कल्पनाही नाही. खूप अपराधी वाटायला लागलं. मी जागच्याजागी थरथरायला लागलो. किंचित गरगरल्यासारखंही वाटायला लागलं आणि मी एकदम जमिनीवरच बसकण मारली. टपरीवाला माणूस धावत जवळ आला आणि माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. त्याने दिलेला चहाचा कप थरथरत्या हाताने कसाबसा प्यायल्यावर थोडी हुशारी आली. मी उठून उभा राहिलो. मी ठीक आहे हे बघितल्यावर तो जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि त्याच्या हातात पाचाची नोट दिली आणि विचारलं

"हे बाबांचं असं कसं झालं? कधी झालं?"

"कोणाचं?"

"ते लाल पागोटंवाले बाबा."

"अच्छा ते. त्यांचं काय?"

"त्यांच्या डोळ्यांना काय झालं? काही अपघात वगैरे झाला का? कधी झाला?"

तो काही न बोलता माझ्याकडे वेड्यासारखा बघायला लागला.

"अरे मी काय विचारतोय? कळतंय का?"

"नाही कळत. खरंच कळत नाहीये"

"म्हणजे?"

"अहो ते म्हातारबा पहिल्यापासूनच आंधळे आहेत"

"काय?" आता वेड्यासारखं बघायची पाळी माझी होती.

"होय"

"अरे कसं शक्य आहे? त्यांनी माझा चेहरा बघून माझं भविष्य सांगितलं. माझ्या समस्या न सांगता त्यांना समजल्या होत्या, त्यावर त्यांनी उपायही सांगितले मला. अरे जेमतेम वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. गणपतीचं देऊळ, शनीचं देऊळ, खडा, सत्य बोलायचं. विश्वास बसणार नाही एवढी प्रगती झाली माझी. कुठून कुठे पोचलो" असं बरंच बरंच काही मी बोलत राहिलो. बराच वेळ. तो फक्त किंचितसा हसला आणि तिथून जायला लागला.

-समाप्त