खुशाल
मी मुद्दामच या विषयावर लिहायचं टाळत होतो. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल नेटवर्क्स वगैरे प्रत्येक ठिकाणी तीच चर्चा, नवीन अपडेट्सच्या नावाखाली त्याच भयानक घटनेचं चर्वितचर्वण आणि हे सगळं कमी म्हणून की काय विविध नेते, राजकारणी, पोलीस अधिकारी इत्यादींच्या उसवलेल्या मेंदूंतून आणि फाटक्या तोंडांतून गळणारी अकलेची दिवाळखोरी दाखवणारी, रोजच्या रोजची नवनवीन बेजवाबदार भाष्यं !
परंतु काही काही मुद्दे पुनःपुन्हा येऊ लागले, दाखले दिले जाऊ लागले.. लेख, अग्रलेख, विशेष लेख इ इ सगळीकडेच. जे माझ्या मते चुकीचे होते, आहेत आणि त्याहीपेक्षा त्या दुर्दैवी जीवावर अन्याय करणारे आहेत... म्हणून लिहायला बसलो.
आपल्याकडे किंबहुना जागतिक पातळीवरच एखादी व्यक्ती जी हिंसेची, जशास तसे न्यायाची (Eye for an eye) मागणी करते, त्या विचाराला पाठींबा देते तिला बेधडकपणे असंवेदनशील, बुरसटलेल्या विचारांची, अप्रगल्भ असल्याचं लेबल लावून टाकण्याची पद्धत आहे. प्रसंग काहीही असो, पार्श्वभूमी काहीही असो त्याचा काही संबंध नाही. प्रत्यक्ष तात्याराव सावरकर जिथे सुटले नाहीत तिथे आपली काय कथा ! अजून थोडं स्पष्ट लिहितो.
त्या सहा हरामखोरांना फाशी देऊ नये, जन्मठेप द्यावी असा एक मोठा विचारप्रवाह आहे. का तर फाशीने पटकन सुटका होते. जन्मठेपेने माणूस रोज झिजतो. या मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे. पण...
त्याप्रमाणेच त्यांना ताबडतोब फाशी दिली जावी असं मानणाराही एक मोठा वर्ग आहे. पण माझ्या मते त्याचं कारण वेगळं आहे. कायदा/न्यायव्यवस्था/राज्यघटना.. नाव काहीही द्या.. च्या मते जास्तीत जास्त कठोर शिक्षा म्हणजे फाशी आहे... आणि म्हणून फाशीची मागणी केली जाते आहे. खरंतर फाशी ही सोपी शिक्षा आहे हे त्या प्रत्येकाला मान्य आहे. त्या श्वापदांना खरं तर अत्यंत भीषण, निर्घृण शिक्षा व्हावी अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. त्यांचे हात-पाय कलम केले जावेत किंवा अगदी सौदीतल्या प्रमाणे लिंग छाटण्याची शिक्षा दिली तर अजून उत्तम असं प्रत्येकाला वाटतंय. पण वर म्हटल्याप्रमाणे न्यायव्यवस्थेला या शिक्षा मान्य नाहीत. त्यामुळे न्यायव्यवस्थेला मान्य असणाऱ्या शिक्षांमधली मोठ्यात मोठी शिक्षा कोणती तर फाशी. म्हणून मग निदान त्या दळभद्री माणसांना आपण आपल्या न्यायव्यवस्थेतली जास्तीत जास्त कठोर शिक्षा दिली हे समाधान म्हणून फाशीची मागणी होतेय.
दुसरी गोष्ट म्हणजे आजन्म कारावास म्हणून १४ वर्षांची शिक्षा मिळणार असेल तर काय उपयोग. थोडक्यात चौदा किंवा जे काही आहे तितक्या वर्षांनी, किंवा चांगल्या वागणुकीमुळे शिक्षेत काही वर्षं सुट मिळवून ते लवकर सुटणार !!! असं होईलच असं नाही पण होणार नाहीच असंही खात्रीशीरपणे कोणी सांगू शकतं का? तसाही त्यांच्यातला सहावा राक्षस बलात्कार करण्याइतपत अक्कल असलेला परंतु (आंधळ्या आणि पांगळ्या) कायद्याच्या दृष्टीने सज्ञान नसल्याने कमी शिक्षेत सुटणार आहेच !
परंतु या सगळ्यांपेक्षा अजून एक मोठा मुद्दा आहे जो विशेष विनोदी आहे. तो म्हणजे "फाशी देऊन बलात्कार कमी होणार आहेत का?" ............ यासारखा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रश्न दुसरा नसेल.. !!!! अरे बाबांनो फाशी देऊन बलात्कार कमी होणार नसले तरी तुमच्या जन्मठेपांनी तरी ते कुठे कमी झालेत? उलट वाढलेतच की. त्यामुळे निदान फाशीच्या जरबेने का होईना बलात्कार कमी होतील अशी अपेक्षा ठेवून बघायला काय हरकत आहे? कारण शेवटी वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.
बलात्कारासाठी फाशीची शिक्षा मागणे ही फक्त एक प्रतिक्रिया आहे. त्यात सारासार विचार नाही असं काहीसं मतही मी वाचलं. वाईट वाटलं ! अर्थात ही प्रतिक्रियाच असणार. नाहीतर एखाद्या निष्पाप जीवावर इतका भयंकर प्रसंग ओढवला तर काय शिक्षा द्यायची याबद्दलची शिक्षा कुठलाही संवेदनशील समाज आधीपासून ठरवून ठेवू शकत नाही. इतक्या भयंकर क्रौर्याचा विचार तरी कोणी करू शकेल का? आणि म्हणून तर कायद्याने रेअरेस्ट ऑफ रेअर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा संमत केली आहे. त्या काळरात्री जे घडलं त्यापेक्षा दुर्मिळ, भीषण, संवेदनाहीन, पाशवी असं काय असू शकतं?
आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला काय हवंय, काय वाटतंय, कायदा काय सांगतो, तज्ज्ञांचं मत काय आहे, अन्य देश, युनायटेड नेशन्स काय म्हणतायत वगैरे वगैरे सगळ्या फडतूस गोष्टी क्षणभर बाजूला ठेवूया.. आणि एक क्षण फक्त एकच क्षण विचार करुया की जिने त्या रात्री तो नरक भोगला, असह्य वेदनांना तोंड देत अत्यंत दुर्दैवी रीतीने प्राण सोडला, जिच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या त्या लेकीची अखेरची इच्छा काय असेल? तिला विचारलं असतं, किंवा उत्तर द्यायला जर ती शिल्लक असती तर तिने कुठली शिक्षा निवडली असती? .. बाबांनो, उत्तर देऊ नका हवं तर.. कारण जे उत्तर मिळेल ते पचवणं तुमच्यासाठी अवघड असेल... फक्त स्वतःशीच विचार करा.. काय वाटतं ते सांगा आणि मग खुशाल जन्मठेपेची मागणी करा हवं तर !